डॉ. अरुणा टिळक

डॉक्टरांनी सांगितलेला डोस रुग्ण थोडे दिवस घेत असतो आणि त्याला बरे वाटल्यावर आपल्याच मर्जीने तो औषधे कमी करतो किंवा बंद करतो. काही रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे न घेता औषधविक्रेत्या दुकानदारांचा सल्ला घेतात. त्यामुळे त्या औषधांचे परिणाम जाणवण्याऐवजी दुष्परिणामच जाणवतात.

राजा नलाच्या विरहाने दमयंती व्याकूळ होते. तेव्हा तिच्या सख्या तिला काय औषध देऊ, असे विचारतात. तेव्हा ती म्हणते, ‘‘औषध न लगे मजला, औषध नल गे मजला.’’ म्हणजे माझ्या आजाराचे औषध हे स्वत: नल राजाच आहे. त्यावाचून दुसरे कोणतेच औषध माझ्यासाठी नाही.

मला वाटते आजकाल आमच्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण हा ‘औषध गूगल मजला, औषध न लगे मजला’ हा राग सर्वप्रथम आळवत असतो आणि त्या गूगलकृपेने आजारातून सुटका न झाल्यास डॉक्टर किंवा वैद्याची दवाखान्याची पायरी पावन करत असतो. आजकाल दवाखान्यात येणाऱ्या दहा रुग्णांपैकी पाच रुग्ण हे गूगलवरून माहिती घेऊन आलेले असतात. आल्या- आल्या मला काय झाले आहे, मी कोणत्या ब्लड टेस्ट केल्या आहेत, मी सोनोग्राफी केली आहे त्यातले मला नीटसे कळत नाही. आता मी सीटी स्कॅन/ एमआरआय करावा का, असे प्रश्न विचारतात.

पूर्वी काय व्हायचे, आपल्याकडे जेव्हा प्रथम रुग्ण यायचा स्वत:साठी किंवा आपल्या मुलांसाठी तेव्हा डॉक्टर त्यांना स्वत:जवळच्या गोळय़ा देत असत आणि बाहेरून काही औषधे देत असत. त्यावर लिहिलेलेही असे की पाच दिवस, सात दिवस घेणे; पण काही रुग्ण काय करायचे. मागच्या वेळी होत आहे तसेच आतासुद्धा झाले की केमिस्टला विचारून तेच औषध आणतात. असे ते दोन/तीनदा करत; पण आपल्याला ते दिलेले औषध हे प्रत्येक वेळी उपयोगी पडेलच असे नाही ना? किंवा त्या औषधाचा रेसिस्टन्स शरीरात निर्माण होतो. आपल्या मुलाचे वय वाढले की दोन वर्षांपूर्वीचाच डोस दिला तर ते कसे लागू होईल? हे कधी कधी त्यांच्या लक्षातच येत नाही. तर कधी असे होते की, वेदनाशामक औषधे दिली तर काही वेळा नंतर त्याची रिअ‍ॅक्शन येऊ शकते. त्यामुळे ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानीच घ्यावीत.

माझ्याकडे नेहमी एक २५ वर्षीय रुग्ण येत असे. त्याचे आईवडील दोघेही दिवसभर घरकाम, बिगारी काम करत असत. या मुलाला लहानपणापासून सांधेदुखीचा आजार होता. आईवडिलांना मुलाकडे बघायला वेळच नसे. तो केमिस्टकडे जाऊन, त्यांना विचारून वेदनाशामक गोळय़ा खात असे आणि काही वर्षांनंतर त्याचा रक्तदाब वाढत गेला. त्यावर नियंत्रण आणणे कठीण झाल्याने मूत्रपिंडावर परिणाम झाला आणि त्यास जिवास मुकावे लागले. हाच अनुभव मधुमेह, रक्तदाब यांच्या औषधांबाबतही होतो. डॉक्टरांनी सांगितलेला डोस रुग्ण थोडे दिवस घेत असतो आणि त्याला बरे वाटल्यावर आपल्याच मर्जीने तो औषधे कमी करतो किंवा बंद करतो. असे किती तरी रुग्ण बघितले आहेत की, दिवाळीमध्ये गोड खाण्यात आले की, शुगरची गोळी मी माझ्या मर्जीने जास्त घेतो (शुगर कंट्रोलला राहण्यासाठी); पण त्यांना कळत नाही की, अशामुळे रुग्ण हायप्लोगिसेमियामध्ये जाण्याचा धोका संभवू शकतो.

यू टय़ूबवर आरोग्याबाबत अनेक चित्रफिती आलेल्या आहेत. ते बघून त्याचा स्वत:वर प्रयोग करणारेही अनेक जण असतात; पण प्रत्येक वेळी ते सगळे उपाय यशस्वी होतीलच असे नाही. त्याचे दुष्परिणाम भयानकही असू शकतात. वजन कमी करणे, केस गळणे, केस पांढरे होणे आणि सेक्ससंबंधी समस्या यावर लोक डॉक्टरांकडे जाण्याआधी स्वत: गिनिपीग होतात आणि त्यांच्या समस्या बिकट झाल्या की आमच्याकडे येतात. कुणाचेही वजन पाच दिवसांत १० किलो/५ किलो कधीच कमी होत नाही. ते लोक छातीठोकपणे सांगतात; पण वजन कमी करण्यासाठी केलेल्या उपायांमुळे भयानक केसगळती, चेहरा निस्तेज होणे असे किती तरी रुग्ण बघितले आहेत. डोक्याला हेअरपॅक ‘एकदाच लावा’ आयुष्यभर केस काळे राहतील. अशा भूलथापांना बळी पडू नका, तर योग्य सल्ला घेऊन आहारात बदल करा. जंकफूड बंद करा. केसांना योग्य तेल लावा. म्हणजे केसांचे आरोग्य सुधारेल, असे उपाय दिले जातात. मात्र त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधोपचार करणे आवश्यक आहे.

औषधांच्या दुष्परिणामांचे कारणच काय? हा महत्त्वाचा प्रश्न प्राचीन आचार्यानासुद्धा आलेला होता. चरकाचार्य आपल्या ग्रंथात सांगतात. व्याधिसंकराची कारणे सांगताना महत्त्वाचे कारण अशुद्ध चिकित्सा म्हणजे तीत शुद्ध नसणे आणि एका रोगातून दुसरा रोग तयार होणे. एक रोग दाबून दुसरा निर्माण होणे.

आयुर्वेदामध्ये प्रत्येक रुग्णाला तपासून त्यानुसार चिकित्सा दिली जाते. म्हणजे त्याला जर ताप असेल तर त्यासाठी एकच ठरावीक औषध नसून त्याच्या प्रकृतीनुसार, त्याच्या वयानुसार त्याच्या शरीरातील अग्नीनुसार, त्या रोगाची काय वेगावस्था आहे. आजाराचा जोर किती आहे, या सर्वाचा विचार करून औषधे दिली जाते. त्यामुळे दुष्परिणामाचा धोका संभवत नाही. इथे मुख्यत: अग्नी (अन्न पचवणारी शक्ती) रोगी आणि औषधाच्या बलाचा विचार होणे आवश्यक आहे. तसेच रुग्ण गंभीर अवस्थेमधून जात असतानाही अग्नी, रोगी आणि व्याधी आजाराच्या बलापेक्षा औषधाची शक्ती जास्त असू नये, हा आयुर्वेदाचा मूलभूत विचार आपल्याला दुष्परिणामापासून दूर ठेवू शकतो.