T20 Mumbai League 2025 Auction Date ,Timing And Players Base Prize: सध्या भारतात आयपीएल २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी होणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर मुंबईत आणखी एका मोठ्या लीग स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारे क्रिकेटपटू खेळताना दिसून येणार आहेत. ज्यात श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ आणि शार्दुल ठाकूर सारख्या स्टार खेळाडूंचा समावेश असणार आहे. दरम्यान या स्पर्धेला केव्हा सुरूवात होणार जाणून घ्या.

आयपीएल २०२५ स्पर्धा झाल्यानंतर, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी-२० मुंबई लीग स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी होणारा लिलाव ७ मे रोजी पार पडणार आहे. या लिलावात मुंबईतील नामांकीत खेळाडूंसह युवा खेळाडूंवर देखील लाखांची बोली लागणार आहे. हा लिलाव सकाळी १० वाजता सुरू होईल. या लिलावात एकूण २८० खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. हे या स्पर्धेचे तिसरे हंगाम असणार आहे. या स्पर्धेला २६ मे रोजी सुरूवात होणार असून स्पर्धेतील अंतिम सामना ८ जून रोजी खेळवला जाईल.

या खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली

या स्पर्धेत श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि अजिंक्य रहाणेसारखे स्टार खेळाडू आयकॉन खेळाडू म्हणून खेळणार आहेत. हे कोणत्या संघागकडून खेळणार, हे देखील ठरलं आहे. तर लिलावात काही युवा खेळाडूंवर मोठी बोली लागू शकते. आयपीएल २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्याची संधी मिळालेला आयुष म्हात्रे देखील या लिलावात असणार आहे. आयुषने ४ सामन्यांमध्येच आपलं टॅलेंट दाखवून दिलं आहे. यासह देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना त्याने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे या लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागू शकते. यासह अंगकृश रघुवंशी, मुशीर खान आणि तनुष कोटीयानसारख्या युवा खेळाडूंवर देखील मोठी बोली लागू शकते.

या स्पर्धेत एकूण ८ संघ असणार आहेत. या ८ संघांसाठी २८० खेळाडूंवर बोली लावली जाईल. या लिलावात खेळाडूंना ३ श्रेणीत विभागलं जाणार आहे. पहिल्या श्रेणीत वरिष्ठ खेळाडूंचा समावेश असणार आहे. जे खेळाडू प्रथम श्रेणी, लिस्ट ए किंवा टी-२० संघाचा भाग असतील त्या खेळाडूंचा या श्रेणीत समावेश केला जाईल. दुसऱ्या श्रेणीत उदयोन्मुख खेळाडूंचा समावेश असणार आहे. जे खेळाडूंनी गेल्या ३ वर्षांत मुंबईच्या १९ वर्षांखालील किंवा २३ वर्षांखालील संघाचं प्रतिनिधित्व केलं असेल. त्या खेळाडूंचा या श्रेणीत समावेश केला जाईल. तर तिसरी श्रेणी ही मुंबईतील लोकल खेळाडूंसाठी असणार आहे.

पहिल्या श्रेणीत असलेल्या खेळाडूंची मुळ किंमत ही ५ लाख रुपये इतकी असणार आहे. तर दुसऱ्या श्रेणीत असलेल्या खेळाडूंची मुळ किंमत ही ३ लाख रुपये आणि तिसऱ्या श्रेणीत असलेल्या खेळाडूंची मुळ किंमत ही २ लाख रुपये इतकी असणार आहे. ज्या खेळाडूंचा आयकॉन म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यांना प्रत्येकी २० लाख रुपये मानधन दिले जाणार आहे.

हे आहेत या स्पर्धेतील आयकॉन खेळाडू

सूर्यकुमार यादव ( ट्रायम्प नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट)
अजिंक्य रहाणे ( बांद्रा ब्लास्टर्स)
श्रेयस अय्यर ( सोबो मुंबई फाल्कन्स )
पृथ्वी शॉ ( नॉर्थ मुंबई पँथर्स)
शिवम दुबे ( आर्क्स अंधेरी)
शार्दुल ठाकूर ( इगल ठाणे स्ट्रायकर्स)
सरफराज खान ( आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबअर्ब्स)
तुषार देशपांडे (मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स)