10 signs your blood sugar is too high: सध्या शरीरात साचणाऱ्या साखरेचा सगळ्यांनीच धसका घेतला आहे. आजकाल रील्स, व्हिडीओजमध्येही आपण पाहतो की, साखर जास्त खाल्ल्याने काय काय दुष्परिणाम होतात. त्यामुळे प्रत्येक जण गोड खाताना १० वेळा विचार करतो. पण, असे अनेक पदार्थ आहेत, ज्यामध्ये साखर खूप असते; पण आपल्याला त्याबाबत माहीतच नसते. चहा, कॉफी, सोडा, फास्टफूड यांसारखे पदार्थ तर असे आहेत की, ज्यातून आपण मोठ्या प्रमाणात साखरेचे सेवन करीत असतो आणि ती आपल्या आरोग्याला हानी पोहोचवतेय हे आपल्या लक्षातच येत नाही.
विशेषतः तरुण पिढीमध्ये साखर खाण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. परंतु, साखरेच्या अति सेवनामुळे शरीरात अशी काही लक्षणे दिसू लागतात, जी आपल्याला सतर्क करतात. चला तर मग जाणून घेऊ जास्त साखर सेवन केल्यामुळे शरीरात कोणती लक्षणे दिसतात आणि त्यातून आपल्या आरोग्याला काय धोके होऊ शकतात. जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण खूप जास्त असते; विशेषतः २५० मिलिग्रॅम/डीएलपेक्षा जास्त असते, तेव्हा तुमचे शरीर धोक्याची चिन्हे दाखवू लागते. ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमधील अंतर्गत औषध संचालक डॉ. अमित सराफ यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.
डॉ. अमित सराफ म्हणाले की, उच्च रक्तातील साखर किंवा हायपर ग्लायसेमिया बहुतेकदा हळूहळू विकसित होते आणि जर तुम्हाला धोक्याची चिन्हे माहीत नसतील, तर ते दुर्लक्षित केले जाऊ शकते. “ही लक्षणे हळूहळू येऊ शकतात आणि सुरुवातीला दुर्लक्षित केली जातात”, असे झांड्रा हेल्थकेअरचे मधुमेहशास्त्र प्रमुख व रंग दे नीला इनिशिएटिव्हचे सह-संस्थापक डॉ. राजीव कोविल यांनी सांगितले.
काही सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे :
वारंवार लघवी होणे- जेव्हा साखरेची पातळी जास्त असते तेव्हा तुमचे मूत्रपिंड जास्त ग्लुकोज काढून टाकण्यासाठी जास्त वेळ काम करतात, ज्यामुळे वारंवार लघवीला जाण्याची शक्यता वाढते. “सर्वांत सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे खूप तहान लागणे. तुम्ही कितीही पाणी प्यायलात तरी कोरडेपणा कायम राहतो. त्यानंतर वारंवार लघवी होते; विशेषतः रात्री लघवीसाठी जागे व्हावे लागते”, असे डॉ. कोविल म्हणाले.
जास्त तहान- लघवीद्वारे शरीरातून जास्त प्रमाणात द्रवपदार्थ कमी झाल्यामुळे पाणी प्ययाल्यानंतरही तुम्हाला असामान्य तहान लागू शकते.
वाढलेली भूक- पुरेशा प्रमाणात खाल्ल्यानंतरही तुमचे शरीर ऊर्जेसाठी ग्लुकोजचा योग्य वापर करू शकत नाही, ज्यामुळे तुम्हाला पुन्हा लवकर भूक लागते, असे डॉ. सराफ म्हणाले.
थकवा- जेव्हा ग्लुकोज तुमच्या पेशींमध्ये प्रभावीपणे प्रवेश करू शकत नाही, तेव्हा तुमच्या शरीराला ऊर्जेची कमतरता भासते, ज्यामुळे तुम्हाला सतत थकल्यासारखे वाटत राहते.
धूसर दृष्टी- साखरेची उच्च पातळी डोळ्यांमधील द्रवपदार्थांचे प्रमाण बदलू शकते, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या स्पष्टपणे पाहण्याच्या क्षमतेवर तात्पुरता परिणाम होतो. “काहींना अंधुक दृष्टी, कोरडे तोंड किंवा डोकेदुखीचा अनुभव येऊ शकतो,” असे डॉ. कोविल म्हणाले.
हळूहळू बऱ्या होणाऱ्या जखमा – वाढलेले ग्लुकोज रक्ताभिसरण आणि रोगप्रतिकार शक्तीचे कार्य बिघडू शकते, ज्यामुळे शरीराची बरी होण्याची प्रतिक्रिया मंदावते. डॉ. कोविल म्हणाले, “तुम्हाला जखमा हळूहळू बरी होताना किंवा मूत्रमार्ग किंवा त्वचेच्या संसर्गासारखे वारंवार होणारे संक्रमणदेखील दिसू शकते.”
वजन कमी होणे- जर तुमचे शरीर साचलेल्या साखरेचा योग्य त्या प्रमाणात वापर करू शकत नसेल, तर ते ऊर्जेसाठी स्नायू आणि चरबीचे तुकडे करते. “काहींना मळमळ, उलट्या किंवा पोटदुखीदेखील जाणवू शकते. विशेषतः जर रक्तातील साखरेचे प्रमाण धोकादायक असेल (३०० मिलिग्रॅम/डीएलपेक्षा जास्त)”, असे डॉ. कोविल म्हणाले.
वारंवार होणारे संक्रमण- साखरेची उच्च पातळी रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करते आणि त्यामुळे तुम्ही सारखे आजारी पडू शकता.
हात/पायांमध्ये मुंग्या येणे किंवा सुन्न होणे- शरीरातील साखरेचे प्रमाण सातत्याने जास्त असेल, तर त्यामुळे नसा खराब होऊ शकतात. त्यामुळे विशेषतः हातपायांमध्ये मुंग्या येणे किंवा हातपाय सुन्न होणे यांसारखी लक्षणे (मधुमेह न्यूरोपॅथी) जाणवू शकतात, असे डॉ. सराफ म्हणाले.
चिडचिडेपणा किंवा मूड स्विंग्स- साखरेच्या पातळीतील चढ-उतारामुळे मेंदूतील रसायनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे मूड आणि वर्तनात बदल होऊ शकतात, असे डॉ. सराफ म्हणाले.
जर तुम्हाला अशा स्वरूपाची अनेकविध लक्षणे जाणवत असतील, तर वेळेवर निदान आणि व्यवस्थापनासाठी रक्तातील साखरेची चाचणी करून डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
डॉ. कोविल यांनी इशारा दिला की, विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तीमध्ये जर ही लक्षणे दिसली, तर ताबडतोब रक्तातील साखरेची तपासणी करणे आणि वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. “उच्च साखरेच्या पातळीकडे दुर्लक्ष केल्याने डायबेटिक केटोअॅसिडोसिस (DKA)सारख्या गंभीर गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात.