02 March 2021

News Flash

पळस फुलला..

पळस म्हणजे पलाश वृक्ष; रानाचा अग्नी. इंग्रजीत तर त्याला ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’असे म्हटले जाते.

थंडीचे दिवस संपून उष्ण काळ सुरू होण्याआधी ऋतुचक्राच्या आसाभोवती फिरणारी समग्र चराचर सृष्टीच जणू संक्रमणाच्या उंबरठय़ावर उभी असते. पावलापावलांनी शिशिरातील पानगळ मागे सरकते आणि आगमनासाठी पुढे सरसावलेल्या वसंताच्या अस्तित्वखुणा सृष्टीच्या माथ्यावर उमटू लागतात. सृष्टीत सर्जनाची प्रक्रिया गतिमान होण्याच्या या काळात पळसाची झाडे बहरू लागतात. त्यांचा हा बहर नंतर पार उन्हाळा संपेपावेतो टिकतो. उन्हाळा सुरू झाला की, झाडांना पानगळ लागते आणि निष्पर्ण वृक्षांचे सांगाडेच काय ते उरतात. अशा या नजर भाजणाऱ्या उन्हावळीतही बहरणारी झाडे तशी मोजकीच असतात आणि म्हणूनच या दिवसांत पळस आपले लक्ष वेधून घेतो.

पळस म्हणजे पलाश वृक्ष; रानाचा अग्नी. इंग्रजीत तर त्याला ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’असे म्हटले जाते. पाश्चात्त्य राष्ट्रांत पळस आढळत नाही. तेव्हा संस्कृत साहित्यातील वर्णनावरूनच त्याचे असे नामकरण केले असणार, हे उघडच आहे. ‘बुटिया मोनोस्पर्मा’ हे पळसाचे वनस्पतिशास्त्रीय नाव. त्यातील ‘मोनोस्पर्मा’ या ग्रीक शब्दाचा अर्थ एक बीज असणारा. पळसाला संस्कृतमध्ये ‘पलाश’ असे म्हणतात. ‘पल’ म्हणजे मांस आणि ‘अश’ म्हणजे खाणे. याचाच अर्थ असा, की पलाश म्हणजे मांस भक्षण करणारा वृक्ष. जमिनीवर पडलेल्या लालभडक पळसफुलांना युद्धभूमीवरील रक्तमांसाच्या सडय़ाची उपमा दिल्याचे उल्लेखही प्राचीन साहित्यात आढळतात.

पळसाचे झाड हे मध्यम आकाराचे आणि १२ ते १५ मीटर उंचीचे असते. त्याची वाढ अतिशय मंद होते. वर्षभरात पळसवृक्ष जेमतेम एक फूटच काय तो वाढतो. त्याचे खोड खडबडीत असते आणि पाने आकाराने मोठी व गोल असतात. पाने एका डहाळीवर तीनच्या संख्येत असतात. (‘पळसाला पाने तीन’ ही म्हण त्यावरूनच आली असावी.) पळसाला चपटय़ा शेंगा येतात. त्यांना ‘पळसपापडी’ म्हणतात. पळसाला काळ्या रंगाच्या कळ्या येतात आणि नंतर कळ्यांची फुले होतात. दरम्यानच्या काळात पाने झडतात. तसे पाहिले तर, पळसफुले ही जशी लालभडक असतात, तशीच ती पिवळी आणि पांढरीही असतात. अर्थात, सर्वत्र आढळतात ती लालभडक पळसफुले. पिवळी त्यामानाने कमी असतात, तर पांढरी जवळपास दुर्मीळच!

पळसफुले दिसायला अतिशय आकर्षक असली तरी झाड मात्र अनाकर्षक असते. आंबा आणि चिंचेचा आकार कसा डेरेदार असतो; पळस मात्र आकारहीन असतो. पळसाच्या झाडाला जसा आकार नाही, तसाच त्याच्या फुलांनाही गंध नाही. पळस फुलतो तेव्हा देशोदेशीचे पक्षी पळसवनात येतात आणि किलबिलाट करीत पळसाच्या झाडावर उतरतात. पळसाच्या फुलांत बराच मध असतो. तो ते प्राशन करतात. याच मधासाठी नंतर मधमाश्याही येतात. मधमाश्यांच्या गुंजारवाने आणि पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे हा अनाकर्षक पळस जणू काही ‘गाणारे झाड’च होऊन जातो.

