पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मंगळवारी भारताचे निवृत्त होत असणारे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. सतत्याने जैव-सुरक्षित वातावरणात म्हणजेच बायोबबलमध्ये राहण्याबरोबरच सातत्याने क्रिकेट खेळणे अत्यंत अवघड असते. त्यामुळे खेळाडू विचलित आणि अस्वस्थ होतात, असं शास्त्री म्हणाले होते. याच वक्तव्याची बबारने सहमती दर्शवली आहे.

यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या शेवटच्या सामन्याआधी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शास्त्री यांनी, “खेळाडूंची मानसिक तसेच शारीरिक दमछाक झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जैव-सुरक्षित वातावरणात राहण्याबरोबरच सातत्याने क्रिकेट खेळणे अत्यंत अवघड होते. विशेषत: ‘आयपीएल’नंतर विश्वचषकाच्या तयारीसाठी पुरेसा वेळच हाती नसल्याने आपोआप संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला,’’असे म्हटले होते. २०१२ नंतर पहिल्यांदाच भारत आयसीसी स्पर्धांच्या उपांत्यफेरीत न जाताच स्पर्धेबाहेर पडलाय.

याच संदर्भात बोलताना बाबरने पत्रकार परिषदेमध्ये आपलं मत मांडलं. “प्रोफेश्नल क्रिकेटमध्ये चढ-उतार येत असतात. मात्र हे खरं आहे की सतत बायो-बबलमध्ये राहून खेळाडू विचलित आणि अस्वस्थ होतात. आम्ही या समस्येला तोंड देण्यासाठी एकत्र काम करतोय आणि एक संघ म्हणून एकमेकांना आदार देतोय,” असं बाबर म्हणाला.

बायो-बबलमध्ये राहणं हे कठीण असल्याचंही बाबरने म्हटलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी जगभरातील सर्वच क्रीडा स्पर्धांमध्ये बायो-बबलची अट अनिवार्य करण्यात आली आहे. “एक खेळाडू म्हणून तुम्ही शांत राहणं आणि तणाव सहन करण्यास तयार असणं महत्वाचं असतं. मात्र अनेकदा तुमच्या मनाप्रमाणे कामगिरी होत नसेल तर तुम्हाला त्या वातावरणातून बाहेर येण्याची, थोडं फिरायला जाण्याची गरज असते. हे बायो-बबलमध्ये शक्य होतं नाही,” असं बाबरने स्पष्ट केलं.

“तुम्ही बायो-बबलमधून बाहेर पडू शकत नसाल तर तुमच्या डोक्यात नकारात्मक विचार येणार आणि त्याचा तुमच्या कामगिरीवर परिणाम होणार. आम्ही स्वत: या समस्येवर मात करण्यासाठी एक टीम म्हणून प्रयत्न करतोय आणि एकमेकांना कायम प्रोत्साहन देण्याचं काम करतोय,” असंही बाबरने स्पष्ट केलं.

उपांत्यफेरीमध्ये पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी, ११ नोव्हेंबर रोजी हा सामना होणार आहे.