Gautam Gambhir Returning Home Ahead Of IND vs ENG 1st Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर वैयक्तिक कारणास्तव भारतात परतणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार आईला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे गंभीरला इंग्लंडमधून तत्काळ भारतात यावं लागणार आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, गौतम गंभीरच्या आई सीमा गंभीर यांना ११ जूनला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे गंभीरने भारतीय संघाची साथ सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला. माध्यमातील वृत्तानुसार, तो पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी १७ जूनला भारतीय संघासोबत जोडला जाऊ शकतो.
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी कर्णधार म्हणून शुबमन गिलची निवड करण्यात आली आहे. तर ऋषभ पंतची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ पहिल्यांदाच इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. गेल्या आठवड्यात भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत.
पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी सराव करायला सुरूवात केली आहे. पहिला कसोटी सामना हेडिंग्लेच्या मैदानावर रंगणार आहे. २०२५–२७ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप हंगामातील भारतीय संघाची ही पहिलीच मालिका असणार आहे. या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड २०२५ कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी: २० ते २४ जून – हेडिंग्ले, लीड्स
दुसरी कसोटी: २ ते ६ जुलै – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी: १० ते १४ जुलै – लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी: २३ ते २७ जुलै – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी: ३१ जुलै ते ४ ऑगस्ट – द ओव्हल, लंडन
इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ:
शुबमन गिल ( कर्णधार) यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत ( यष्टीरक्षक/ उपकर्णधार), केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदिप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव</p>