सध्याच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशनच्या तुलनेत फेसबुकची लोकप्रियता कमी होऊ लागल्याचे निदर्शनास आले आहे. फेसबुक हे मेसेजिंग अॅप्सप्रमाणे तितकेसे ‘कुल’ वाटत नसल्यामुळे तरूणाई फेसबुकवर पूर्वीपेक्षा कमी वेळ व्यतीत करत असल्याचे वास्तव समोर आहे. नुकत्याच १७,००० इंटरनेट युजर्सना घेऊन करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही बाब पुढे आली आहे. यामधील पन्नास टक्के लोकांनी आता आपण फेसबुकचा वापर पूर्वीपेक्षा कमी केल्याचे सांगितले. ‘मार्केट टीन पिलिग्राम’ या संकेतस्थळाच्या माहितीनुसार इंग्लंड आणि अमेरिकेतील ६४ टक्के किशोरवयीन मुलांना फेसबुक पूर्वीसारखे आकर्षक वाटत नसल्याचे समोर आले आहे. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी तरूणाईची पसंती डिजिटल तंत्रज्ञानालाच असली तरी, फेसबुकऐवजी आता इन्स्ट्राग्राम आणि इतर मेसेजिंग अॅप्सकडे तरूणाईचा ओढा वाढला आहे.
ग्लोबल वेब इंडेक्सकडून २०१४च्या तिमाहीतील सोशल माध्यमांच्या जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, फेसबुकवर फोटो शेअरिंग आणि मेसेजचे प्रमाण वीस टक्क्यांनी घटले आहे. मात्र, एकीकडे फेसबुकची लोकप्रियता घटत असली तरी, फेसबुकचे मेसेंजर अॅप तरूणाईमध्ये चांगलेच लोकप्रिय आहे. या मेसेंजर अॅपने वापराच्या बाबतीत ‘वॉटस अॅप’ लाही मागे टाकले आहे. ही परिस्थिती पाहता, फेसबुकच्या लोकप्रियतेला लागलेल्या ओहोटीसाठी मेसेजिंग अॅप्स जबाबदार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.