scorecardresearch

हार्ट अ‍टॅक आणि कार्डिअ‍ॅक अरेस्टमध्ये नेमका काय फरक आहे? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या

सडन कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्ट अ‍ॅटॅक हे दोन्ही आजार ह्रदयाशी संबंधित असले तरी त्यामागची कारणं आणि परिणाम थोडे वेगळे आहेत.

did you know a heart attack is not same as a cardiac arrest find out
हार्ट अटॅक आणि कार्डिअॅक अरेस्टमध्ये नेमका काय फरक आहे ? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या (फोटो: संग्रहित फोटो)

सतत बदलणारी जीवनशैली, कामाचा किंवा कौटुंबिक ताण- तणाव यामुळे ह्रदयविकाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तर इतर अनेक आजारांमुळे ह्रदयासंबंधीत समस्या निर्माण होत आहे. यात आजकाल हार्ट अ‍टॅक हे मृत्यूचे एक कारण ठरत आहे. यात ह्रदयाशी संबंधीत आणखी एका कारणामुळे अचानक मृत्यू होत आहे ज्याला सडन कार्डिअ‍ॅक अरेस्ट असे म्हणतात. यात व्यक्तीच्या ह्रदयाच्या हालचाली अचानक बंद होतात. पण अनेकांना हार्ट अ‍टॅक आणि कार्डिअ‍ॅक अरेस्ट हे आजार एकसारखेच वाटतात. पण तसे नसून हार्ट अ‍टॅक आणि कार्डिअ‍ॅक अरेस्ट मोठा फरक आहे. हा फरक नेमका काय आहे त्याबाबत कावेरी हॉस्पिटलचे कन्सल्टंट कार्डिओथोरॅसिक आणि व्हॅस्कुलर सर्जन डॉ. राजेश टी. आर यांनी news18 वेबसाईटला दिलेल्या माहितीवरून समजून घेऊ..

भारतात ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेय. यामागे अनेक कारणं सांगितली जातात. अचानक ह्रदयाचे कार्य थांबते आणि मृत्यू होतो त्याला कार्डिअ‍ॅक अरेस्ट असे म्हणतात. ह्रदयविकाराशी संबंधित मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक मृत्यू हे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे होतात. यामुळे केवळ भारतातच नाही तर जगातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण कार्डिअ‍ॅक अरेस्ट आहे. कार्डिअ‍ॅक अरेस्ट आल्यानंतर शरीराचा रक्तप्रवाह थांबतो. यात ४ ते ६ मिनिटांत ब्रेन डेड होतो आणि मृत्यू होतो. यात रुग्ण वाचण्याची शक्यता ७ ते ८ टक्क्यांनी कमी होते.

हार्ट अ‍टॅक म्हणजे काय?

आपल्या ह्रदयाला कार्य करण्यासाठी ऑक्सिजन समृद्ध रक्ताची गरज असते. यातून ह्रदयातील रक्तवाहिन्यांमध्ये रक्त पुरवठा केला जातो. पण जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा धमन्या ब्लॉक होतात आणि ह्रदयाला रक्तपुरवठा होत नाही. यामुळे ह्रदयातील स्नायूंचे मोठे नुकसान होते, अशापरिस्थितीत आपण हार्ट अ‍टॅकची काही लक्षणं वेळीच ओळखली पाहिजेत.

सडन कार्डिअ‍ॅक अरेस्ट म्हणजे काय?

सडन कार्डिअ‍ॅक अरेस्टमध्ये ह्रदयाचे ठोके थांबतात, रक्तदाब कमी होतो आणि मेंदूसह सर्व अवयवांच्या रक्तपुरवठ्यावर विपरित परिणाम होतो. मेंदुला रक्तपुरवठा न झाल्याने रुग्णाची शुद्ध हरपते. अशापरिस्थितीत रुग्णाला वेळीच उपचारांसाठी रुग्णालयात दाखल न केल्यास मृत्यूचा धोका वाढतो. कार्डिअ‍ॅक अरेस्टमागे ह्रदयाशी संबंधित कारणं असतीलच असे नाही.

