माणसाच्या ठायी मन आहे, तशाच मनाच्या तऱ्हाही आहेत. पण कायम मनाला मुरड घालून जगायला लागलं की मात्र सहजीवनाची पायवाट अवघड वाटायला लागते. पदोपदी ठेचा लागून मनं रक्तबंबाळ व्हायला लागतात.. आणि मग जगण्यात  दुरावा यायला लागतो. पण आयुष्याच्या उत्तरार्धातल्या सहजीवनात तरी एकमेकांना, ‘मला तुझी गरज आहे. इतके दिवस आपण मुलांसाठी जगलो. आता आपल्यासाठी जगू या,’ असं म्हणून जगण्यातला आनंद शोधण्याची गरज आहे.

वाफाळलेल्या कॉफीचा मग हातात घेऊन बाल्कनीतल्या झोक्यात येऊन बसले. उठल्यानंतरची पहिली कॉफी बाल्कनीत बसून घ्यायला आवडतं मला. दिवस सुरू होतानाचे क्षण नेहमीच अस्पर्शी असतात..! ‘व्हर्जीन मोमेंट्स’..! मनाच्या प्रसन्नतेत भर घालणारे..! अंतर्मनाशी संवाद साधणारे..! ते क्षण फक्त स्वत:साठीच असावेत, असं मला नेहमी वाटतं.

बाजूच्या बाल्कनीत शेखर आणि शालिनी सकाळचा चहा घेत बसलेले होते. किती तरी वेळा त्या दोघांना सकाळच्या प्रसन्नतेत असं निवांतपणे एकत्र चहा घेताना पाहायची मी. तिशीतलं तरुण जोडपं. मुलाला शाळेच्या बसला सोडलं की दोघेही जोडीने हे सकाळचे क्षण एकमेकांच्या संगतीत घालवताना दिसायचे. खूप छान वाटलं त्यांच्याकडे बघून. क्षणभर हेवाच वाटला त्यांचा..! मनाशी रुजवात घालत भूतकाळात वळून मी आयुष्याच्या जुन्या पानांवर शोध शोध शोधलं..!  पण माझ्या आयुष्यात सकाळी असं एकमेकांना वेळ देत चहा किंवा कॉफी घेतल्याचा प्रसंगच मला आठवला नाही. होय! कारण तसं कधी घडलंच नव्हतं. माझ्या उच्चपदस्थ आयआयटीतल्या नवऱ्याला शांतपणे दोन क्षण माझ्यासाठी थांबून मनीचं गुज सांगायला अथवा ऐकायला कधी वेळच मिळाला नाही! फक्त काम, काम आणि कामच केलं त्यानं.

खरं तर आयुष्यात खूप सारं मिळालं, पण तरीही चिमटीत मावणारं काही तरी हातून निसटून गेल्याची भावना नेहमीच मनाशी रेंगाळत राहिली. आता आयुष्याच्या अखेरच्या वळणावर येऊन पोहोचल्यानंतर हे असे निसटून गेलेले क्षणच आयुष्याचा रंग गडद करतात हे जाणवायला लागलं. पण सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार आयुष्यही सापेक्ष असतं. जगणं थांबत नाही. जो तो आपापल्या परीनं जगतच राहतो!

एकदा कुठल्याश्या ट्रेनिंगमध्ये एका जर्मन वक्त्यानं सर्वाना एक प्रश्न केला होता. ‘जीवनात सर्वात महत्त्वाचं काय आहे?’

उत्तर होतं, ‘वेळ’. वेळ ही जगातली सर्वात अनमोल गोष्ट आहे हे त्यानं सांगितलं. कारण, एकदा निघून गेलेला वेळ आपण काही केलं तरी परत मिळवू शकत नाही. जीवन जगताना निसटून गेलेला क्षण परत जगणं केवळ आणि केवळ अशक्यच! मी त्या वेळी ही गोष्ट केली नाही म्हणून ती आज करतोय, हे म्हणणं खरं तर चुकीचंच असतं. ती गोष्ट त्याच वेळी करण्यात जो आनंद आहे तो तीच गोष्ट नंतर ठरवून सवरून करण्यात मिळत नाही हे नक्की. पण माणसाला हे उमजत नाही. त्यामुळेच की काय, आपल्या मनातलं आणि वास्तवातलं आयुष्य नेहमी वेगळं असतं. म्हणजे माणसाला जे जसं हवं असतं ते तसं कधीच मिळत नाही. बहुतेकांच्या आयुष्यात हे असंच घडत असतं. अर्थात त्यामुळे फार काही बिघडतं असं नाही. पण मग यालाच आपण ‘नियती’ असं म्हणून मनाचं समाधान करतो कदाचित. माणसाच्या ठायी देवानं मन दिलय. तसं मनाच्या तऱ्हाही दिल्यात. मनाला मुरड घालून जगायलाही शिकवलं आहेच की त्यानं. हे असं मनाला मुरड घालून जगायला लागतं तेव्हा मात्र सहजीवनाची पायवाट अवघड वाटायला लागते. पदोपदी ठेचा लागून मनं रक्तबंबाळ व्हायला लागतात आणि मग जगण्यात कधी दुरावा यायला लागतो ते आपलं आपल्यालाच कळत नाही. एकाच घरात राहून दोघांची तोंडं दोन दिशेला आहेत असं होऊन जातं.

