Urinary Tract Infection Symptoms: लघवी (urine) करताना जळजळ होणे ही एक सामान्य, पण गांभीर्याने घेण्यासारखी लक्षणे आहेत. अनेकांना वाटते की ही तात्पुरती समस्या असेल, पण तज्ज्ञांच्या मते ही एखाद्या गंभीर आजाराची सुरुवातदेखील असू शकते. लघवी करताना जळजळ किंवा वेदना जाणवणे अनेकदा आपण किरकोळ समजून दुर्लक्ष करतो. मात्र, ही समस्या केवळ डिहायड्रेशन किंवा संसर्गामुळेच होत नाही, तर ती मूत्रमार्गाच्या आजारांपासून ते किडनी व मधुमेहासारख्या गंभीर समस्यांचे सुरुवातीचे लक्षणदेखील असू शकते, अशी माहिती मुंबईतील सैफी हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉ. मंगेश पाटील यांनी दिली आहे.

डॉ. पाटील म्हणतात, “लघवी करताना जळजळ आणि वेदना होण्याच्या समस्येस डिस्युरिया (Dysuria) असं म्हणतात. ही स्थिती एका गंभीर आजाराची सुरुवात असू शकते.”

लघवीत जळजळ होण्यामागील चार प्रमुख कारणं:

१. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI)

लघवी करताना जळजळ होण्याचे सर्वात सामान्य कारण युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) आहे. UTI ही विशेषतः महिलांमध्ये सामान्य समस्या आहे. बॅक्टेरिया मूत्रमार्गात प्रवेश करतात आणि त्यामुळे वेदना, वारंवार लघवी लागणे व जळजळ होणे या समस्या उद्भवू शकतात. या समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या, स्वच्छतेची काळजी घ्या आणि लैंगिक संबंधांनंतर लघवी करा.

२. लैंगिक संबंधातून पसरणारे आजार (STIs)

लघवी करताना जळजळ होण्याचे कारण संक्रमित रोग (STIs) असू शकतात. गोनोरिया, क्लॅमिडीया यांसारखे लैंगिक संसर्गदेखील लघवी करताना जळजळ निर्माण करतात. धोका टाळण्यासाठी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावेत, कंडोमचा वापर करावा आणि नियमित STI तपासणी करावी.

३. मूत्राशयातील खडे (Bladder Stone)

मूत्रातील खनिज पदार्थ एकत्र होऊन पथरी निर्माण करतात, यामुळे लघवी करताना तीव्र जळजळ व वेदना होतात. ही समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि वेळेत उपचार घ्या.

४. प्रोस्टेट सूज (Prostatitis फक्त पुरुषांमध्ये)

पुरुषांमध्ये प्रोस्टेट ही एक अत्यंत महत्त्वाची ग्रंथी आहे जिचा थेट संबंध प्रजननक्षमतेशी आहे. कधीकधी प्रोस्टेटमध्ये संसर्ग होतो, याला Prostatis म्हणतात. प्रोस्टेट ग्रंथीची सूज झाल्यास पेल्विक भागात वेदना, लघवी अडखळून होणे व जळजळ जाणवते. यावर उपाय म्हणून योग्य प्रमाणात पाणी पिणे आणि संसर्गावर वेळेत उपचार आवश्यक आहेत.

स्वतःला कसे सुरक्षित ठेवाल?

भरपूर पाणी प्या : दररोज दोन-तीन लिटर पाणी प्या.

स्वच्छतेची काळजी घ्या : शौच केल्यानंतर आपले खासगी भाग स्वच्छ ठेवा.

सुरक्षित लैंगिक संबंध : कंडोम वापरा व वेळोवेळी तपासणी करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लघवी रोखू नका : वेळेत लघवी करा व संपूर्ण मूत्राशय रिकामे करा.