News Flash

फॅशनदार : ‘कपडे’पट!

फिचर फिल्मव्यतिरिक्त मनोरंजनाच्या इतर माध्यमांमध्ये कपडा आणि अ‍ॅक्सेसरीजचे प्रकार आणि त्यांची गरज बदलत राहते.

सायली सोमण

मागच्या महिन्यातच फॅशन इंडस्ट्रीमधील करिअर्सया लेखात कॉस्च्युम स्टायलिंग या एका करिअरची छोटीशी तोंडओळखही करून झाली आहे.

आता कुठल्याही प्रकारच्या प्रोजेक्टसाठी कॉस्च्युम डिझायनिंग करताना साधारणपणे काय प्रक्रिया असते हे जाणून घेऊ या..

गेले काही दिवस मी एका फिचर फिल्मसाठी कॉस्च्युम्स डिझाइन करण्यात इतकी व्यग्र आहे की माझ्या डोक्यात त्या फिल्म आणि त्यातील पात्र काय कपडे घालतील, त्यावर कुठले दागिने अथवा अ‍ॅक्सेसरीज असतील, पायात कशा प्रकारच्या चप्पल किंवा बूट घालतील, त्यांचा मेकअप कसा असेल, हेअरस्टाईल कशी असेल.. म्हणजे एकूणच त्या पात्रांचा या पूर्ण चित्रपटामध्ये काय पेहराव असेल? इत्यादी. हे सर्व विचार चालता-बोलता, उठता-बसता सतत डोक्यात सुरू आहेत. शिवाय मागच्या महिन्यातच ‘फॅशन इंडस्ट्रीमधील करिअर्स’ या लेखात कॉस्च्युम स्टायलिंग या एका करिअरची छोटीशी तोंडओळखही करून झाली आहे. म्हणून मग आता कुठल्याही प्रकारच्या प्रोजेक्टसाठी कॉस्च्युम डिझायनिंग करताना साधारणपणे काय प्रक्रिया असते हे जाणून घेऊ या..

कुठल्याही प्रकारचा चित्रपट असो किंवा नाटक असो, जाहिरात असो अथवा टेलीव्हिजन; त्यामधील पात्रांचे कॉस्च्युम करण्यासाठी सर्वप्रथम त्या चित्रपटाची/ प्रोजेक्टची पूर्ण स्क्रिप्ट माहिती असणे खूप गरजेचे असते. यासाठी स्क्रिप्ट आणि कॅ रेक्टर डेमोग्राफिक्सवरचा अभ्यास अतिशय तपशीलवार असावा. कॅ रेक्टर डेमोग्राफीक म्हणजे कुठल्याही कथेतील एका पात्राची पाश्र्वभूमी समजून घेणे. म्हणजेच तिचं किंवा त्याचं वय, रोजच्या बोलीतील भाषा, स्वभाव, व्यक्तिरेखा, व्यवसाय, धर्म, राहत्या जागेचा माहोल इत्यादी. म्हणजेच एका पात्राचं राहणीमान लक्षात घेऊन आपल्याला एका अभिनेता-अभिनेत्रीचं रूपांतर त्या कथेतल्या व्यक्तिरेखेप्रमाणे करावं लागतं. उदहारणार्थ काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘लंच बॉक्स’ चित्रपटातील पात्रांकडे बघितलं तर आपल्याला त्यांचा पेहराव आपण रोजच्या आयुष्यात करतो त्याला साजेसा आणि साधा आहे. मग ते निवृत्तीला आलेल्या मिस्टर फर्नाडिस यांचे साधे फॉर्मल शर्ट पॅन्ट असो किंवा मग मुंबईतील एक मध्यमवर्गीय घरातील गृहिणी इराचे सलवार कुर्ते असो; या साधेपणामुळेच प्रेक्षक म्हणून बघताना आपले लक्ष इतर गोष्टी सोडून या चित्रपटाच्या कथेकडे आणि दिग्दर्शनाकडे जास्त जातं. तेच आपण जेव्हा ‘बाजीराव मस्तानी’सारखा एक ऐतिहासिक-पिरिअड ड्रामा बघतो तेव्हा या चित्रपटाच्या कथेचा, दिग्दर्शन, कालादिग्दर्शनाचा कॅ नव्हास इतका मोठा आहे की फिल्ममधील प्रत्येक फ्रेम जणू एक सुंदर पेंटिंगसारखी दिसते. एकेक पेहरावावर खूप निगुतीने आणि बारकाईने काम झाले आहे. काशीबाईच्या साडीपासून ते पेशवा बाजीरावाच्या पगडीपर्यंत नव्हे तर एक साधारण सैनिकापर्यंत सगळ्यांचेच कपडे, दागिने,पायातील वहाणा खास पेशवाई काळाप्रमाणे बनवून घेतले होते. या दोन्ही चित्रपटांतील वेशभूषा एकमेकांपेक्षा भिन्न प्रकारची असली तरीही ती आपापल्या चित्रपटाला एक उत्तम कलाकृती बनवायला मदतच करतात. हे सगळे कपडे, दागिने सुचवताना आपल्याला त्या चित्रपटाच्या मूडप्रमाणे त्याचे कलर पॅलेट ठरवावे लागते. मग त्यानंतरच कपडे विकत किंवा बनवून घेतले जातात. प्रत्येक वेळेस सर्व कपडे शिवून घेणे किंवा मॉलमधूनच कपडे खरेदी करणे हे गरजेचे नसते. विशेषत: एका ग्रामीण धाटणीच्या कथेतील पात्रांचे कपडे आपण अति फॅ शनेबल ठेवणार नाही, त्याउलट तसे पारंपरिक कपडे कुठे मिळतात तिथे बघून खरेदी करू.