सडन कार्डिअ‍ॅक अरेस्टची कारणं

ह्रदयाचे असमान्य ठोके हे सडन कार्डिअ‍ॅक अरेस्टचे मुख्य कारण आहे. याला सर्वात सामान्य वेंट्रिक्युलर फायब्रिलेशन असेही म्हणतात. शरीरातील विद्युत आवेग ह्रदयाद्वारे पद्धतशीरपणे प्रसारित केले जातात. यामुळे ह्रदयातील चेंबर्सचे आकुंचन सुरु राहते. या चेंबर्सद्वारे शरीरातील सर्व अवयवांना रक्तपुरवठा केला जातो.

कोरोनरी आर्टरी डिसीज हे सडन कार्डिअ‍ॅक अरेस्टचं मुख्य कारण आहे. जर मुख्य कोरोनरी आर्टच्या प्रॉक्सिमल सेगमेंटमध्ये ब्लॉक तयार झाले तर ह्रदयविकाराचा धोका वाढतो. हार्ट अ‍टॅकमागेही कोरोनरी आर्टरी डिसीज हेच कारण असते. या दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्या तरी त्यांचा एकमेकाशी संबंध आहे. हार्ट अ‍टॅक आलेल्या रुग्णाला दुर्दैवाने हॉस्पिटलमध्ये जाताना कार्डिअ‍ॅक अरेस्ट होऊ शकतो. ऑर्टिक स्टेनोसिससारख्या वाल्वुलर हार्ट डिसीजमुळे अचानक कार्डिअ‍ॅक अरेस्ट येऊ शकतो.

कार्डिअ‍ॅक अरेस्ट आल्यावर त्या व्यक्तीला बेसिक लाईफ सपोर्ट अर्थात बीएलएसची गरज असते. याबाबत द अमेरिकन हार्ट असोसिएशनने सडन कार्डिअ‍ॅक अरेस्ट आल्यावर रुग्णाचे आपत्कालीन व्यवस्थापन कसे करायचे याचे मार्गदर्शन केले आहे. वैद्यकीय पार्श्वभूमी नसलेला व्यक्तीही कार्डिअ‍ॅक अरेस्ट आलेल्या व्यक्तीला बेसिक लाईफ सपोर्ट देऊ शकतो. याचे प्रशिक्षण तसे सोपे असते. याच तंत्राचा वापर करुन प्रशिक्षित व्यक्ती सडन कार्डिअ‍ॅक अरेस्ट आलेल्या रुग्णाला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत जिवंत ठेवू शकते.

तर एखादी व्यक्ती सडन कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे खाली कोसळली तर त्या व्यक्तीला आणि बीएसएल देणाऱ्या व्यक्तीला सर्वप्रथम सुरक्षित वातावरणात हवे. यानंतर रुग्णाचा श्वासोच्छवास आणि पल्सेशन तपासा. छातीच्या हालचालींकडे लक्ष द्या. यानंतर मानेतील पल्सेशन तपासा. यासाठी १० सेकंदापेक्षा जास्त वेळ घेऊ नका, जर पल्सेशन नसले तर छातीवर योग्य दाब देण्यास सुरूवात करा.

छातीचे दाब आणि श्वासोच्छवासाचे प्रमाण ३० : २ असावे, म्हणजे प्रत्येक ३० छातीच्या दाबांमागे दोन श्वास असावेत. सामान्य लोकांसाठी फक्त हाताने सीपीआर प्रोटोकॉलची देखील शिफारस केली जाते. सडन कार्डिअ‍ॅक अरेस्ट ही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती असून यातील रुग्णावर वेळीच उपचार झाले पाहिजेत. अन्यथा परिस्थिती गंभीर होऊ शकते. यावेळी रुग्णाला जीवदान देण्यासाठी बीएसएस ही पद्धत फायदेशीर ठरते. त्यामुळे प्रत्येकाने बीएसएसचे प्रशिक्षण घेतले पाहिजे.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 12:07 IST