सामंत घराणं मूळचं कोकणातलं. सदानंद सामंतांचे वडील डॉ. विश्वनाथ मोरेश्वर सामंत. त्यांचं घराणं तीन-चार पिढय़ा वैद्यकी करणारं. आयुर्वेद आणि अ‍ॅलोपथी यांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी विश्वनाथ सामंत यांना त्यांच्या वडिलांनी मुंबईच्या ग्रान्ट मेडिकल कॉलेजमध्ये पाठवलं. ग्रान्ट मेडिकल कॉलेजमध्ये तेव्हा सामंतांचे प्रोफेसर ब्रिटिश होते. विश्वनाथ सामंत यांनी ग्रान्ट मेडिकलमध्ये शिक्षण पुरं करून वैद्यकीय पदवी मिळवली. परंतु डॉक्टर म्हणून काम करण्याऐवजी त्यांना अध्यात्माची ओढ होती. त्यांनी हुबळी, सोलापूर अशा ठिकाणी काही काळ वैद्यक प्रॅक्टिस करून औदुंबरला प्रयाण केलं. तिथं ते ईश्वरचिंतनात आपला काल व्यतीत करू लागले. अडलेल्यांना, व्याधिग्रस्त माणसांना साहाय्य करत राहिले. डॉक्टरांना कानडी, कोकणी, हिंदी, इंग्रजी अशा बहुभाषा अवगत होत्या. विविध क्षेत्रांतल्या ज्ञानार्जनाविषयी ते उत्सुक असत. त्यांना तबला चांगला वाजवता येत असे. इतिहास आणि भाषेची त्यांना आवड होती. विश्वनाथ सामंत यांच्या निधनानंतर ‘औदुंबरातला धन्वंतरी गेला’ अशी ग्रामस्थांची प्रतिक्रिया होती.

सदानंद सामंतांचा जन्म औदुंबरचा. त्यांच्या डॉक्टर वडिलांच्या इच्छेमुळे ते शाळेत गेले नाहीत. घरातच अभ्यास केला. त्यात त्यांनी बंगाली साहित्याचाही अभ्यास केला. त्यांची बंगाली साहित्यानं भरलेली कपाटं मी पाहिली होती.

सदानंद सामंत पुढं लेखन करू लागले. त्यांचे वैचारिक लेख त्याकाळी पुढारलेल्या ‘किर्लोस्कर’ मासिकातून येऊ लागले. त्यावेळी दिवेकरशास्त्रींचे लेख ‘किर्लोस्कर’मधून गाजत होते. सदानंद सामंत कविता, कथा, नाटक या वाङ्मयप्रकारांत लिहीत असत. ‘भीमाची कधिं द्याल प्रभु गदा यांतें चुरण्यातें’ अशी भ्रष्ट, समाजविघातक कृत्यं करणाऱ्यांना चुरण्यासाठी ते कवितेतून ईश्वराकडं शक्ती मागत. समुद्राला उद्देशून ते त्यांच्या कवितेतून ‘हांसु नको सागरा, वृथा तूं फेनमिषें गरगरा’ अशा ओळींतून भ्रष्ट, दुर्जनांची पाठराखण करणाऱ्या त्याच्या हास्यास ताकीद देत.

सामंतांनी आयुष्याच्या थोडक्या अवधीत गुणसंपन्न पुस्तकं लिहिली. ‘हिरकणी’ हा त्यांचा कथासंग्रह आजही ताजा वाटतो. तो चित्रशाळा प्रेसने काढलेला. ‘अभागी अबला’ ही स्त्रीची दुरवस्था चित्रित करणारी कादंबरी, ‘सुन् यत् सेन’, ‘केमालपाशा’ हे चरित्रपर लेखन, लोककथांचं संकलनात्मक पुस्तक, ‘आईसाठी’ हे लहान मुलांसाठी (आणि मोठय़ांसाठीही!) असलेलं तीन अंकी नाटक आदी त्यांचं लेखन सांगता येईल.