वयाची तीस चाळीस वर्ष एकत्र घालवल्या नंतर छोटय़ा छोटय़ा गोष्टीत एकमेकांचे दोष ठळकपणे समोर यायला लागतात. त्या दोषांवर बोलल्याशिवाय राहवत नाही. मग वाद-प्रतिवाद असं हेऊन कधी आणि कसं एकमेकांना दुखावण्यात सुख मिळायला लागतं ते कळत नाही. दोन पक्षी घायाळ होईपर्यंत एकमेकांवर चोचा मारीत राहतात. हे असं का होतय हे मात्र कळेनासं होतं.

हल्ली बऱ्याच घरात पती-पत्नी एकमेकांशी न बोलताच एकत्र राहत असतात. आयुष्याचा निरोप घ्यायची वेळ आलेली असते तरी मनातला अहंकार  कमी होत नाही.   खूप वेळा कळतंय पण वळत नाही असंच असतं. मग प्रश्न येतो, हे असं का घडत असावं? आपल्याकडे बघून सवरून केलेली लग्न टिकतात ही सर्वसाधारणपणे सर्वमान्य बाब आहे. असं असलं तरी बऱ्याच वेळा उतारवयात पाहोचेपर्यंत आयुष्य वळणावळणांनी पुढे गेलेलं असतं. सुखानं संसाराची सुरुवात केलेल्या किती तरी जणांची मनं एकमेकांच्या प्रति नकारात्मक भूमिकेत येऊन पोहोचलेली असतात. या अशा जोडप्यांचं आयुष्य म्हणजे संथपणे वाहणारी एक नदी होऊन जाते. नदीचे दोन तीर कसे एकमेकांशी समांतर वाहत राहतात तसे. लग्न बंधनात ते एकमेकांशी बांधलेले असतात, पण खऱ्या अर्थानं सहजीवन संपलेलं असतं. तू तुझं बघ. मी माझं बघतो. ही भावना बऱ्याच जणांच्या आयुष्यात दृढ होऊन गेलेली असते. जीवनाच्या पायवाटेवर आपण आपल्या मनाप्रमाणं एकटं वागायचं ठरवून प्रसंगी जोडीदारांच्या भावनांचा, अपेक्षांचा तसंच इच्छांचा अनादर करण्याकडे कल वाढू लागतो. मुलाबाळांच्या दृष्टीनं आईबाबा एकत्र असतात, घर नावाची चार िभतींची एक चौकट जागच्या जागी असते. ती मोडण्याची ना तिची इच्छा असते ना त्याची. पण त्या चौकटीच्या आतील सहजीवन भावनिक पातळीवर संपून गेलेलं असतं. हे सगळं सुरू होतं कारण जोडीदाराला गृहीत धरलं जातं. यात नेहमीच पुरुष अग्रभागी असतो. नव्हे आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे हे आपसूक घडत गेलेलं असतं अनेकदा. कमावण्यासाठी बाहेर जाणाऱ्या पुरुषाला सदैव कुटुंबसंस्थेत घराचा धनी, कुटुंब प्रमुख असंच मानलं जातं.. आणि त्यात काही गर असतं असं अजिबात नाही. पण घरच्या स्त्रीला सदैव दुय्यम दर्जा दिला जाऊन घरधन्याचा अहंकार सांभाळत तिला आयुष्य काढावं लागतं, आणि यातूनच नकळत मनात दुरावा निर्माण व्हायला लागतो.

