Bollywood Actress Skin Secret: उपवास हा आरोग्याविषयीच्या चर्चेत खूप महत्त्वाचा विषय ठरला आहे. काही लोक त्याचा वापर मानसिक समाधानासाठी करतात; तर काही लोक वजन कमी करण्यासाठी उपवासावर अवलंबून राहातात.
‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री ९ दिवस फक्त पिते पाणी (Bollywood Actress Fasting)
‘रॉकस्टार’फेम बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीसुद्धा उपवासाच्या एका वेगळ्या पद्धतीचे अनुसरण करते. पण त्यामागे एक मोठा धोका आहे. अलीकडच्या एका मुलाखतीत तिनं सांगितलं की ,ती वर्षातून दोनदा फक्त पाणी पिऊनच उपवास करते आणि तोही थेट सलग नऊ दिवस. “मी वर्षातून दोन वेळा उपवास करते. त्यादरम्यान मी काहीही खात नाही. नऊ दिवस फक्त पाणी पिते. खूप कठीण असतं हे. पण, एकदा ही गोष्ट पूर्ण केल्यावर खरंच सांगते, चेहरा अगदी सुंदर दिसतो आणि त्वचा चमकत असते. पण, मी हा उपवास सगळ्यांना सुचवणार नाही,” असं तिनं सोहा अली खानला Hauterrfly च्या YouTube चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
जरी उपवासामुळे आपला चेहरा चांगला दिसतो, असं तिनं सांगितलेलं असलं तरी तिनं लगेच इशारा दिला की, असे टोकाचे उपाय सगळ्यांसाठी योग्य नसतात. “सगळ्यांनाच झटपट परिणाम हवा असतो; पण असे काहीही झटपट मिळत नाही. हे सगळं वेगवेगळ्या गोष्टींच्या एकत्रित परिणामामुळेच होतं. माझ्यासाठी त्या गोष्टी म्हणजे चांगली झोप. मी दररोज आठ तास झोपते. मी शरीराला भरपूर पाणी देण्याचा प्रयत्न करते आणि त्याचबरोबर माझं खाणंपण महत्त्वाचं असतं. म्हणजे मला असं अन्न हवं असतं, ज्यामध्ये पोषण मूल्य, जीवनसत्त्वं व खनिजं असतात,” असं तिनं सांगितलं.
नऊ दिवस फक्त पाणी पिणे वैद्यकीयदृष्ट्या कितपत सुरक्षित? अशा उपवासाने कोणते शारीरिक वा मानसिक धोके संभवतात?
डॉ. अंजना कालिया, आयुर्वेदिक डॉक्टर आणि डाएट क्लिनिक्समध्ये न्यूट्रिशनिस्ट, यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं, “सामान्य व्यक्तीसाठी नऊ दिवसांचा फक्त पाण्याचा उपवास वैद्यकीयदृष्ट्या सुरक्षित मानला जात नाही. अशा प्रकारे दीर्घकाळ उपवास केल्यास, जेव्हा शरीराला काहीही उष्मांक (कॅलरीज) किंवा पोषण मिळत नाही, तेव्हा अनेक गंभीर शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतात. त्यात इलेक्ट्रोलाइट्सचं असंतुलन, शरीरात पाणी कमी होणे (डिहायड्रेशन), साखर कमी होणे, स्नायू कमी होणे, चक्कर येणे, थकवा आणि हृदयाचे ठोके असामान्य होणे यांचा समावेश होतो.”
डॉक्टरांनी पुढे सांगितलं, “शरीराला योग्य प्रकारे काम करण्यासाठी सतत आवश्यक पोषक घटकांची, जसे की जीवनसत्त्वे, खनिजे, ग्लुकोज व प्रोटीन्सची गरज असते. खूप दिवस उपवास केल्याने रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते, मूत्रपिंडाचे कार्य बिघडू शकते आणि मनाची स्पष्टता व मूडवर वाईट परिणाम होतो. मधुमेह, कमी रक्तदाब किंवा इतर कोणताही जुना आजार असलेल्या लोकांसाठी हा उपवास धोकादायक ठरू शकतो. २४ ते ७२ तासांपेक्षा जास्त कालावधीचा उपवास वैद्यकीय देखरेखीखालीच करावा.”
उपवासानंतर चेहरा ‘शार्प’ दिसतो आणि त्वचा चमकते, असं नर्गिस म्हणते. तर असे दिसणारे फायदे उपवासामुळे होतात का?
उपवासानंतर चेहऱ्यावर थोडा बारीकपणा किंवा त्वचेत चमक दिसू शकते, हे शक्य आहे. पण डॉ. कालिया सांगतात की, हे परिणाम सामान्यतः तात्पुरते असतात. ‘शार्प’ लूक हा अनेक वेळा शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे आणि सूज कमी झाल्यामुळे दिसतो. तो खऱ्या अर्थाने चरबी कमी होणे किंवा आरोग्य सुधारल्यामुळे नसतो.
“त्याचप्रमाणे त्वचा स्वच्छ दिसण्याचं कारण म्हणजे प्रक्रिया केलेलं अन्न किंवा अॅलर्जी असणाऱ्या पदार्थांचं कमी सेवन असू शकतं. पण, दीर्घकाळासाठी त्वचेचं आरोग्य हे संतुलित आहार, पाणी पिणं आणि एकूण आरोग्यावर अधिक अवलंबून असतं. उपवासानंतर मिळणारी चमक ही तात्पुरती असते. जेव्हा नेहमीचं खाणं सुरू होतं किंवा शरीरात पोषक घटकांची कमतरता होते, तेव्हा ती चमक लवकरच निघून जाते. त्यामुळे उपवासामुळे मिळणारा ‘क्लीन’ लूक हा फक्त तात्पुरता असतो आणि तो सौंदर्य किंवा आरोग्यासाठी योग्य व खात्रीशीर उपाय नाही,” असं तज्ज्ञ सांगतात.
उपवासाच्या जागी आरोग्यासाठी फायदेशीर आणि टिकाऊ पर्याय
डॉ. कालिया सांगतात की, खूप टोकाचा उपवास करण्यापेक्षा रोजची चांगली आणि नियमित जीवनशैली ठेवणं हे अधिक आरोग्यदायी आहे. फळं, भाज्या, संपूर्ण धान्य, सुसंस्कृत प्रथिनं आणि चांगल्या प्रकारचं तेल यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या. दिवसभर भरपूर पाणी प्या. जास्त साखर, मद्यपान आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. दररोज ७-८ तास झोप घेणं, तणाव नियंत्रणात ठेवणं आणि चालणं किंवा योगासारखा हलका व्यायाम करणं हेदेखील खूप महत्त्वाचं आहे.
त्वचेच्या आरोग्यासाठी, त्या सांगतात की अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असलेलं अन्न (उदा. बेरी, सुका मेवा आणि हिरव्या पालेभाज्या) आणि ओमेगा-३ फॅट्स (उदा. जवसाच्या बिया किंवा चरबीयुक्त मासे) खूप फायदेशीर ठरतात. हे बदल केवळ सुरक्षितच नाहीत, तर दीर्घकाळासाठी टिकाऊ आणि परिणामकारकही असतात.