सामंतांना राष्ट्रप्रेमाची जोरकस ऊर्मी होती. राष्ट्रीय सभांना ते उपस्थित राहत, भाषणं करत. गांधीजींबद्दल त्यांना ओढ होती. ज्येष्ठ काँग्रेस कार्यकत्रे धुळाप्पाअण्णा नवले यांच्याशी त्यांचा स्नेह होता. त्यांच्या समाजप्रेमाच्या कितीतरी गोष्टी सांगाव्याशा वाटतात. कृष्णा नदीला महापूर आला की अंकलखोप-औदुंबर इथली माणसं औदुंबरमधून पोहायला बाहेर पडत. ‘सगळ्यांना धरून जायचं’ असं सामंतांचं त्यांना सांगणं असे. त्यांना परिसरात ‘नाना’ असं संबोधलं जाई. नाना सामंत पट्टीचे पोहणारे होते. महापुरात पोहताना तरुणांना त्यांचा आधार वाटे.

नानांच्या भोवती तरुण साहित्य-कलाप्रेमींचा वेढा पडलेला असे. कवी सुधांशू, म. भा. भोसले, बा. ब. नवले, संपादक गणेश नरहर जोशी, राजाराम केशव जोशी आदी तरुण सतत त्यांच्या सोबत असत. नाना या मंडळींना वेचक पुस्तकं वाचायला देत. त्यांनी काही लिहिलं तर त्यांना प्रोत्साहन देत. यातूनच प्रसिद्ध कवी सुधांशू, कादंबरीकार म. भा. भोसले महाराष्ट्राला माहीत झाले. पुढं कवी सुधांशू यांना त्यांच्या समाजसेवेबद्दल भारत सरकारनं ‘पद्मश्री’ दिली. तसंच भाऊसाहेब खांडेकर यांनी सुचवल्यावरून म. भा. भोसले यांच्या ‘उघडय़ा जगात’ या कादंबरीवरून ‘जिवाचा सखा’ हा चित्रपट निघाला. ‘अहेव लेणं’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

१९३८ साली नाना सामंत यांचं विषमज्वरानं अकाली निधन झालं. त्यांना बाहेर आणून एका खुर्चीवर फोटो काढण्यासाठी बसवलं होतं. दोन्ही बाजूंनी नानांना सुधांशू आणि म. भा. भोसले यांनी धरलेलं होतं. ते दृश्य माझ्या मनावर कोरलं गेलं आहे. नाना गेल्यावर बा. ब. नवले यांनी त्यांना उद्देशून लिहिलेल्या ‘पुन: पुन्हा दाटून गळा, मम हृदयी सख्या येतात कळा..’ या हृदयस्पर्शी ओळी आठवतात.

१९३९ साली नानांच्या स्मृत्यर्थ १४ जानेवारी- मकरसंक्रांत या दिवशी औदुंबरमध्ये प्रतिवर्षी साहित्य संमेलन भरवायचं असं सुधांशू, म. भा. भोसले, ग. न. जोशी, राजाराम केशव जोशी प्रभृतींनी ठरवलं आणि आजही ते अव्याहतपणे भरवलं जात आहे.

पहिल्याच साहित्य संमेलनाला महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्यासारखे इतिहास संशोधक अध्यक्ष लाभले. तेव्हापासून गेली पंच्याहत्तर वर्षे श्री. म. माटे, चिं. वि. जोशी, पं. महादेवशास्त्री जोशी, वि. स. खांडेकर, गो. नी. दांडेकर, कवी यशवंत, काकासाहेब गाडगीळ, वि. द. घाटे, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, कवी अनिल, व्यंकटेश माडगूळकर, वसंत कानेटकर, विंदा करंदीकर, बा. भ. बोरकर, वसंत बापट, शंकर पाटील, शांता शेळके, गंगाधर गाडगीळ, गं. बा. सरदार, शंकरराव खरात, डॉ. रा. चिं. ढेरे, व. पु. काळे, नारायण सुर्वे, ना. ग. गोरे, आनंद यादव, ग. प्र. प्रधान, म. द. हातकणंगलेकर, डॉ. य. दि. फडके, डॉ. गंगाधर पानतावणे, मारुती चितमपल्ली, ना. धों. महानोर, नामदेव ढसाळ, अरुण साधू, रामदास भटकळ, ह. मो. मराठे, न्या. नरेंद्र चपळगावकर, वसंत आबाजी डहाके, गिरीश प्रभुणे, कवी सौमित्र अशा अनेक नामवंतांनी औदुंबर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.

