scorecardresearch

IPL 2023: आयपीएलच्या १६व्या हंगामासाठी कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वे जाहीर; पॉझिटिव्ह खेळाडूंसाठी असणार ‘हे” नियम

IPL 2023 Medical Guidelines: आयपीएल २०२३ मध्ये, कोविड पॉझिटिव्ह खेळाडूंना ५ ते ७ दिवस वेगळे राहावे लागेल. या दरम्यान, तो कोणत्याही प्रकारच्या क्रियाकलाप आणि कार्यक्रमात त्याच्या टीममध्ये सामील होऊ शकणार नाही.

IPL 2023 Medical Guidelines
आयपीएल ट्रॉफी (फोटो-संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

Medical guidelines for IPL 2023: क्रीडा जगतात आता कोरोनाची फारशी भीती राहिलेली नाही. क्रिकेटपासून इतर खेळांपर्यंत आता कोविड पॉझिटिव्ह खेळाडूंनाही मैदानात उतरण्याची परवानगी मिळत आहे. गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकापासून आतापर्यंत कोविड पॉझिटिव्ह खेळाडू क्रिकेटमधील जवळपास प्रत्येक लीग आणि द्विपक्षीय मालिकांमध्ये प्लेइंग इलेव्हनचा भाग आहेत. पण आयपीएल २०२३ मध्ये असे होणार नाही.

आयपीएल २०२३ साठी जारी करण्यात आलेल्या वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, कोविड पॉझिटिव्ह खेळाडूला आठवडाभर वेगळे राहावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे लिहिले आहे की, ‘भारतात कोविड -१९ च्या प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. परंतु नियमित अंतराने समोर येत असलेल्या सर्व भिन्न प्रकारांबद्दल आपल्याला सतर्क राहावे लागेल. अशा परिस्थितीत, पॉझिटिव्ह असलेल्या खेळाडूंना जास्तीत जास्त सात दिवस वेगळे राहावे लागू शकते. एकाकीपणाच्या या काळात, कोविड पॉझिटिव्ह खेळाडूला सामन्यांपासून तसेच सर्व प्रकारच्या क्रियाकलाप आणि कार्यक्रमांपासून दूर राहावे लागेल.

हेही वाचा – Suryakumar Yadav: टी-२० मधील हिरो सूर्या वनडेत झिरो; चाहत्यांकडून ‘या’ खेळाडूला संधी देण्याची होतेय मागणी

५ दिवसांनंतरही संघात सामील होऊ शकतात हे खेळाडू –

आयपीएल २०२३ साठी ही वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे या आठवड्यात सर्व फ्रँचायझींना देण्यात आली आहेत. यात असेही लिहिले आहे की, जर कोविड पॉझिटिव्ह खेळाडू पाचव्या दिवशी चाचणीत निगेटिव्ह आला आणि त्यानंतर २४ तासांच्या आत त्याचा दुसरा चाचणी अहवालही निगेटिव्ह आला, तर ते सहाव्या दिवसापासून संघात सामील होऊ शकतात.

गेल्या वर्षी ऑगस्टपासून मिळत आहे सवलत –

कॉमनवेल्थ गेम्स २०२२ पासून क्रिकेटमधील कोविड पॉझिटिव्ह खेळाडूंना सामन्यात सहभागी होण्याची परवानगी मिळू लागली. कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात महिलांच्या टी-२० विश्वचषकाचा सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ताहिला मॅकग्राला कोविड पॉझिटिव्ह असूनही प्लेइंग इलेव्हन मध्ये स्थान देण्यात आले होते. तेव्हापासून क्रिकेटमध्ये अनेक प्रसंगी खेळाडू कोविड पॉझिटिव्ह असूनही खेळताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 22:14 IST