WPL 2025 MI vs DC Delhi Capitals beat Mumbai Indians by 2 wickets : महिला प्रीमियर लीग २०२५ मधील दुसऱ्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा २ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत १६४ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात दिल्लीने शेवटच्या चेंडूवर दोन धावा करत २ विकेट्सनी विजयावर शिक्कामोर्तब केला आहे.

वडोदऱ्यातील कोटाम्बी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना नॅट सिव्हर ब्रंटच्या नाबाद ८० धावा आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या ४२ धावांच्या योगदानाच्या जोरावर १६४ धावां केल्या होत्या. या दोन फलंदाजांना व्यतिरिक्त मुंबईच्या आठ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. दिल्लीकडून अ‍ॅना सदरलँडने सर्वाधिक ३ आणि शिखा पांडेनेही २ विकेट घेतल्या.

दिल्लीसाठी शफाली वर्माने केल्या सर्वाधिक धावा –

मुंबईने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात खूप चांगली झाली. कर्णधार मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा यांनी पॉवर प्लेमध्येच संघाची धावसंख्या ६० च्या पुढे नेले. लॅनिंग १५ धावा काढून बाद झाली, तर शफालीने फक्त १८ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ४३ धावा केल्या. मधल्या षटकांमध्ये दिल्ली विजयापासून दूर जात असल्याचे दिसत होते, पण निक्की प्रसादने ३३ चेंडूत ३५ धावांची संथ पण महत्त्वाची खेळी करत संघाला विजयाच्या जवळ पोहोचवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या सामन्यात दिल्लीने मारली बाजी –

शेवटच्या षटकांमध्ये रनआऊटसाठी अनेक अपील झाले, पण दिल्लीच्या नशिबात विजय लिहिला गेला होता, त्यामुळे मुंबईला त्याचा फायदा झाला नाही. राधा यादवने १९ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार मारल्याने दिल्लीने सामन्यात पुनरागमन केले. यानंतर शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर दिल्लीला २ धावांची आवश्यकता होती. अरुंधती रेड्डीने चेंडू मारला आणि राधा यादवसह दोन धावा घेतल्या. मात्र, दिल्लीसाठी चांगली गोष्ट म्हणजे अरुंधती रेड्डी दुसरी धाव घेताना वेळेत क्रीजमध्ये पोहोचली, ज्यामुळे रनआऊट होण्यापासून थोडक्यात वाचली आणि दिल्लीने विजयावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान साराह ब्राइसने १० चेंडूत २१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.