हे एक दिवसाचे संमेलन. संमेलनादिवशी नियोजित अध्यक्ष येतात. त्यांचे साहित्य मंडळ, ग्रामस्थ आणि उपस्थित रसिकांतर्फे स्वागत केले जाते. अध्यक्ष थोडी विश्रांती घेऊन औदुंबरचा परिसर पाहायला निघतात. त्यांच्याबरोबर मंडळाचे सदस्य आणि रसिकही येतात. लेखन करणारे उत्साही तरुणही त्यात सामील होतात. एखादे अध्यक्ष कवी म्हणून प्रसिद्ध असतील तर त्यांना तरुण, उत्साही मंडळी आपल्या कविता वाचून दाखवतात. काही वेळा अध्यक्ष या तरुणांच्या कवितांमध्ये दुरुस्तीसुद्धा सुचवतात. उदाहरणार्थ, प्रा. श्री. के. क्षीरसागर अध्यक्ष असताना त्यांच्याकडून कविता दुरुस्त करून घ्यायला अनेक नवे कवी आले होते. प्रा. क्षीरसागरही त्यांना प्रेमाने दुरुस्त्या सांगत होते.

थोडय़ा वेळाने भोजनाची वेळ होते. संमेलनाला आलेल्या सर्वाचे भोजन अध्यक्षांबरोबरच होते. १२ ते ३ या वेळात कविसंमेलन असते. हे कविसंमेलन म्हणजे ज्याला आपण कवी आहोत असे वाटते, त्याने आपले नाव नोंदवायचे. दुपारी तीन वाजेपर्यंत हे संमेलन चालते. विंदा करंदीकर या संमेलनाचे अध्यक्ष असताना कविसंमेलनाच्या वेळी व्यासपीठासमोरच्या बैठकीवरच बसले होते. विंदा म्हणाले, ‘हेच आमचे रसिक आणि चाहते आहेत.’

संमेलनाच्या निमित्ताने काही ना काही विशेष गोष्टी घडत असतात. १९६२ सालच्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून काकासाहेब गाडगीळ येणार होते. परंतु गाडगीळांना काही अडचण आल्यामुळे या संमेलनाला येणे शक्य झाले नाही. ऐनवेळी तोलामोलाचा अध्यक्ष शोधणे ही अवघड गोष्ट होती. अध्यक्षांच्या नव्या नावासाठी शोध घेतला असता देवदत्त दाभोलकर यांचे नाव पुढे आले. दाभोलकरांना भेटण्यासाठी कवी सुधांशू सांगलीला गेले. तेव्हा दाभोलकर विलिंग्डन कॉलेजमध्ये शिकवत होते. त्यांना औदुंबरच्या संमेलनाची अडचण संयोजकांनी सांगितली तेव्हा प्रा. दाभोलकरांनी अध्यक्ष म्हणून यायला संमती दिली. ते संमेलनाला आले. त्यांनी तात्त्विक, पण सोपे भाषण केले.

अर्थात काकासाहेब गाडगीळ यांनाही संमेलनाला अध्यक्ष म्हणून यायची इच्छा होतीच; तसेच आम्हा सर्व मंडळींचीही. काही दिवसांनी काकासाहेबांचे औदुंबरला येत असल्याचे पत्र आले. म्हटल्याप्रमाणे ते औदुंबरला आले. त्यांचे व्याख्यान आम्ही आयोजित केले होते. काकासाहेब नेहमीप्रमाणे सुंदर बोलले. ते रसिकांना फार रुचले. अशा तऱ्हेने त्या वर्षी साहित्य संमेलनाला दोन अध्यक्ष लाभले.

औदुंबरच्या संमेलनातील आणखी एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. विजय तेंडुलकर संमेलनाचे (१९९० साली) अध्यक्ष होते. तेव्हा गावातल्या एकमेकांतल्या वितुष्टाचा परिणाम संमेलनावरही झाला होता. संमेलनात काही दंगा होण्याची शक्यता लक्षात आली होती. हे तेंडुलकरांना सांगितले. तेव्हा तेंडुलकर म्हणाले, ‘मग तर काहीच हरकत नाही. मी येणारच. मला हिंसाचाराच्या (व्हायोलन्स) अभ्यासासाठी पाठय़वृत्ती मिळालेली आहे.’ तेंडुलकरांचे भाषण सुरू होण्यापूर्वी दंगलीची थोडी सुरुवात होत होती. पण ती तिथल्या तिथेच शमवली गेली. नंतर तेंडुलकरांचे अप्रतिम भाषण शांततेत पार पडले.

