DC vs RCB Match Richa Ghosh Video Viral : महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम रोमांचक वळण घेत आहे. रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघाने एका धावेने विजय मिळवला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना जेमिमा रॉड्रिग्जच्या वेगवान अर्धशतकाच्या जोरावर ५ बाद १८१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीने रिचा घोषच्या झुंजार अर्धशतकीच्या जोरावर ७ बाद १८० धावा केल्या आणि त्यांना एका धावेने पराभव पत्करावा लागला. ज्यामुळे रिचा घोषला अश्रू अनावर झाले, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोषने आरसीबीला विजयाच्या जवळ नेले होते, परंतु नशीब तिच्या बाजूने नव्हते आणि शेवटच्या चेंडूवर ती धावबाद झाली. जेव्हा संघाला विजयासाठी एका चेंडूत दोन धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर धावबाद होण्यापूर्वी रिचाने २९ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांसह ५१ धावा केल्या होत्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजयापर्यंत नेऊ न शकल्यामुळे, ऋचा घोष मैदानाच्या मध्यभागी रडू लागली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रिचाशिवाय एलिस पेरीने ४९ धावा, सोफी मोलिनक्सने ३३ धावा आणि आरसीबीकडून सोफी डिव्हाईनने २६ धावा केल्या. आरसीबीने दुसऱ्याच षटकात कर्णधार स्मृती मंधानाची विकेट गमावली होती, परंतु सोफी मोलिनक्स आणि एलिस पेरी यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ५७ चेंडूत ८० धावांची भागीदारी करून संघाला आणखी धक्का बसू दिला नाही. पेरी धावबाद झाल्यानंतर मोलिनक्सही पॅव्हेलियनमध्ये परतली. सोफी डिव्हाईन (१६ चेंडूत २६ धावा, एक चौकार, दोन षटकार) आणि रिचा यांनी चौथ्या विकेटसाठी ३२ चेंडूत ४९ धावा करत संघाच्या आशा जिवंत ठेवल्या. डेविन बाद झाल्याने सर्वांच्या नजरा रिचावर खिळल्या होत्या.

हेही वाचा – NZ vs AUS : ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय, न्यूझीलंड ३१ वर्षांचा दुष्काळ संपवण्यात अपयशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटच्या षटकात रिचाची दमदार फटकेबाजी –

जेस जोनासेनच्या शेवटच्या षटकात आरसीबीला विजयासाठी १७ धावा करायच्या होत्या. रिचाने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, पुढच्या चेंडूवर एकही धाव झाली नाही. दिशा कासट तिसऱ्या चेंडूवर धावबाद झाली. ऋचाने चौथ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या आणि पुढच्या चेंडूवर डीप मिडविकेटवर गगनचुंबी षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र शेवटच्या चेंडूवर शफाली वर्मा आणि जोनासेनने रिचाला धाबबाद करून आरसीबीला मोठा धक्का दिला.