दुर्धर शारीरिक व्याधींवर मात करून इतकं मोठं काम करता येतं, हे दाखवून देणारे स्टीफन हॉकिंग यांचं व्यक्तिमत्त्व हे आगळंवेगळंच होतं. ऐन उमेदीच्या तरुण वयातच त्यांना मोटर न्यूरॉन डिसीज हा दुर्धर आजार झाल्याचं निदान झालं. डॉक्टरांनी ते अल्प अवधीचेच आता सोबती आहेत असं सांगितलं. परंतु हॉकिंग यांनी डॉक्टरांच्या या भाकितावर मात करत मृत्यूला तब्बल ५४ वर्ष झुलवत ठेवलं. त्यांची जीवनेच्छा खरोखरच अलौकिक म्हणावी लागेल. हॉकिंग हे केंब्रिज विद्यापीठात न्यूटनने जे पद भूषवलं होतं त्या ल्युकाशियन प्रोफेसरपदाचे मानकरी. त्यांनी आपल्या दुर्धर आजारावर मात करत या पदाची शान कायम राखलीच; त्याचबरोबर विश्वरचनाशास्त्रात पायाभूत स्वरूपाचं संशोधनही त्यांनी केलं. गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास त्यांनी आइनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्ताआधारे केला, हे त्यांचं वेगळं वैशिष्टय़. त्यांचं सगळ्यात गाजलेलं संशोधन अर्थातच कृष्णविवरांच्या संदर्भातलं होतं. कृष्णविवर ही खरं तर खूप तप्त वस्तू. त्यातून काहीच बाहेर पडू शकत नाही असं त्याकाळी मानलं जात होतं. पण हॉकिंग यांनी कृष्णविवरातून काही किरण बाहेर पडतात असं अभ्यासाअंती सांगितलं. पुढे हे संशोधन ‘हॉकिंग रेडिएशन’ नावाने प्रसिद्ध झालं. विश्वाची उत्पत्ती कशी झाली असावी यावर आतापर्यंत बराच अभ्यास झालेला आहे. पण हॉकिंग यांनी त्याचा क्वांटम फ्लक्चुएशन ते गुरुत्व असा पट उलगडून दाखवला. त्यातून विश्वाची रचना, ताऱ्यांची उत्पत्ती, महाविस्फोटाचा सिद्धान्त यासंबंधात सविस्तर मांडणी होऊ लागली. गुरुत्वाचा पुंज सिद्धान्त मांडणं हे अतिशय अवघड होतं. पण त्यांनी त्याबाबतचं केलेलं संशोधन महत्त्वाचं होतं. त्यांच्या विश्वरचना सिद्धान्तातून हे विश्व नेमकं कसं निर्माण झालं असावं याबाबतचं माणसाचं ज्ञान वाढलं यात शंका नाही. आइनस्टाईनच्या सिद्धान्तानुसार एकत्व म्हणजे सिंग्युलरिटीला टाळून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, हे हॉकिंग यांच्या संशोधनातून स्पष्ट झालं. एकूणच विश्वाच्या उत्पत्तीबाबत त्यांच्याइतका सम्यक विचार कुणीच केलेला नाही. आता कुणाला असा प्रश्न पडू शकेल, की एवढे मोठे प्रख्यात विश्वरचनाशास्त्रज्ञ असूनही त्यांना नोबेल पारितोषिक का मिळालं नाही?

..तर त्याचं उत्तर असं की, नोबेल पारितोषिक हे जे संशोधन पुराव्यानिशी किंवा पडताळ्यानिशी दाखवून देता येतं त्याकरताच दिलं जातं. हॉकिंग यांनी कृष्णविवरांतून काही किरण बाहेर पडतात हा सिद्धान्त मांडला होता. पण अशा कृष्णविवरांचं वस्तुमान खूप कमी असतं. या प्रकारची कृष्णविवरं आहेत; पण त्यांचं अस्तित्व दाखवता येत नाही. त्यामुळे हॉकिंग यांना नोबेल का मिळाले नाही, तर त्यांचं संशोधन सैद्धान्तिक पातळीवरचं होतं, हे त्याचं उत्तर आहे.

हॉकिंग जेव्हा व्याख्याने देत असत तेव्हा त्यांच्या तोंडून विचित्र आवाज आल्यासारखे वाटे. कारण ते संगणक यंत्राच्या माध्यमातून संवाद साधत असत. एकदा असेच ते आणि त्यांचे विद्यार्थी पबमध्ये असताना ते मोठय़ाने ओरडले, ‘मला काही तरी सांगायचंय.’ पण त्यांची ही लकब त्यांच्याबरोबर वावरणाऱ्यांना अपरिचित नव्हती. हॉकिंग यांनी दुर्धर आजार असतानाही त्यावर मात करत जीवनाचा आनंद पुरेपूर लुटला. इतर वैज्ञानिकांप्रमाणेच ते अनेक कार्यक्रमांत जातीने सहभागी होत असत. त्यांची व्याधी त्याच्या आड कधी आली नाही. त्या अर्थाने ते इतर वैज्ञानिकांप्रमाणेच परिपूर्ण आयुष्य जगले असंच म्हणावं लागेल. पृथ्वीवर आता अणुयुद्ध आणि अन्य धोके वाढले आहेत. त्यामुळे मानवजातीने अवकाशात दुसरं घर (सेकंड होम) शोधावं आणि पृथ्वी सोडून जावं असं वक्तव्य त्यांनी अनेकदा केलेलं आहे. त्यांची ही वक्तव्यं वैज्ञानिक समुदायात सर्वानाच मान्य होणारी नसली तरीही ती कायम बातमीचा विषय ठरत, हे मात्र तितकंच खरं. ‘अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम’ हे त्यांचं पुस्तक बेस्ट सेलर ठरलं. ते विश्वरचनेतील मूलगामी बाबींवर प्रकाश टाकणारं होतं. पण ते विकत घेणाऱ्यांपैकी किती जणांनी वाचलं असेल याबाबत शंका आहे. हॉकिंग यांच्याबाबतीत दोन योगायोग जुळून आलेले आढळून येतात. एक म्हणजे त्यांचा जन्म गॅलिलिओच्या मृत्यूनंतर तीनशे वर्षांनी त्याच्या पुण्यतिथी दिवशीच झाला, तर त्यांचा मृत्यू आइनस्टाईनच्या वाढदिवशी झाला. हॉकिंग यांच्यासारख्या वैज्ञानिकानं विश्वरचनाशास्त्रात जी पायाभूत कामगिरी केली आहे त्यातूनच विश्वाचं कोडं उलगडण्याची प्रक्रिया यापुढेही सुरूच राहणार आहे.

  • डॉ. नरेश दधिच  (माजी संचालक, आयुका)
  • शब्दांकन : राजेंद्र येवलेकर