दमून घरी आल्यावर रिफ्रेश होण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

सहज करता येण्याजोगे उपाय

दिवसभर ऑफीसमध्ये काम करुन घरी आल्यावर आपण सगळेच दमलेले असतो. प्रवास, कामाचा ताण आणि इतर अनेक गोष्टींमुळे शारीरिक आणि मानसिकरित्याही थकून जायला होते. अशावेळी आपण घरी येतो आणि काही काळ आडवे होतो. यामुळे रिलॅक्स वाटेल असे जरी आपल्याला वाटत असले तरीही थकवा घालविण्यासाठी हा उत्तम मार्ग असू शकत नाही. तर असे अनेक चांगले उपाय आहेत त्यामुळे तुमचा थकवा काही वेळात निश्चितच कमी होऊ शकतो. पाहूयात असे कोणते उपाय आहेत ज्यामुळे आपला थकवा कमी होण्यास मदत होईल.

* आंघोळ करा

दिवसभर काम करुन थकवा आल्यानंतर आंघोळ करणे हा उत्तम उपाय असू शकतो. या आंघोळीच्या पाण्यात थोडे मीठ टाकल्यास शरीराचे स्नायू शिथिल होण्यास मदत होते. तुमच्याकडे बाथटब असेल तर आणखीनच छान. त्यामध्ये १५ ते २० मिनीटे पडून राहील्यास थकवा जाण्यास मदत होते.

* स्ट्रेचिंगचे व्यायाम करा

आपण ऑफीसमध्ये किमान ७ ते ८ तास बसून असतो. यामुळे आपल्या शरीराचे स्नायू आखडतात आणि दुखतात. त्यामुळे तुम्ही घरी आल्यावर स्ट्रेचिंगचे व्यायाम केल्यास स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो. यामुळे तुम्हाला छान झोपही येईल. तसेच अशाप्रकारचे व्यायामप्रकार केल्यामुळे तुमचे शरीर लवचिक राहण्यासही मदत होईल.

* ध्यानधारणा करा 

ध्यान करणे हा ताण कमी करण्याचा एक उत्तम उपाय आहे. त्यामुळे घरी आल्यावर डोळे मिटून काही वेळ शांत बसा. यावेळी श्वासावर लक्ष केंद्रित करुन डोक्यात जे विचार येतील ते येऊद्या. त्यामुळे डोके शांत होण्यास मदत होईल. हा उपाय केल्याने नकारात्मकता काही प्रमाणात कमी होऊन तुम्ही नकळत प्रसन्न होता.

* गाणी ऐका किंवा पुस्तके वाचा

आपण करत असलेले काम हे आपली आवड असेलच असे नाही. त्यामुळे आपल्याला आवडत असलेल्या गोष्टी केल्यास आपल्याला प्रसन्न वाटते. गाणी ऐकणे आणि आपल्या आवडीचे काहीतरी वाचणे यामुळे आपण नक्कीच रिलॅक्स होतो. त्यामुळे दमून घरी गेल्यावर गाणी ऐकणे किंवा पुस्तक वाचणे हा थकवा घालवण्याचा उत्तम उपाय होऊ शकतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Easy ways to relax at home after coming back from hectic daily routine

ताज्या बातम्या