पळसाची झाडे नागर वस्तीत क्वचितच आढळतात. मनुष्यवस्तीचा अभाव असलेल्या मोकळ्या माळरानावर ती आवर्जून दिसतात. जंगलातील जमिनीचा कस कमी होऊ लागला, की पळसाचे प्रमाण वाढते. पळस हे निकृष्ट जमिनीचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात पळस बऱ्यापैकी आढळत असला तरी मध्यप्रदेशात मोठी पळसबने आहेत. पाच वर्षांपूर्वी नर्मदा परिक्रमा करीत असताना, मध्यप्रदेशातील महाराजपूरच्या जंगलातील पायवाटेच्या दोन्ही बाजूंना नजर पोहोचेपावेतो लालभडक फुलांनी डंवरलेले पळसवृक्ष पाहण्यात आले आणि मग संमोहन झाल्याप्रमाणे जागीच उभा राहिलो. बंगाल प्रांतातही अशीच पळसबने आढळतात. कोलकात्यापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावरील भागीरथी नदीच्या किनाऱ्यावर ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नबाब यांच्यात ‘प्लासीची लढाई’ झाली. ही युद्धभूमी म्हणजे मुळात पळसबनच होती. ‘पलाशी’ म्हणत त्याला. पुढे त्याचाच ‘प्लासी’ असा अपभ्रंश झाला. महाराष्ट्रातही पळसगाव, पळासनेर अशी गावे आढळतात. ‘रानातील कविता’ लिहिणाऱ्या ना. धों. महानोरांचे गावही पळासखेडच!

पळसाचे झाड फाल्गुन महिन्याच्या आरंभापासूनच बहरू लागते. चैत्रात तर झाडाची सर्व पाने गळून पडतात आणि त्याची जागा फुले घेतात. लालभडक फुलांनी डंवरलेला हा पळसवृक्ष मग पेटल्यासारखा दिसू लागतो. पळसाच्या खोडात सुप्त अग्नी असतो, अशी समजूत आहे. जणू चैत्रारंभी हा अग्नी लालभडक फुलांच्या रूपाने बाहेर पडत असतो. या दिवसांत पळसवनात गेले की वाटते, लालभडक रंगाचे सरोवरच आपण पाहतो आहोत. भवभूतीच्या ‘उत्तररामचरिता’त चंदनसावळा श्रीराम विन्ध्य पर्वताच्या पायथ्याशी आल्यावर कर्पूरगौर सीतेला म्हणतो :

‘आदिप्तानिव वैदेहि

सवर्त: पुष्पतान्नगान

स्वै: पुष्पै: किंशुकान्पश्य

मलिन: शिशिरात्यये।’

(‘सीते! बघ, वसंत ऋ तू पळस फुलांच्या माळा ल्यायलेला आहे. फुललेला पळस पाहून वाटते, की तो जणू पेटलेला आहे.’) पळसाची फुले लालभडक आणि दिसायला पोपटाच्या चोचीसारखी वाटतात म्हणून त्यांना ‘किंशुक’ असे म्हणतात. नाही तरी, पोपटाला संस्कृत वाङ्मयात ‘किंशुक’ हे वैकल्पिक नाव आहेच! (पळसाला इंग्रजीत ‘पॅरट ट्री’ असे काही वेळा म्हटले जाते.) कालिदासाने ‘कुमारसंभवा’त द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे असलेल्या पळसपाकळ्यांना, वसंताने शृंगारप्रसंगी निसर्गदेवतेच्या अंगावर उमटवलेल्या नखक्षतांची उपमा दिलेली आहे. तर ‘गीतगोविंद’कार जयदेवांनी ‘युवजनहृदयविदारण नखरुचि किंशुकजाले’ (तरुण-तरुणींच्या मनाला विदीर्ण करणारी मदनाची धारदार नखे) असे म्हटले आहे. ‘ऋ तुसंहारा’त पळस स्त्री-रूपात रेखाटला गेला आहे. ‘वनांमध्ये बहरलेल्या लालभडक फुलांनी पळसाची झाडे लावली आहेत. त्यामुळे रक्तवर्णी वस्त्र परिधान केलेल्या यौवनसंपन्न नववधूप्रमाणे ही सृष्टी दिसते आहे,’ असे वसंतवैभवाने नटलेल्या पर्वतराजीचे वर्णन कालिदासाने केले आहे. याखेरीज इतरही अनेक प्राचीन साहित्यातून पळसाचे उल्लेख आढळतात. ‘गाथा सप्तशती’त पळस हा आदिम, अनागर शृंगारभावनेचा विश्वासार्ह साक्षीदार असल्याचे नमूद केले आहे. सातवाहनांच्या काळातील दक्षिण भारतात बौद्ध धर्माचा बराच प्रचार झाला होता. बौद्ध वाङ्मयातही पळसाचे अनेक

संदर्भ आढळतात. ‘पोपटाच्या चोचीप्रमाणे लालभडक पळसफुलांनी भूमी शोभायमान झाली आहे. जणू बुद्धचरणांना वंदन करण्यासाठी लोटांगण घालणाऱ्या भिक्षू संघाप्रमाणे हे दृश्य दिसते आहे,’ असा बौद्ध साहित्यात पळसाचा उल्लेख येतो.