फिचर फिल्मव्यतिरिक्त मनोरंजनाच्या इतर माध्यमांमध्ये कपडा आणि अ‍ॅक्सेसरीजचे प्रकार आणि त्यांची गरज बदलत राहते. उदाहरणार्थ, टेलीव्हिजन मालिकांचे चित्रीकरण जास्तीत जास्त क्लोज-अप्स आणि मिड प्रोफाईलमध्ये होत असल्यामुळे त्यातील वेशभूषेचा विचारही त्याच पद्धतीने केला जातो. म्हणजे त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखा केसांपासून ते हातांपर्यंत कशी वेगळी दिसेल याचा विचार जास्त केला जातो . शिवाय, या मालिका टेलीव्हिजनवर रोज लागत असल्यामुळे बरेच प्रेक्षक स्वत:ला त्या व्यक्तिरेखांमध्ये शोधतात; म्हणूनच त्यांच्या वेशभूषेत निदान एक वैशिष्टय़, वेगळेपण असायला हवं. उदाहरणार्थ ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील जान्हवीचे तीन पदरी मंगळसूत्र असो किंवा ‘देवयानी’ मालिकेतील संग्रामचे कुर्ते. या मालिका संपल्या तरी त्यांच्या वेशभूषेची चर्चा अजूनही होत आहे. नाटकाच्या बाबतीत प्रयोग सुरू असताना पूर्ण वेळ ते पात्र प्रेक्षकांच्या समोर असल्यामुळे त्यांचा पेहराव शेवटच्या रांगेत बसलेल्या व्यक्तीला ही दिसेल इतपत उठावदार असायला हवा. त्याचबरोबर लाइव्ह परफॉर्मन्स असल्यामुळे त्या नाटकाच्या दरम्यान पात्रांना कॉस्च्यूम बदलायला असलेला वेळ लक्षात घेऊन त्याप्रमाणे कमीत कमी वेळात कपडे कसे बदलता येतील त्याप्रमाणे कपडय़ांची रचना ठरवणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी गाजलेले भरत जाधव यांनी ‘सही रे सही’ या नाटकात इतके वेगवेगळे पेहराव केले आहेत की अक्षरश: एक पेहराव जवळजवळ तीन मिनिटांत बदलावा लागतो. हे सगळं त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कसं जमत असेल हा प्रश्न मला अजूनही पडतो. जाहिरातीच्या बाबतीत ज्या प्रॉडक्टची जाहिरात आपण करतोय त्याच्या ब्रँड लोगोचं कलर पॅलेट सांभाळणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे टीव्हीवर समजा नेसकॅ फेची जाहिरात लागली असेल तर त्यातील नटनटय़ांचे कपडे नेसकॅ फेच्या ब्रँड कलरप्रमाणे बेज, ब्राऊन, मरून इत्यादी रंगांप्रमाणे असते.

इतर क्षेत्रांप्रमाणे कॉस्च्यूम स्टायलिंगमध्येसुद्धा कल्पकता आणि सर्जनशीलतेच्या बरोबरीने कामातील व्यवस्थितपणा आणि व्यावहारिकपणा तितकाच महत्त्वाचा ठरतो. प्रत्येक प्रोजेक्टसाठी त्यातील पात्रसंख्या आणि त्यांना लागणारे कपडे, अ‍ॅक्सेसरीजचे प्रकार आणि संख्येप्रमाणे विशिष्ट बजेट ठरलेले असते. हे कपडे आपल्याला त्याच बजेटमध्ये बसवावे लागतात आणि ते एकदा अपल्याकडे आल्यावर ते कॅरेक्टरप्रमाणे तितक्याच व्यवस्थितपणे ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. आपल्या वैयक्तिक गरजेच्या वस्तूंप्रमाणेच या वस्तूही नीट जपाव्या लागतात.

इतर डिपार्टमेंटप्रमाणेच कॉस्च्यूम डिझायनिंग-स्टायलिंगमध्ये पण तितकीच मेहनतीच्या बरोबर जागरूकता, प्रसंगावधान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सहकाऱ्यांमध्ये संवाद आणि योग्य ती जुळवणूक असणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारच्या मनोरंजक माध्यमामधील पात्रनिर्मिती मागे त्याच्या कथा, दिग्दर्शना एवढंच वेशभूषा आणि रंगभूषा तेवढेच जबाबदार आहे. लेखकाच्या कल्पनेतल्या पात्रांना प्रत्यक्षात उतरवणे ही एक खूप महत्त्वाची जबाबदारी असल्यानेच त्याकडे काटेकोर लक्ष द्यावे लागते!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 12:32 am

Web Title: article on costume designing process
Next Stories
1 कॅफे कल्चर : कोणे एके काळी… ऑलिम्पिया कॉफी हाऊस अ‍ॅण्ड स्टोर्स
2 ‘कर्तव्य’च नाही!
3 ब्रॅण्ड खादी
Just Now!
X