WTC Final: पावसामुळे भारताची Playing 11 बदलणार?; जडेजा किंवा अश्विनऐवजी ‘या’ खेळाडूला मिळू शकते संधी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्याने आजपासून हा सामाना सुरु होत असून आज ९८ षटकांचा खेळ होण्याची शक्यता आहे

WTC Final India vs New Zealand virat kohli
संघ बदल करायचा झाल्यास कर्णधार विराट कोहली रविंद्र जडेजा आणि आर. अश्विनपैकी एकाची निवड करु शकतो. (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य : रॉयटर्स आणि फाइल फोटो)

भारत आणि न्यूझीलंडच्या संघांमधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा (World Test Championship Final) पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमानुसार राखीव दिवस खेळण्यासाठी उपलब्ध झाला आहे. पावासाची शक्यता असल्याने २३ जूनचा राखीव दिवस कसोटी नियोजनाच्या वेळेस ठेवण्यात आलेला. त्यामुळेच आता २३ जूनपर्यंत ही कसोटी चालणार आहे. मात्र पावसामुळे कसोटीचा राखीव दिवस वापरण्याबरोबरच संघातील समीकरणंही बदलू शकतात. पावसामुळे भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंपैकी एकाला डच्चू मिळू शकतो तर या पावसामुळे एका खेळाडूला संघात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने शुक्रवारी विजेत्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार गुरुवारी सायंकाळपासूनच पावसाला प्रारंभ झाला. शुक्रवारी पहिल्या दिवशी मुसळधार पावसामुळे सहा तासांचा खेळ वाया गेला. त्यामुळे मैदानावर पाणी साचले होते. उत्तम जलनिचरा करण्याची प्रणाली असतानाही सलामीच्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे शनिवारी ९८ षटकांचा खेळ होणार आहे. मात्र या सर्व गोंधळामध्ये भारतासाठी सर्वात समाधानाची गोष्ट म्हणजे अद्याप नाणेफेक झालेली नाही. त्यामुळेच साऊदम्पटनमध्ये पाऊस पडल्यानंतरची मैदानाची परिस्थिती लक्षात घेता भारतीय संघ अंतिम ११ खेळाडूंबद्दल पुन्हा एकदा विचार करु शकतो.

नक्की वाचा >> WTC Final: भारत-न्यूझीलंडदरम्यानचा सामना भारतात कधी, कुठे आणि किती वाजता पाहता येणार?

सध्या संघात कोण?

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी सुद्धा अंतिम ११ खेळाडूंच्या यादीमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केलीय. गावस्कर हे अंतिम सामन्यामध्ये समालोचन करण्यासाठी सध्या साऊदम्पटनमध्ये आहेत. दोन फिरकी गोलंदाजांऐवजी भारत एक फिरकी गोलंदाज खेळवण्याचा विचार करु शकतो. दोन फिरकी गोलंदाज खेळवण्याऐवजी एक फिरकी गोलंदाज संघात ठेऊन दुसऱ्या गोलंदाजाऐवजी अतिरिक्त फलंदाजाला संधी देता येईल. अंतिम सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडूंच्या यादीत रविंद्र जडेजा आणि आर. अश्वीन या दोघांचा सहभाग आहे. पावसामुळे खेळपट्टीसुद्धा फिरकी गोलंदाजांपेक्षा जलदगती गोलंदाजांना अधिक फायद्याची ठरेल असा अंदाज आहे. यामुळेच भारत अंतिम संघासंदर्भात पुन्हा विचार करु शकतो. भारताने गुरुवारी जाहीर केलेल्या अंतिम ११ खेळाडूंच्या यादीमध्ये तीन जलदगती गोलंदाज आहेत तर दोन फिरकी गोलंदाज आहेत. फिरकी गोलंदाजीची जबाबादरी रविंद्र जडेजा आणि आर. अश्विनच्या खांद्यावर असेल. तर जसप्रित बुमरा, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा वेगवान गोलंदाजीची धुरा संभाळतील.

