संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सकडून चेन्नई सुपर किंग्सकडे तर रवींद्र जडेजा आणि सॅम करन चेन्नईहून राजस्थानच्या ताफ्यात अशा व्यवहाराची चर्चा जोरात सुरू आहे. दोन्ही संघांनी यासंदर्भात अधिकृतपणे कशालाही दुजोरा दिलेला नाही मात्र पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू आहेत. केएल राहुल दिल्लीकडून कोलकाताकडे जाणार अशाही बातम्या समोर येत आहेत. सर्वसाधारणपणे आयपीएलसाठी खेळाडू लिलावात खरेदी केले जातात. मात्र सध्या ट्रेडऑफ्सची चर्चा आहे. काय असतात ट्रेडऑफ्स, हा व्यवहार कसा होतो जाणून घेऊया

ट्रेडऑफ्स काय असतो?

एका संघातील खेळाडू लिलावाव्यतिरिक्त ज्या प्रक्रियेद्वारे अन्य संघांत जातो त्याला ट्रेडऑफ्स म्हणतात. हा व्यवहार ऑल कॅश डील म्हणजे पूर्णत: पैसे देऊन किंवा प्लेयर फॉर प्लेयर स्वॅप म्हणजे फलंदाजाच्या बदल्यात फलंदाज अशा पद्धतीने केला जातो. आयपीएलच्या नियमानुसार, हंगाम सुरू झाल्यानंतर प्लेयर ट्रेडिंग विंडो खुली होते. लिलावाच्या आधी एक आठवडा ही विंडो बंद होते. लिलावानंतर पुढचा हंगाम सुरू होण्याच्या एक महिना आधीपर्यंत ही विंडो सुरू राहते.

आयपीएलमध्ये ट्रेडऑफ्स होतात का?

२००९ म्हणजे पहिला हंगाम झाल्यानंतर ट्रेडऑफ्सला सुरुवात झाली. त्यावेळी मुंबई इंडियन्सने धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनला दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं. आशिष नेहरा मुंबईकडून दिल्लीच्या ताफ्यात दाखल झाला.

वन वे ट्रेड काय असतो?

एखादा खेळाडू अ संघाकडून ब संघाकडे जातो. या व्यवहारासाठी अ संघव्यवस्थापन ब संघव्यवस्थापनाला ऑल कॅश डीलअंतर्गत पैसे देतात. लिलावात अ संघाने त्या विशिष्ट खेळाडूला खरेदी करण्यासाठी जेवढी रक्कम मोजलेली असते तेवढी रक्कम ब संघ अ संघाला देतो. २०२२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने गुजरातकडून लॉकी फर्ग्युसन आणि रहमनुल्ला गुरबाझ यांना ऑल कॅश डीलअंतर्गत संघात समाविष्ट केलं होतं.

टू वे ट्रेड का आहे?

दोन खेळाडूंची अदलाबदल होते त्याला टू वे ट्रेड म्हटलं जातं. दोघांना लिलावात मिळालेल्या रकमेत जेवढा फरक असतो तेवढा दुसरा संघ भरून काढतो.

खेळाडूंची ट्रेडऑफ्समध्ये काय भूमिका असते?

खेळाडूंची अनुमती घेतलेली असणं अनिवार्य असतं. २०२३ हंगाम संपल्यानंतर मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. ऑल कॅश डील किंवा प्लेयर स्वॅप यापैकी दोन्ही पर्याय पडताळण्यात आले. हार्दिक पंड्याने मुंबईकडे परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. दोन्ही संघव्यवस्थापनांदरम्यान झालेल्या चर्चेंनंतर मुंबई इंडियन्स संघाने १५ कोटी रुपये देऊन ऑल कॅश डील अंतर्गत हार्दिकला आपल्या संघात घेतलं.

याच कारणासाठी रवींद्र जडेजावर बंदीची कारवाई का करण्यात आली होती?

२०१० मध्ये रवींद्र जडेजावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी राजस्थान रॉयल्सचा भाग असलेल्या जडेजाने संघाबरोबर करार नूतनीकरणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली नाही. त्याचवेळी त्याने वैयक्तिक पातळीवर मुंबई इंडियन्सबरोबर चर्चा सुरू केली. वैयक्तिक खेळाडूने अशा पद्धतीने फ्रँचाइजींशी चर्चा-वाटाघाटी करणे हे तत्कालीन नियमांचा भंग करणारे होते.

ट्रेडऑफ संदर्भात अंतिम निर्णय कुणाचा असतो?

कोणत्या खेळाडूला खरेदी करायचं किंवा कोणाला देऊन टाकायचं याचा सर्वाधिकार फ्रँचाइजींकडे असतो.

