Diabetes Causes And Treatment : मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जगभरातील लोक मोठ्या संख्येने या आजाराला बळी पडत आहेत. भारताला तर मधुमेहाची राजधानी मानले जाते. मधुमेहाची लागण झाल्यानंतर रुग्णाला फक्त रक्तातील साखरेच्याच पातळीवरच नियंत्रण ठेवून चालत नाही, तर तुमच्या एकूण जीवनशैलीतच बदल करावे लागतात; अन्यथा जीवघेणी आरोग्य स्थिती उद्भवू शकते.
मिरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या क्रिटिकल केअरचे प्रमुख सल्लागार डॉ. अकलेश तांडेकर यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, हृदयरोग, मूत्रपिंड, यकृत व पित्ताशय यांच्या समस्या टाळण्यासाठी मधुमेहींनी रक्तशर्करेची पातळी नियंत्रित करणे आवश्यक आहे. मधुमेहग्रस्त व्यक्ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करून हृदय व रक्तवाहिन्या आणि रक्ताभिसरणासंबंधीच्या समस्यांचा धोका कमी करू शकते .
जर मधुमेहग्रस्त व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात नसेल, तर त्या स्थितीला हायपरग्लायसेमिया किंवा हाय ब्लड शुगर, असे म्हणतात. रक्तातील वाढत्या साखरेच्या पातळीमुळे शरीरातील लहान रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, ज्यामुळे रक्त तुमच्या अवयवांपर्यंत पोहोचणे कठीण होते. रक्तवाहिन्यांच्या झालेल्या नुकसानीमुळे बहुतेकदा डोळे, हृदय, पित्ताशय, पाय, यकृत व मूत्रपिंड यांच्यावर परिणाम होतो, असेही डॉ. तांडेकर म्हणाले.
डॉ. तांडेकर यांनी स्पष्ट केले की मूत्रपिंडाचा आजार असल्याने मधुमेह आणखी वाढतो. कारण- हृदयरोग, स्ट्रोक, अंधत्व, मज्जातंतूंचे नुकसान होते आणि पाय कापावा लागण्याचीही शक्यता जास्त असते.
कोणते उपाय करावेत?
डॉ. तांडेकर म्हणाले की, रोज व्यायामाबरोबर ताजी फळे, भाज्या, तृणधान्य, डाळी व मसूर यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेणं महत्वाचं आहे. जंक फूड, मसालेदार, तेलकट व कॅन केलेला पदार्थ खाणे टाळावे. डॉक्टरांनी शिफारस केलेली औषधे घ्यावी. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घरी रक्तातील साखरेची पातळी तपासावी. दर ६-८ महिन्यांनी (HbA1c) चाचणी करावी, चांगली झोप घ्यावी लागेल, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील, असे डॉ. तांडेकर म्हणाले.
‘या’ गोष्टींची काळजी घ्या
१) मिठाचे सेवन कमी करा : दररोज २,३०० मिलिग्रॅमपेक्षा कमी मिठाचे सेवन करा.
२) पोटॅशियमचे सेवन वाढवा : तुमच्या आहारात केळी, पालेभाज्या व रताळे यांसारख्या पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश करा.
३) हायड्रेटेड राहा : दिवसभर भरपूर पाणी प्या.
४) ताणतणाव व्यवस्थापित करा : ध्यान, दीर्घ श्वास किंवा योग यांसारख्या ताण कमी करणाऱ्या व्यायाम प्रकारांचा सराव करा.
५) पुरेशी झोप घ्या : रोज रात्री ७-८ तासांची झोप पूर्ण करा.
६) रक्तदाबाचे निरीक्षण करा : घरी किंवा आरोग्य सुविधांमध्ये नियमितपणे तुमचे रक्तदाब तपासा.
७) वजन नियंत्रणात ठेवा : बॉडी मास इंडेक्स (BMI) १८.५ ते २४.९ दरम्यान ठेवा.
८) धूम्रपान, मद्यपान करू नका : धूम्रपान करण्याची सवय सोडल्यास रक्तदाब कमी करण्यास मदत होऊ शकते. तसेच मद्यपान करणेही थांबवा.
९) ओमेगा-३ समृद्ध पदार्थांचे सेवन करा : सॅल्मन, अक्रोड व चिया सीड्स यांसारखे ओमेगा ३ युक्त पदार्थ रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकतात.
१०) पुरेशी विश्रांती घ्या : पुरेशी विश्रांती घ्या. तसेच माइंडफुलनेस आणि बायो फिडबॅक ताण व्यवस्थापित करा. त्यामुळे रक्तदाब कमी करण्यास मदत होऊ शकते.