पीटीआय, लंडन
कसोटी सामन्यांची मालिका किमान तीन सामन्यांची असावी आणि पाहुण्या संघाचा खर्च यजमान संघाने करावा अशी शिफारसी मेरिलीबोन क्रिकेट समितीच्या (एमसीसी) जागतिक क्रिकेट समितीने केली आहे. क्रिकेटचे नियम बनविणाऱ्या ‘एमसीसी’च्या जागतिक क्रिकेट समितीची बैठक दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे पार पडली.
या बैठकीत वेस्ट इंडिजच्या ऑस्ट्रेलियावरील विजयाचे कौतुक करण्यात आले. मात्र, मालिका दोन सामन्यांचीच असल्यामुळे ती बरोबरीत सुटली आणि विंडीजला आणखी संधी मिळाली नाही याबाबत खेद व्यक्त करण्यात आला.
सध्या कसोटी क्रिकेट रोमहर्षक होत असून, त्यातील उत्कंठा कायम रहावी यासाठी २०२८पासून ‘आयसीसी’ने कसोटी मालिका किमान तीन सामन्यांच्या खेळवाव्यात असे मत जागतिक समितीने मांडले. त्याचवेळी पूर्ण सदस्य, सहयोगी सदस्य यांच्यामधील असमानता नष्टकरुन अनोळखी देशात क्रिकेट वाढविण्याची सूचना देखील जागतिक समितीने केली आहे.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये या वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकामुळे अमेरिकेतील २०२८च्या ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर तेथील क्रिकेटसाठी स्वतंत्र बाजारपेठ निर्माण होण्यास चालना मिळेल, असे मतही या समितीने मांडले आहे.
त्याचबरोबर या समितीने मालिकेतील पाहुण्या संघाच्या खर्चाची जबाबदारी यजमान मंडळाने उचलावी अशी महत्वपूर्ण सूचना केली आहे. आतापर्यंत पाहुण्या संघाचा खर्च त्यांचे क्रिकेट मंडळ करत होते. यजमान संघाच्या मंडळाला प्रसारमाध्यमाच्या हक्काची सर्व रक्कम मिळत असते. पण, या जुन्या पद्धतीचा पुनर्विचार करण्याची वेळ आल्याचे जागतिक समितीचे मत पडले आहे. खर्चाची ही असमानता लक्षात घेता भविष्यात यजमान मंडळाला पाहुण्या संघाचा खर्च करण्यास सांगावे असे या समितीने म्हटले आहे.