नक्की वाचा >> India vs Sri Lanka Series: क्वारंटाइनमध्ये असणाऱ्या पृथ्वीच्या बेडवर दिसली अशी वस्तू की चाहत्यांनी केलं ट्रोल

गावस्कर म्हणतात संधी दिली जाऊ शकते…

“सध्याची परिस्थिती पाहता न्यूझीलंडच्या जलदगती गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. फलंदाजी करताना ऋषभ पंत सातव्या क्रमांकावर येऊ शकतो आणि एक अतिरिक्त फलंदाजाला संधी दिली जाऊ शकते. हवामानाचा अंदाज घेतल्यास एका फिरकी गोलंदाजाला बाहेर बसवलं जाण्याची शक्यता आहे,” असं सुनील गावस्कर म्हणाले.

कोण जाणार कोण येणार?

संघ बदल करायचा झाल्यास कर्णधार विराट कोहली रविंद्र जडेजा आणि आर. अश्विनपैकी एकाची निवड करुन दुसऱ्याच्या जागी हनुमा विहारीला संधी देऊ शकतो. १५ खेळाडूंच्या चमूपैकी अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान न मिळालेल्यामध्ये मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि ऋद्धिमान साहासोबत हनुमा विहारीचाही समावेश आहे. या खेळाडूंना अतिरिक्त खेळाडू म्हणून अंतिम १५ मध्ये निवडण्यात आलं आहे. या चौघांपैकी केवळ हनुमा विहारीच फलंदाज आहे. साहा यष्टीरक्षक आहे तर सिराज आणि उमेश यादव जलदगती गोलंदाज आहेत.

नक्की पाहा >> “तुझ्याकडे बघू की कॅमेराकडे?”; WTC Final विशेष मुलाखतीत बुमराहने मुलाखत घेणाऱ्या पत्नीलाच विचारला प्रश्न

नियम काय सांगतो?

आयसीसीच्या नियमांनुसार सामन्यासाठी निवडलेल्या संघामध्ये नाणेफेक होण्याच्या आधीपर्यंत बदल करता येतो. सुनील गावस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा नाणेफेक होताना दोन्ही कर्णधार एकमेकांना अंतिम खेळाडूंची यादी देतात तिच अंतिम खेळाडूंची यादी गृहित धरली जाते. त्यामुळे अगदी नाणेफेक होईपर्यंत अंतिम १५ खेळाडूंपैकी कोणालाही मैदानात उतरणाऱ्या ११ खेळाडूंमध्ये जागा दिली जाऊ शकते.

बदल न करण्याचे संकेत…

पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला असून अद्याप नाणेफेकही झालेली नसली, तरी भारतीय संघातील ११ खेळाडूंमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी स्पष्ट केले. न्यूझीलंडने अजूनही अंतिम संघ जाहीर केलेला नसून भारतालासुद्धा सद्यस्थितीचा आढावा घेऊन नाणेफेकीपूर्वी संघात बदल करण्याची संधी आहे.

नक्की पाहा >> Video : WTC Final आधी ऋषभ पंतला धोनीचा फोटो दाखवला तेव्हा…; एका क्षणी द्रविडचीही झाली आठवण

राखीव दिवस उपलब्ध

अंतिम लढतीसाठी २३ जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पावसामुळे हवामान किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव सामन्यातील खेळाचे नुकसान झाल्यास हा खेळ सहाव्या दिवशी खेळवण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता सहाव्या दिवशी खेळ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अतिरिक्त दिवसाचा खेळ होऊनही सामना अनिर्णीत राहिल्यास किंवा बरोबरीत (टाय) सुटल्यास भारत-न्यूझीलंड यांना संयुक्त जेतेपद बहाल करण्यात येईल.

सध्याचे संघ कसे आहेत?

*  भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा.

*  न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, कॉलिन डीग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जॅमीसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, इजाज पटेल, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Wtc final india vs new zealand indian may change final playing 11 after rain scsg