दिवसातून एक सिगारेट ओढण्यामुळेही हृदयविकारचा झटका आणि स्ट्रोक येण्याचा धोका निम्म्याने वाढत आहे.
दर दिवशी २० सिगारेट ओढण्याने हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जेवढे वाढते तेवढेच एक सिगारेट ओढण्यामुळे वाढत असल्याचा इशारा नव्याने करण्यात आलेल्या संशोधनामध्ये देण्यात आला आहे. ब्रिटिश वैद्यकीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधन अहवालामध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

फक्त एक सिगारेट ओढण्यामुळे आरोग्यावर काही परिणाम होत नाही, असा समज असणाऱ्या डॉक्टर आणि अनेक धूम्रपान करणाऱ्यांना हा इशारा असू शकतो. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येण्याची पातळी लक्षणीय स्तरावरून कमी करण्यासाठी पूर्णपणे धूम्रपान थांबवणे आवश्यक असल्याचे संशोधकांनी सांगितले.

ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडनमधील संशोधकांनी याबाबत अधिक संशोधन केले. यासाठी त्यांनी १४१ संशोधनपर प्रसिद्ध झालेल्या अभ्यासाच्या निष्कर्षांचा आढावा घेत दररोज एक, पाच किंवा २० सिगारेट ओढणाऱ्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास केला.

जे लोक दिवसाला एक सिगारेट ओढतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण ४६ टक्क्यांनी वाढते. आणि जे लोक दिवसाला २० किंवा त्यापेक्षा अधिक सिगारेट ओढतात त्यांना हृदयविकारचा झटका येण्याचे प्रमाण ४१ टक्क्यांनी वाढत असल्याचे अभ्यासात दिसून आले.

महिलांमध्ये ज्या महिला प्रतिदिन १ सिगारेट ओढतात त्यांना हृदयविकार होण्याचा धोका ३१ टक्क्यांनी वाढतो.

आणि ज्या महिला २० पेक्षा अधिक सिगारेट ओढतात त्यांना हृदयविकारचा झटका येण्याचे प्रमाण ३४ टक्क्यांनी वाढत असल्याचे अभ्यासात दिसून आले. सिगारेट ओढण्यामुळे हृदयविकारचा झटका येण्याचे प्रमाण महिलांमध्ये दुप्पट असल्याचे संशोधकांनी सांगितले. अशा प्रकारचे हे पहिलेच संशोधन आहे.