Tea and Weight Gain: आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. दिवसभर सतत चहा पित राहणारे अनेक जण आपल्या आजूबाजूला असतात. भारतात या पेयावर कोट्यवधी लोकांचे प्रेम आहे. आपल्या देशात पाण्यानंतर हे सर्वांत जास्त प्यायले जाणारे पेय आहे. दिवसाची सुरुवात चहाने केली, तर संपूर्ण दिवस चांगला जातो, असाही काहींचा समज असतो; पण तंदुरुस्त राहण्यासाठी चहा टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण- दुधासोबत चहा प्यायल्याने वजन वाढते, असे म्हटले जाते. पण, खरोखरच एक कप चहा प्यायल्याने वजन वाढते का? याच विषयावर पोषणतज्ज्ञ लीमा महाजन यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. ती सविस्तर माहिती जाणून घेऊ.

चहा म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. अनेकांना दुधाचा चहा आवडतो; तर काही लोक ग्रीन टी पितात. काही लोकांना चहाचे इतके वेड असते की ते दिवसातून चार ते पाच कप किंवा त्यापेक्षा जास्त चहा पितात. पण, हाच चहा प्यायल्यानंतर आपले वजन वाढते, असे अनेकांना वाटते. त्यामुळे चहा बंद करावा का, असा विचार बरेच लोक करतात. काही तो बंदही करतात; पण काहींसाठी चहा म्हणजे जगण्यासाठी लागणारे एनर्जी ड्रिंक असल्याने ते बंद करणे त्यांना जमत नाही. चहा बनविताना दूध आणि साखरेचा वापर केला जातो. कारण- दुधाशिवाय चहा अपूर्ण आहे; पण हे दोन्ही घटक वजन वाढविण्यास कारणीभूत ठरतात.

(हे ही वाचा : वसंत ऋतूत दररोज खा बीट..! जबरदस्त फायदे वाचून थक्क व्हाल )

खरी वस्तुस्थिती अशी आहे की, चहा हे कमी कॅलरीयुक्त पेय आहे. त्यामुळे थेट चहाने वजन वाढत नाही; तर आपण चहामध्ये टाकलेले घटक वजन वाढविण्याचे काम करतात. फुल फॅट्स क्रीम दूध आणि साखरेने वजन वाढते. जर तुम्ही हाय फॅट्स दुधाचा चहा प्यायला, तर त्यामुळे शरीरातील चरबी आणि वजनही वाढते. एका कप चहामध्ये केवळ ३३-६६ कॅलरीज असतात; जे दुधातील फॅट्सच्या प्रमाणावर अवलंबून असते. चहातील कॅलरीज कमी करण्यासाठी तुम्ही फुल क्रीमऐवजी स्किम्ड मिल्क वापरू शकता. तसे केल्याने कॅलरीज अर्ध्याने कमी होतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

तथापि, त्यांनी निदर्शनास आणले की, बरेच लोक त्यांच्या चहामध्ये जास्त साखर घालतात; ज्यामुळे वजन वाढू शकते. त्यामुळे साखरेचे प्रमाण कमी करा. एक टीस्पून साखरेमध्ये फक्त १९ कॅलरीज असतात. एकूण दररोज चहात घातल्या जाणाऱ्या साखरेचे प्रमाण दिवसातून १० ग्रॅमपर्यंत ठेवण्याचीदेखील शिफारस त्यांनी केली. त्याशिवाय चहासोबत बिस्कीटसारखे अनहेल्दी स्नॅक्स घेतल्यास वजनही वाढते, असेही त्या सांगतात. चहा बनविण्यासाठी वापरण्यात येणारे फॅट्सयुक्त दूध आणि साखर प्रत्यक्षात कॅलरीज वाढवू शकते. जर तुम्हाला दुधाचा चहा प्यायचा असेल, तर लो फॅट दूध किंवा टोन्ड मिल्क वापरा.

(हे ही वाचा : बाजारात मिळणाऱ्या ब्रेड्सपैकी कोणते ब्रेड्स खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येईल? तज्ज्ञांचा सल्ला वाचा )

वजन कमी करण्यासाठी चहा कसा प्यावा?

१. चहाचे सेवन दररोज दोन कपपर्यंत मर्यादित ठेवा; जेणेकरून आपण त्याचा आनंद घेऊ शकतो आणि वजनदेखील नियंत्रित ठेवू शकतो.

२. जेवणाच्या आधी किंवा नंतर चहा पिणे टाळा. कारण- त्यामुळे पचनक्रिया आणि पोषक घटकांचे शोषण होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. चहा पिणे आणि जेवण यात कमीत कमी ३० मिनिटांचे अंतर ठेवा.

३. जर तुम्हाला चिंता, झोपेचे विकार किंवा पचनाशी संबंधित समस्या असतील, तर झोपेच्या वेळी चहा पिणे टाळा.

४. अॅसिडिटी टाळण्यासाठी रिकाम्या पोटी चहा पिणे टाळा.

५. चहा किंवा कॉफीच्या ३० मिनिटे आधी आणि नंतर एक ग्लास पाण्याने स्वत:ला हायड्रेट करा; जेणेकरून आम्ल पातळी कमी होईल आणि पचनाच्या समस्या दूर होतील.

खरे तर वजन वाढू नये यासाठी चहामधील साखरेचे प्रमाण कमी करा आणि कमी फॅटचे दूध वापरा; जेणेकरून तुम्हाला तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवता येईल.