माझ्या माहितीच्या एका घरात श्रीकांतला फक्त काम करण्याची आवड. सकाळी उठल्यापासून त्याच्या डोक्यात फक्त कामाचेच विचार असतात. त्याला कधीच दुसरं काही सुचायचं नाही. मुलं झाली. ती मोठी होत गेली. शीलाने घर अगदी उत्तम रीतीने सांभाळलं. ना त्याला कधी तक्रार करायला जागा ठेवली, ना मुलांकडे दुर्लक्ष केलं. त्यानं पशाला कधी कमी पडू दिलं नाही. पण कधी तिन्हीसांजेला हा माणूस घरी पोहोचला नाही. कधी सुटीच्या दिवशी तिला मदत करायला किंवा तिच्यासाठी म्हणून काही करायला तो घरात असायचाच नाही. नाटक नाही. कधी सिनेमा नाही. गरज असेल तेव्हा काम सोडून तो घरी थांबायचा. पण आपल्या बायकोसाठी वेळ द्यायला हवा हे त्याला कधी गमलंच नाही. तिनेही अपरिहार्यतेतून त्याच्याशिवाय जगणं स्वीकारलं. आपल्या मत्रिणींबरोबर फिरायला जाणं, नाटक-सिनेमाला जाणं, पुस्तकात रमणं हे छंद जोपासले. आता तिचं स्वत:चं विश्व तिनं निर्माण केलेलं आहे. त्याच्यात नवऱ्याला जागाच नाही. उतारवयात आल्यावर आता तो एकटा पडला. तिला आवडणाऱ्या गोष्टींची त्याला अजिबात आवड नाही. काय करावं ते कळत नाही, आणि आता त्याच्याकडे लक्ष द्यायला तिची तयारी नसते. इतके दिवस मी एकटीच तर होते. आता तुमच्यासाठी मी माझे छंद का सोडून देऊ, हा तिचा प्रश्न असतो. मग घरात छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून वाद होत राहतात. त्याचं तोंड एका दिशेला तर तिचं दुसरीकडे. हे एक प्रातिनिधिक उदाहरण.

मला नेहमी वाटतं, आपल्याकडे बऱ्याच घरात पुरुष मंडळी बायकांना गृहीत धरतात. बहुतेक घरात पुरुषांच्या इच्छेला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे तिच्या आवडीनिवडी, आशा-आकांक्षांना कधी म्हणावं तेवढं महत्त्व दिलं जातच नाही. घरात झटत असलेली ती, नेहमी त्याला, मुलाला आवडेल अशी भाजी करेल. त्याला एखादा रंग आवडतो म्हणून तशीच साडी नेसेल. त्याच्या मित्रमंडळींना आवडतो म्हणून स्वयंपाक करून वाढेल. पण बायकोला आवडतं म्हणून किती घरांत हेच सारं काही घरातला पुरुष करताना दिसतो? बहुतेक वेळा आपल्या आवडीनिवडींचा पाठपुरावा करणं पुरुषांना सहजपणे शक्य होऊ शकतं. तो अट्टहासानं आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो. मात्र बऱ्याच वेळा इच्छा असूनही एखादी स्त्री तिच्या आवडीप्रमाणे वागू शकत नाही. कारण फार थोडय़ा स्त्रियांच्या ठायी ठामपणे एकादी गोष्ट करण्याची क्षमता असते. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर प्रवासाची आवड असणाऱ्या किती तरी महिलांना नवरा सोबत आला नाही तर कुठेही जायला मिळत नाही.. आणि नवऱ्याला प्रवासाची आवड नसेल तर बऱ्याच वेळा तो बायकोच्या हौसेखातर पर्यटनाला जाण्यासाठी कदापि तयार होत नाही. मला किती तरी वेळा अनोळखी स्त्रियांचे फोन येतात. ‘तुम्ही इतकं भटकता. पुढच्यावेळी जाल तेव्हा मला कळवाल का? मला पण खूप आवडतं प्रवास करायला. पण आमच्या घरी यांना अजिबात आवडत नाही हो. त्यामुळे कुठे जाता येत नाही. तुमच्याबरोबर यायला आवडेल मला.’ आश्चर्य याच गोष्टीचं वाटतं की एक पत्नी आपलं अवघं आयुष्य नव्या घरात येऊन, त्या घराला आपलं मानून नवऱ्यासाठी, त्याच्या मुलांसाठी समíपत करते. मग तिच्या आवडीसाठी म्हणून नवऱ्याने आपल्या जीवनात थोडा फार बदल का करू नये? तिनशे पासष्ट दिवसांतील पंधरा दिवस का तिच्यासाठी देऊ नयेत? प्रवास आवडत नसला तरी केवळ तिला आवडतो म्हणून घेऊन जावं तिला कुठे तरी. पण हे फार थोडय़ा घरांतून घडते.

