IND vs NZ ICC Rules For Champions Trophy 2025 Final: भारत वि. न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हा सामना ९ मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंडचे संघ एकदा गट टप्प्यात आमनेसामने आले होते, तेव्हा टीम इंडियाने विजय मिळवला होता. मात्र, सध्या न्यूझीलंड संघही चांगल्या फॉर्मात आहे. यादरम्यान जर पावसामुळे हा अंतिम सामना रद्द झाला तर विजयी संघ कसा ठरणार, हे जाणून घेऊया.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये अजूनही अपराजित आहे. प्रथम, भारताने गट टप्प्यातील तिन्ही सामने जिंकले, त्यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर न्यूझीलंड संघाने गट टप्प्यात भारताविरुद्ध केवळ एकच सामना गमावला आहे. म्हणजेच हा सामना मोठआ अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.

आता पाऊस आणि हवामानाचा अंदाज जाणून घेऊया. Accuweather च्या अहवालानुसार तर दुबईमध्ये ९ मार्चला पाऊस पडण्याची शक्यता नाही. पण तरीही पाऊस पडला आणि सामना थांबला तर आयसीसीने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाचीही व्यवस्था केली आहे. म्हणजे जर ९ मार्चला सामना होऊ शकला नाही तर तो १० मार्चला सामना खेळवला जाईल. जर ९ मार्चला अर्धा सामना खेळवण्यात आला आणि पावसामुळे सामना थांबवावा लागला तर १० मार्चला पुन्हा तिथूनच सामना खेळवण्यात येईल. जेणेकरून दोन्ही संघांना जेतेपद पटकावण्याची बरोबरीची संधी मिळेल.

२००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि श्रीलंकेने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. त्यादरम्यान दोन्ही दिवशी सामना होऊ शकला नाही. त्यानंतर आयसीसीच्या नियमानुसार दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. यंदाही पाऊस पडला तर असाच निकाल लागण्याची शक्यता आहे. आयसीसीनुसार अंतिम सामना पूर्ण व्हायला हवा. हे शक्य नसल्यास संयुक्त विजेते घोषित केले जातील. अंतिम फेरीत आधी खेळलेल्या सामन्यांच्या आधारे निर्णय घेतला जाणार नाही. सामन्याच्या दिवशी जो संघ विजयी होईल तो जेतेपद पटकावेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचा न्यूझीलंडविरूद्ध आयसीसीच्या स्पर्धेतील रेकॉर्ड फार चांगला नाही. न्यूझीलंडचा संघ भारतीय संघावर वरचढ ठरला आहे. २००० साली भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना झाला होता, त्यावेळी न्यूझीलंडने बाजी मारली होती. त्यानंतर आता तब्बल २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारत आणि न्यूझीलंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना होणार आहे.