|| कल्याणी हर्डीकर

प्रेम, प्रणय, शृंगार आणि तृप्त करणारा शारीर अनुभव हा जसा मानवी जीवनात माणसाला बेधुंद करतो, तसाच तो प्राण्यांच्या जीवनालाही अर्थपूर्ण बनवतो. मानवाचा वंशज माकड. माकडांची उत्क्रांती होत होत माणूस बनला. ‘बोनोबो हॅन्डशेक’ या इंग्रजी पुस्तकातून व्हेनेसा वुड्स या लेखिकेने आफ्रिकेतल्या अभयारण्यातल्या चिम्पान्झी आणि बोनोबोंच्या भावविश्वाची, स्वभाव आणि शारीरधर्माचीही ओळख फार रंजकतेने, पण अत्यंत अभ्यासपूर्णरीतीने करून दिली आहे. त्या पुस्तकाचा ‘बोनोबो : एक शांतिदूत!’ हा मराठी अनुवाद शर्मिला फडके यांनी केला आहे.

अतिशय थरारक, कधी भयचकित करणारी, तर कधी व्याकूळ करणारी अशी ही एका संशोधक, शास्त्रज्ञ, पत्रकार लेखिकेची आत्मकथा आहे. ही आत्मकथा तीन पातळ्यांवरून आपल्यासमोर येते. पहिली पातळी आहे ती आत्मशोधाची. दुसरी प्राणिविश्वाच्या भावशोधाची. आणि तिसरी- मनुष्यजीवन, प्राणिजीवन आणि एकूणच वैश्विक जीवनातल्या संघर्ष, रक्तपात, हिंसा आणि त्यानंतर येणाऱ्या शांतिशोधाची!

महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर छोटय़ा- मोठय़ा नोक ऱ्या करत हिंडणाऱ्या व्हेनेसाला जगाचे अनुभव घेताना शोध लागतो, की चांगल्या दर्जाची नोकरी मिळवण्यासाठी अलौकिक असे तिच्याकडे कोणतेच कौशल्य नाही. ना कशातले वैशिष्टय़पूर्ण प्रावीण्य, ना स्वत:ची स्वतंत्र ओळख. जवळ आहे ते फक्त तरुण शरीर आणि त्याच्या अनावर संवेदना. हे आत्मपरीक्षण केल्यानंतर तिला वशिल्यामुळे आणि नाइलाजाने एक नोकरी मिळते. ती असते युगांडामधल्या बुन्दागो जंगलातल्या चिम्पान्झींच्या संख्यामोजणी गटाचे नेतृत्व करण्याची. त्या कामाचा तिला अजिबात अनुभव नसतो आणि त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षणही! तिथे कायमस्वरूपी काम करणारा तज्ज्ञ वन्यजीव संशोधक हिवतापाने आजारी पडल्यामुळेच जंगलातली ही नोकरी व्हेनेसाच्या पदरात पडते. ‘टारझन’ पाहिलेला आणि वाचलेला असल्यामुळे सुरम्य जंगलाबद्दलची सुखद स्वप्ने रंगवत आणि तितकीच सुरस चित्रे मनोमन घडावीत अशी कल्पना करीत व्हेनेसा ती नोकरी आनंदाने स्वीकारते. मात्र, तिच्या सुरम्य दिवास्वप्नांना कशी पहिल्याच दिवशी चूड लागते आणि तिचा संशोधनाचा श्रीगणेशा कसा होतो, याची कहाणी मुळातूनच वाचायला हवी.

व्हेनेसा वुड्सची ‘बोनोबो’ ही जशी थरारक साहसाची आत्मकथा आहे तशीच ती प्रांजळ, निसर्गदत्त प्रेमाची अनोखी कहाणीसुद्धा आहे. जंगले, जंगलातलं वन्यजीवन, त्यांच्या भावना,  वासना, त्यांचा जीवनक्रम, त्यांची जीवनव्यवस्था, जीवनधारणा आणि मानवी विश्वातील भावना, वासना व जीवनधारणा यांचा तौलनिक लेखाजोखा म्हणजे हे आत्मकथन आहे.

