भारतीय दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजवर सरावात नापास होण्याची नामुष्की ओढवली. कुचकामी फलंदाजी आणि स्वैर मारा केल्यामुळे वेस्ट इंडिजला भारतीय ‘अ’ संघाकडून ९ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. भारतीय ‘अ’ संघाने वेस्ट इंडिजचा १४८ धावांमध्येच खुर्दा उडवला, तर विजयासाठी आवश्यक आव्हान फक्त एक फलंदाज गमावत पूर्ण केले. अमित मिश्राचे तीन बळी उन्मुक्त चंदच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतीय ‘अ’ संघाने विजयादशमीच्या मुहूर्तावर विजयाचा आनंद लुटला.
नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजने फलंदाजीचा निर्णय घेत स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत वेस्ट इंडिजच्या तोंडचे पाणी पळवले. सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी ठरावीक फरकाने वेस्ट इंडिजला धक्के दिले आणि त्यामधून ते सावरू शकले नाहीत. मिश्राने अचूक मारा करत कर्णधार किरॉन पोलार्ड (२), डॅरेन सॅमी (०), जरम टेलर (०) या तिघांनाही त्रिफळाचीत करत वेस्ट इंडिजचे कंबरडे मोडले. मार्लोन सॅम्युअल्सने ९ चौकारांच्या जोरावर ५६ धावांची खेळी साकारली, तर दुसरी सर्वाधिक धावसंख्या अवांतर धावांची (२८) होती.
वेस्ट इंडिजच्या आव्हानाचा पाठलाग करताना उपाहारापूर्वी भारताने एकही फलंदाज न गमावता ३५ धावा केल्या होत्या. उपाहारानंतर भारताला मुरली विजयची (२६) विकेट गमवावी लागली. पण दुसरा सलामीवीर उन्मुक्त चंदने मुक्तपणे फलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीची त्रेधा उडवली. चंदने ८१ चेंडूंत ११ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद ७९ धावांची देखणी खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज : ३८.१ षटकांत सर्वबाद १४८ (मार्लन सॅम्युअल्स ५६; अमित मिश्रा ३/२६) पराभूत वि. भारत ‘अ’ : २५.३ षटकांत १ बाद १४९ (उन्मुक्त चंद नाबाद ७९, करुण नायर नाबाद २७; केमार चोर १/२८)
गोलंदाजांनी विजयाचा पाया रचला -चंद
या सामन्याचा पाया गोलंदाजांनीच रचला. त्यांनी भेदक मारा करत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना नामोहरम केले, त्या वेळी संघाचे मनोबल वाढले. त्यामुळे फलंदाजीला जाताना आमच्यावर जास्त दडपण नव्हते, असे अर्धशतकवीर चंदने सामन्यानंतर सांगितले.