भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू जेव्हा क्रिकेट मैदानात असतात तेव्हा दोन्ही संघातील खेळाडूंव्यतिरिक्त सामना पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींचाही श्वास रोखला जातो. या दोन्ही संघातील सामने खूपच रोमांचक असतात. प्रत्येक खेळाडू आणि चाहत्यावर एक वेगळ्या प्रकारचं दडपण असतं. पण सामना संपल्यानंतर किंवा सामना सुरू होण्यापूर्वी या दोन देशातील खेळाडू जेव्हा एकमेकांना भेटतात. तेव्हा त्यांच्यात नेमकं काय बोलणं होतं? त्यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा रंगतात? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक क्रिकेटप्रेमींची असते. या सर्व प्रश्नांची उत्तरे भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांनी दिली आहेत.

खरं तर, आजपासून (१६ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक सुरू होत आहे. याच्या एक दिवस आधी शनिवारी सर्व १६ संघांचे कर्णधार एकत्रित आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित आणि बाबर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.

यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने म्हटलं की, जेव्हाही मी भारतीय खेळाडू किंवा रोहित शर्माला भेटतो, तेव्हा त्याच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतंय आम्ही क्रिकेटबाबत तर बोलतही नाही. रोहित माझ्यापेक्षा मोठा आहे. त्यामुळे त्याच्याकडून त्याच्या अनुभवातून काही गोष्टी शिकण्याचाप्रयत्न करत असतो.

हेही वाचा- बुमराबाबत धोका पत्करणे जोखमीचे -रोहित शर्मा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर रोहित म्हणाला की, आम्हाला खेळाचं महत्त्व माहीत आहे. पण सतत क्रिकेटबद्दल बोलत राहणं आणि स्वत:वर दबाव आणत राहणं, योग्य नाही. आम्ही जेव्हा एकमेकांना भेटतो, तेव्हा घरी काय स्थिती आहे? कुटुंब कसं आहे? जीवन कसं सुरू आहे? कोणती नवीन गाडी खरेदी केली? किंवा कोणती नवीन गाडी खरेदी करणार आहेस? अशा गप्पा होतात, असा खुलासा रोहितने केला आहे.