कामाचा अनुभवच नसल्यामुळे जंगलातल्या संशोधन कामाबद्दल झालेला भ्रमनिरास, अपेक्षाभंग आणि अपार कष्टप्रद अनुभव जसे व्हेनेसाने रंगवले आहेत, तसेच या प्रसंगांमुळे अंतर्मुख होऊन याच कामात राहण्याचे विचार मनात का आणि कसे दृढ होत गेले, हेही तिने अगदी बारकाव्यांसकट सांगितले आहे. प्रांजळपणे स्वत:चं मनोगत शब्दांकित केलं आहे. कष्टप्रद, जिकिरीचे काम करताना डेबी कॉक्स या आपल्या कणखर मैत्रिणीसारखे आपणही चिम्पान्झी, बोनबोसाठी अभयारण्य बनवण्याचा ती दृढनिश्चय करते- ते चिम्पान्झींनी, बोनोबोंनी तिच्यावर निरपेक्ष, निरलस प्रेम केल्यामुळेच! प्राणीच खरे निरागस प्रेम करायला शिकवतात, असं व्हेनेसा सांगते. बालुकुला या अशक्त, आजारी चिम्पान्झीच्या पिल्लाला ती वाढवते. त्याविषयी ती म्हणते, ‘आजपर्यंत ज्यांच्यावर मी प्रेम केले त्यात माझा काही ना काही स्वार्थ होता. कुटुंबीयांना मी गृहीत धरले होते, प्रियकराला मनातली पोकळी भरून काढायची सोय मानले होते आणि मित्रमैत्रिणींना निव्वळ वेळ घालवण्याचे साधन. पण बालुकुला माझ्या आयुष्यात आला आणि माझे आयुष्यच बदलून गेले.’

बालुकुलाच्या डोळ्यांदेखत त्याच्या आईला ठार मारले गेले होते आणि त्याच्या गळ्याला व हाता-पायांना करकचून बांधून त्याला खोक्यात डांबून ठेवण्यात आले होते .अशा कितीतरी अनाथ, भयग्रस्त,जखमी पिलांसाठी, जखमी चिम्पान्झींसाठी गांबा बेटावर डेबी कॉक्सने बंडखोर युगांडियन नेत्यांना, त्यांच्या दहशतवादाला न जुमानता निवारा केंद्र उभे केले होते. चिम्पान्झींची अमेरिकी व युरोपीय शिकाऱ्यांनी, तसेच चित्रपट क्षेत्रातल्या झगमगत्या विश्वाने केलेली आणि अमेरिकी- युरोपीय संपर्क माध्यमांनी केलेली रक्तरंजित शोषणकथाही स्वानुभवकथन करताना व्हेनेसाने तपशीलवार नोंदवली आहे.

बोनोबो आणि चिम्पान्झींवर संशोधन करण्यासाठी डॉ. ब्रायन हेर हा डेबी कॉक्सकडे रूजू होतो आणि संशोधनातले अवाक्षरही न समजणाऱ्या व्हेनेसाच्या तो आकंठ प्रेमात पडतो. तीही त्याच्या प्रेमाखातर न आवडणारे संशोधन क्षेत्र स्वत:चेही कार्यक्षेत्र मानायला लागते आणि डॉ. ब्रायनची ती उजवा हात होऊन जाते. डॉ. ब्रायनची प्रेयसी ते सहकारी साहाय्यक संशोधक व्हेनेसा हा प्रवास या आत्मकथेत वाचायला मिळतो. या प्रवासात युगांडा, टांझानिया,कॉन्गो, किन्झासा येथल्या आफ्रिकी रक्तरंजित उठावांचा, युद्धांचा, शिरकाणांचा, बलात्कारांचा इतिहासही येतो. असे अमानुष क्रौर्य, भयंकर परिस्थिती आजूबाजूला असतानाही डॉ. ब्रायन व्हेनेसाच्या मदतीने मानवाच्या पूर्वजांवर.. बोनोबो जातीच्या माकडांवर संशोधन करत राहतो.

चिम्पान्झी, गोरिला जातीच्या संदर्भातली माहिती जगाला आहे. परंतु खरोखरच सभ्य, शांत, प्रेममय जीवनाचा भोक्ता असलेला बोनोबो माकडवंश मानवाच्या पाशवी, नृशंस वृत्तीमुळे लवकरच नाहीसा होणार आहे, हे विदारक सत्य डॉ. ब्रायन आणि व्हेनेसाच्या लक्षात येते. चिम्पान्झी वंश आणि बोनोबो वंश यांच्यातली साम्य-वैधम्र्यस्थळे शोधताना आणि कोणत्या वृत्ती-प्रवृत्ती माकडांमधून माणसांकडे आल्या याचे संशोधन करताना तर ते चकितच होतात. ‘बोनोबो वंश म्हणजे शांतिदूतांचा वंश’ या निष्कर्षांप्रत येण्यासाठी त्यांना कोणकोणत्या जीवघेण्या प्रसंगांमधून जावे लागते, हे थरारक सत्य जाणण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे. आपणही व्हेनेसा आणि डॉ. ब्रायनसारखेच मिमी, इजेरो, मिकी, लिपोपो, तातान्गो यांच्या प्रेमात पडतो. पुस्तकातल्या छायाचित्रांमुळे या आत्मकथनाला प्रखर वास्तवतेचे परिमाण लाभले आहे.

  • ‘बोनोबो: एक शांतिदूत’- व्हेनेसा वुड्स,
  • अनुवाद – शर्मिला फडके,
  • मेहता पब्लिशिंग हाऊस,
  • पृष्ठे- २९६, मूल्य- ३५० रुपये.