ट्रान्सफर फी काय असते? ती कोण ठरवतं? त्यावर काही निर्बंध असतात का?

खेळाडूला लिलावात मिळालेल्या रकमेव्यतिरिक्त आणखी रक्कम एका संघ दुसऱ्या संघाला देतो त्याला ट्रान्सफर फी असं म्हटलं जातं. २०२३ मध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघात परतला. या ट्रेडची अनेक महिने चर्चा होती. सुरुवातीला हार्दिक गुजरातकडेच राहणार अशा बातम्या समोर आल्या. मात्र अखेर मुंबई इंडियन्सने हार्दिकला ताफ्यात सामील केल्याचं स्पष्ट झालं. मुंबईने हार्दिकला खरेदी करण्यासाठी गुजरातला ट्रान्सफर फी दिली मात्र ती रक्कम किती याबाबत माहिती देण्यात आली नाही. खेळाडू खरेदीचा व्यवहार पूर्ण होण्याआधी दोन्ही संघव्यवस्थापन ट्रान्सफर फी संदर्भात निर्णय घेतात.ट्रान्सफर फी किती असावी याला कोणताही मर्यादा नाही. ही रक्कम नेमकी किती याची माहिती आयपीएल, व्यवहाराशी निगडीत फ्रँचाइजी आणि खेळाडू यांनाच माहिती असते.

खेळाडूला ट्रान्सफर फी मधला वाटा मिळतो का?

हो. करारानुसार, खेळाडूला ट्रान्सफर फी मधला ५० टक्के वाटा मिळू शकतो. पण हे खेळाडू आणि संबंधित संघादरम्यान झालेल्या करारावर अवलंबून आहे. ट्रान्फसर फीचा ठराविक हिस्सा मिळेलच असा काहीही नियम नाही.

ट्रान्सफर फी आणि लिलावात खेळाडूला मिळणारी रक्कम यांचा परस्परसंबंध असतो का?

नाही. ट्रान्सफर फी आणि लिलावात खेळाडूला मिळणारी रक्कम या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत.

ज्या संघांची आर्थिक ताकद जास्त ते खेळाडूंना जास्त ट्रान्सफर रक्कम देऊन आपल्याकडे वळवू शकतात का?

तांत्रिकदृष्ट्या याचं उत्तर हो असं आहे. लिलावात फ्रँचाइजींना मिळणाऱ्या रकमेव्यतिरिक्त आणखी पैसे देऊन खेळाडू खरेदी केले जाऊ शकतात.मात्र कोणताही व्यवहार खेळाडू ज्या मूळ संघाचा आहे त्यांच्या परवानगीविना होऊ शकत नाही.

संजू सॅमसन (चेन्नई-राजस्थान) व्यवहार कसा आहे?

संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सने १८ कोटी रुपये देऊन रिटेन केलं होतं. संजू सॅमसन राजस्थानचा कर्णधार आणि विकेटकीपर आहे. … हंगामापासून संजू राजस्थानकडून खेळतो आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ४३ वर्षांचा आहे. धोनीनंतर कोण असा प्रश्न चाहत्यांसमोर आहे तसाच संघव्यवस्थापनासमोरही. संजूला संघात घेतल्यास कॅप्टन आणि विकेटकीपर असे दोन्ही विषय मार्गी लावू शकतात. कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे राहिल्यास संजू विशेषज्ञ विकेटकीपर बॅट्समन म्हणून खेळू शकतो. संजूचा स्वत:चा असा फॅनबेस आहे. दाक्षिणात्य राज्यांमध्ये त्याची लोकप्रियता प्रचंड आहे. संघाची जी गरज असेल त्यानुसार खेळणारा खेळाडू अशी त्याची ओळख आहे.

संजू सॅमसन चेन्नई संघात आल्यास, चेन्नईकडून रवींद्र जडेजा राजस्थानकडे रवाना होऊ शकतो. रवींद्र जडेजाला १८ कोटी रुपये खर्चून चेन्नईने रिटेन केलं होतं. २०१८, २०२१ आणि २०२३ मध्ये आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा तो अविभाज्य भाग होता. महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर जडेजाकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. मात्र हंगामादरम्यानच जडेजाने कर्णधारपद सोडलं होतं.
२००८-०९ अशा दोन हंगामात जडेजा राजस्थानकडून खेळला होता. निष्णात फिरकीपटू, उत्तम फलंदाज आणि अफलातून क्षेत्ररक्षक अशी जडेजाची ख्याती आहे. जडेजाचा समावेश झाल्यास राजस्थानच्या संघाला तिन्ही आघाड्यांवर बळकटी मिळू शकते. जडेजाच्या बरोबरीने आणखी एक खेळाडू चेन्नईकडून राजस्थानकडे जाण्याची शक्यता आहे.