वर्षभर लोक या संमेलनाची वाट

पाहत असतात. कोण अध्यक्ष येणार, याची उत्सुकता त्यांना लागून राहिलेली असते. इथे उपस्थित राहणाऱ्यांकडून, सुजाण ग्रामस्थांकडून सर्व प्रकारचे साहाय्य या संमेलनाला होत असते. औदुंबरच्या परिसराशिवाय सातारा, कोल्हापूर जिल्ह्यंतूनही मोठय़ा प्रमाणात रसिक येतात. या संमेलनाचं वैशिष्टय़ म्हणजे प्रतिवर्षी अध्यक्षाची निवड कार्यकारिणी एकमतानं करते. त्यामुळे अध्यक्षनिवडीसाठी इतरत्र होणाऱ्या लढाया इथं दिसत नाहीत. निरपेक्ष अशा सामूहिक वृत्तीतून आमच्या औदुंबर साहित्य संमेलनातील साधेपणा टिकून राहिलेला आहे.

गेल्या पंच्याहत्तर वर्षांत महाराष्ट्रात सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतरं पुष्कळ झाली. खेडय़ातल्या लोकांना साहित्याची ओळख झाली. ही मंडळी साहित्याविषयी बोलू लागली, लिहूही लागली. उदाहरणार्थ, ‘गावठाण’ हे खेडय़ाचं अनुपम चित्रण करणारे लेखक कृष्णात खोत यांना या साहित्य संमेलनापासून लिहायची प्रेरणा मिळाली. विजय जाधव यांच्या ‘जलप्रलय’ या वेधक कादंबरीचंही नाव घेता येईल. द. तु. पाटील यांच्या ‘चत’ कादंबरीला इथंच प्रोत्साहन मिळालं. अशी बरीच तरुण मंडळी आपल्या लेखनाला शब्दरूप देण्यासाठी या संमेलनाकडून बळ मिळवीत आहेत.

औदुंबरातलं आणखीन एक सांस्कृतिक परिवर्तन म्हणजे पूर्वी निरक्षर असणारांची मुलं आता पदव्या मिळवू लागलीत.. लिहू लागलीत. मुलीसुद्धा यात मागं नाहीत. आधुनिक विचारांना भिडण्याची प्रगल्भता त्यांच्यात निर्माण होत आहे, ही आनंदाचीच गोष्ट आहे.

मी ‘मौज’सारख्या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेत संपादक म्हणून काम करत असतानाच ‘सदानंद साहित्य मंडळ’ या संस्थेचा अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. ही दोन्ही पदे माझ्याकरता परस्परपूरक ठरली. माझ्या लेखनामुळे आणि ‘मौज’मधल्या संपादकीय कामामुळे अनेक प्रतिभावान लेखकांशी माझी जवळीक निर्माण झाली. त्यांना औदुंबरच्या आमच्या संमेलनात अध्यक्ष म्हणून आमंत्रित करणे सोपे झाले. औदुंबरच्या संमेलनास यावे असा मी पु. ल. देशपांडे यांना आग्रह केला. त्यांनी मला लिहिले : ‘औदुंबरला एक दिवस दत्त म्हणून उभा राहीन!’ आणि ते आलेही. अपूर्व अशी गर्दी त्या संमेलनाला (१९६६ साली) झाली होती.

अलीकडच्या काळात माध्यमे अतिशय प्रभावी बनली आहेत. अगदी आंतरराष्ट्रीय लेखकांचीसुद्धा भाषणे, मुलाखती आज वाचक/श्रोत्यांना सहज उपलब्ध होत आहेत. या पाश्र्वभूमीवर या संमेलनाला प्रत्यक्ष उपस्थित राहून मिळणारा प्रतिसाद कसा असतो, असा प्रश्न मला हल्ली विचारण्यात येतो. याव माझं उत्तर आहे : संमेलन अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता नव्या तंत्रज्ञानाचे साहाय्य घ्यायलाही हरकत नाही. पण अजून तसा विचार झालेला नाही. प्रतिभावंत अध्यक्षामुळे त्यांच्या भाषणाला गर्दी होत राहते. स्क्रीनवर लेखकाला पाहून त्याला प्रत्यक्ष पाहण्याची लोकांची उत्सुकता अधिकच वाढताना दिसते. त्यामुळे या संमेलनाला अधिकच गर्दी होत आहे. तेव्हा त्याबद्दल कसलीच काळजी वाटत नाही.

शब्दांकन : डॉ. वर्षां कुलकर्णी