चेन्नई : मुंबईकर शार्दूल ठाकूरची (३३ चेंडूंत ५१ धावा) आक्रमक खेळी आणि युवा अष्टपैलू राज अंगद बावाच्या (४/११) प्रभावी माऱ्याच्या जोरावर भारत-अ संघाने मंगळवारी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड-अ संघावर १०६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारत-अ संघानेही तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारत-अ संघाने ४९.३ षटकांत २८४ धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसन (५४) आणि तिलक वर्मा (५०) यांनी अर्धशतकी खेळी केल्या. मात्र, अखेरच्या षटकांत शार्दूलने केलेली फटकेबाजी भारतासाठी महत्त्वाची ठरली. शार्दूलने ३३ चेंडूंत ५१ धावा करताना चार चौकार आणि तीन षटकार लगावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड-अ संघाचा डाव ३८.३ षटकांत १७८ धावांतच आटोपला. डेन क्लेवर (८३) आणि चॅड बोवेस (२०) यांनी अर्धशतकी सलामी दिली. मात्र, त्यानंतर राज बावाच्या गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचा डाव गडगडला. चार गडी बाद करणाऱ्या राज बावाला राहुल चहर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत चांगली साथ दिली.