Boney Kapoor’s Body Transformation : बॉलीवूड निर्माता करण जोहर, अभिनेता राम कपूर, कपिल शर्मा यांच्यानंतर आता निर्माते बोनी कपूर यांनी वजन कमी करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. बोनी कपूर यांनी जिमला न जाता साधं डाएट करून सुमारे २६ किलो वजन कमी केलं आहे. त्यांचा वजन कमी केल्यानंतरचा लूक पाहून आता सर्वांनाच सुखद धक्का बसला.
असे सांगितले जाते की, बोनी कपूर यांनी ज्वारीची भाकरी आणि फळांचा रस असा आहार घेत वयाच्या ६९ व्या वर्षी २६ किलो वजन कमी केले, आता त्यांचे वजन ७६ किलो झाले आहे.
अलीकडेच प्रसिद्ध सेलिब्रिटी पापाराझी विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर बोनी कपूर यांच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते की, ते स्ट्रीक डाएट प्लॅन फॉलो करतात. रात्रीचे जेवण घेत नाहीत, फक्त सूप पितात. सकाळी नाश्त्यामध्ये फक्त फळं किंवा फळांचा रस आणि ज्वारीची भाकरी खातात. यादरम्यान त्यांनी कोणताही व्यायाम किंवा शारीरिक कसरत केली नाही. दरम्यान, नेटिझन्स मात्र बोनी कपूर यांनी वजन कमी करण्यासाठी ओझेम्पिक किंवा मौंजारोसारख्या औषधांची मदत घेतल्याचा दावा करत आहेत.
याचदरम्यान बोनी कपूर यांची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यात त्यांनी दिवंगत पत्नी अभिनेत्री श्रीदेवी यांनी आरोग्याच्या कारणास्तव वजन कमी करण्यास सांगितल्याच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
२०२४ मध्ये एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर म्हणाले होते की, “वजन कमी करण्यामागील प्रेरणा माझी पत्नी होती, कारण श्रीदेवी सतत माझ्या मागे असायची. ती म्हणायची, ‘जेव्हा आपण भेटलो तेव्हा तू किती सडपातळ, सुडौल, उंच आणि देखणा होतास… आणि आता तू… बघ…; तू मिळाल्यानंतर… मी आणखी काय मागू शकतो?’ आरोग्याच्या कारणास्तव, ती मला वजन कमी कर असे सांगायची,… मी तिच्याबरोबर जिममध्ये जायचो, संध्याकाळी फिरायला जायचो, असे सर्व करून वजन कमी करण्याचे अनेकदा प्रयत्न केले, पण ते फार काळ टिकले नाहीत. कदाचित १०-१२ दिवस मी तिने सांगितलेल्या सर्व गोष्टी केल्या, पण त्यानंतर मला विविध समस्या जाणवू लागल्या.”
दरम्यान, यातून पत्नी किंवा कोणाच्या प्रेरणेतून खरंच वजन कमी करण्यास प्रोत्साहन मिळू शकते का? याविषयी डॉक्टर काय सांगतात, जाणून घेऊ…
मुंबईतील परळमधील ग्लेनेगल्स हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसन सिनिअर कन्सल्टंट डॉ. मंजुषा अग्रवाल म्हणाल्या की, तुमच्या जोडीदाराला निरोगी सवयी अंगीकारण्यास प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.
डॉ. अग्रवाल पुढे म्हणाल्या की, जेव्हा एखाद्या गोष्टीवरून किंवा सवयीवरून समोरच्याला आपण सतत टोचून बोलतो, त्यांची थट्टा उडवतो, लाज वाटेल असे वागतो, तेव्हा त्यांच्यात कायमस्वरूपी चांगला बदल घडून येण्याची शक्यता जास्त असते. एखाद्याबरोबर तुलना केल्याने किंवा अल्टिमेटममुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
जीवनशैलीशी संबंधित सवयी, वर्तनात बदल करताना संयम ठेवणं आवश्यक आहे. जर तुमच्या जोडीदाराला खरंच तुमची काळजी दिसून येत असेल आणि तो तुम्ही सांगितलेल्या निरोगी जीवनशैली फॉलो करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो तुमच्या बोलण्यातून योग्य प्रेरणा घेत स्वत:मध्ये बदल करू शकतो, असे डॉ. अग्रवाल म्हणाले.
निरोगी आरोग्यासाठी काही सोप्या टिप्स
१) रोजच्या आहारात सॅलेड किंवा ग्रील्ड, बेक्ड किंवा स्टीम्ड डिशेससारखे निरोगी खाद्य पर्याय निवडा.
२) स्वतःला शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवा.
३) रिफाइंड पर्यायांपेक्षा ब्राऊन राइस किंवा क्विनोआसारखे धान्य निवडा.
४) छोट्या-छोट्या गोष्टीतील विजयाचा आनंद साजरा करा.