प्राचीन संस्कृत साहित्यात आणि धर्मग्रंथांतही पळसाचे अनेक संदर्भ आढळतात. ‘लिंग पुराणा’त पळसाचा उल्लेख ‘ब्रह्मवृक्ष’ असा केला आहे आणि त्याची तीन पाने ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकराचे प्रतिनिधित्व करतात, असेही म्हटले आहे. शंकरांच्या तीन नेत्रांशी पळसाच्या तीन पानांची तुलना केल्याचेही संदर्भ आढळतात. त्याची एक कथा आहे. वसंत ऋ तूत कामदेवाने शंकरावर मदनबाण सोडला, तेव्हा तो पळसावर बसला होता. शंकरांनी तिसरा डोळा उघडल्यावर पळस आणि कामदेव जळू लागले. तेव्हा पळसाने विनम्रपणे शंकरांना विचारले, ‘माझी काय चूक? मला का जाळतोस?’ शंकरांना दया आली आणि ते म्हणाले, ‘तुझ्या अग्निज्वालांची फुले होतील आणि तुझी पाने माझे नेत्र म्हणून ओळखली जातील.’ त्यामुळेच की काय, तेलंगणा प्रांतात पळसाच्या लालभडक फुलांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची पूजा केली जाते. एका पुराणकथेनुसार, शिव-पार्वतीचा एकांत भंग केल्याबद्दल शापग्रस्त झालेला अग्निदेव म्हणजे पळस होय. आधुनिक साहित्यातही पळसाचे असे अनेक संदर्भ आढळतात. मराठीतील ना. धों. महानोर आणि बहिणाबाई चौधरींची कविता त्याला साक्षी आहे. अर्थात, या उल्लेखांची पाश्र्वभूमी धार्मिक नाही, तर निसर्गवर्णनपर आहे. हिंदी साहित्यातही पळसाचे उदंड उल्लेख आढळतात. प्रख्यात हिंदी कवी नीरज (गोपालदास सक्सेना) यांनी म्हटले आहे –

‘नंगी हरेक शाख

हरेक फुल है यतीम

फीर भी पलाश सुखी है

इस तेज धूप में।’

प्राचीन आणि आधुनिक साहित्यात वारंवार आढळणारा हा पळस लोकव्यवहारातही अतिशय उपयुक्त आहे. पळसाच्या खोडात सुप्त अग्नी असतो, अशी समजूत आहे. त्यामुळे यज्ञविधीत अग्नी प्रज्वलित करण्यासाठी पळसाच्या समीधा वापरतात. पळसाची वृत्ती त्यागी. पौरुषेय बीज आहे, तिथे स्तंभन करण्याचा गुण या वृक्षात आहे. ब्रह्मचाऱ्याला त्याचे ब्रह्मचर्य सांभाळायला हा वृक्ष मदत करतो. म्हणून बालब्रह्मचारी हातात दंड धरतो तो पळसाचा! मौजीबंधनाच्या संस्कारात भगवी छाटी या पळसदांडाला बांधलेली असते. अनवाणी पायांनी हातात पळसदंड घेऊन मौजीबंधनानंतर बटू आचार्यकुळात जातो आणि विद्यावान होऊन घरी परत येतो. या मध्यंतरीच्या ज्ञानार्जनाच्या काळात हातातील हा पळसदंड त्याला ब्रह्मचर्य सांभाळायला मदत करतो.

आयुर्वेदानुसार पळसाच्या बियांचे चूर्ण अतिसारावर उपयुक्त असते आणि वाजीकरणाच्या औषधातही पळसाचा वापर होतो. पळसाच्या पत्रावळीत केलेले भोजन चांदीच्या पात्रात केलेल्या भोजनाइतकेच आरोग्यदायी असते. पळसफुलांपासून रंग

तयार करतात आणि तो रंग आदिवासी

होळीच्या सणात वापरतात. एकूणच काय, तर वसंतारंभी फुलणारा आणि भर उन्हाळ्यातही लक्ष वेधून घेणारा पळस हा असा संदर्भसंपन्न असून त्याची मुळे लोकसंस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 1:32 am

Web Title: butea monosperma
Next Stories
1 एप्रिल फूल गुगलताई!
2 सत्योत्तरी ‘विप्रलाप’..
3 सामाजिक बदलात उच्चशिक्षण नापासच!
Just Now!
X