खूप मोठय़ा हुद्दय़ावर नोकरी करून निवृत्त होणाऱ्या पुरुषांना तर घरात असतानाही आपण म्हणेन तसंच सर्वानी वागावं असं वाटत असतं. समोरच्याला काय हवंय. त्यांना काय वाटतंय हे विचारायची त्यांची तयारी नसते. मग घरातल्यांची तोंडं दुसऱ्या दिशेला वळायला वेळ लागत नाही. अशा नवऱ्यांच्या बायकांचे हाल होतात हे नक्कीच. मग गप्प राहून सहन करणं हा एकच पर्याय उरतो. त्यातूनच पुढे विसंवाद कधी सुरू होतो हे दोघांनाही उमजत नाही. त्याहूनही पुढची पायरी म्हणजे संवादच बंद होऊन जातो. हे असंच काहीसं आज अनेक घरांत घडताना दिसतंय. त्यातही घर मुलाबाळांनी भरलेलं असेल तर घरच्या स्त्रीचं फारसं बिघडत नाही. पण ज्या घरात केवळ पती-पत्नीच राहतात त्या घरातील संवाद हा विसंवादाच्या वाटेवरून तरी घडत असतो अथवा मुका होऊन गेलेला असतो.

बऱ्याच वेळा पुरुषांना एखादी गोष्ट करू नका, असं बायकोनं सांगितलं की इतका राग येतो की तो ती गोष्ट हमखास करणारच. अगदी रस्त्यानं जाताना, ‘अहो, या रस्त्यानं नको जायला. या वेळी तिकडे फार गर्दी असते,’ असं जरी बायकोनं म्हटलं तरी महाशयांनी त्या रस्त्याला गाडी घातलीच समजा. पण हेच पुरुष बायको बाहेर निघाली की हजार सूचना द्यायला कमी करत नाहीत. तू असं कर. तू तसं कर. असं प्रत्येक गोष्टीत टोकत राहतील. अर्थात बायकांना या सगळ्याची एवढी सवय झालेली असते की त्याही मुकाटय़ानं सगळं ऐकत राहतात.

एकूणच खूप वर्षांच्या सहजीवनानंतर मुरलेल्या लोणच्यासारखं आयुष्य नेहमीच चवीचं असतंच असं नाही. कधी कधी छोटय़ा छोटय़ा गोष्टींमुळे ते इतकं बेचव होऊन जातं की तू कुठे आणि मी कुठे अशी अवस्था होऊन गेलेली असते. पण एकमेकांशिवाय जगण्याला पर्यायही नसतो. मग, तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना. अशी अवस्था होऊन जाते. हल्लीची तरुण पिढी एकमेकांना नेहमी आपल्या प्रेमाची ग्वाही देत राहतात. ‘हनी, आय लव्ह यू सो मच.’ हे वाक्य कळीचं असतं. आई-वडिलांच्या पसंतीनं लग्न केलेल्या किती जोडप्यांत हा असा संवाद होतो कुणास ठाऊक. पण मला वाटतं परतीच्या वाटेवर वाटचाल करणाऱ्या पिढीनं आपल्या जोडीदाराला ‘आय लव्ह यू’ असं म्हटलं नाही तरी चालेल. पण  एकमेकाला समजून घेत, प्रेमानं हात हातात घेऊन, ‘मला तुझी गरज आहे. इतके दिवस आपण मुलांसाठी जगलो. आता आपल्यासाठी जगू या,’ असं म्हणून जगण्यातला आनंद शोधण्याची गरज आहे.

पुरुषांना वाटत असतं, ‘इतकी र्वष मी या सगळ्यांसाठी कमावत राहिलो. त्यांच्यासाठी जगत आलो. आता मला माझ्या मनाप्रमाणं जगण्याचा हक्क आहे.’ तर स्त्रीला वाटत असतं, ‘उभा जन्म सर्वासाठी कष्ट करण्यात गेला. माझ्या मनाचा आणि इच्छा-आकांक्षांचा विचार कुणी करायचा?’ संसाराच्या वाटेवर दोन चाकांचं हे म्हणणं आपापल्या जागी अगदी बरोबर असतं. त्यामुळे, ‘तुझ्यासाठी मी आहेच. पण माझ्यासाठी तू मला हवी आहेस,’ असं म्हणून एकमेकांना एकमेकांचा आधार देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे विसंवाद मिटेल कदाचित.. आणि अनेक वर्षांच्या सहजीवनातून निर्माण झालेला दुरावा आणि कटुताही मिटून जाईल..! ल्ल

राधिका टिपरे
radhikatipre@gmail.com