वयानुसार, दुखण्याच्या तीव्रतेनुसार, गरजेनुसार, रुग्णाच्या व्यावसायिक, सामाजिक मागण्यांनुसार, जीवनशैलीनुसार व्यायाम ‘प्रिसक्राईब’ (हो औषधांसारखे व्यायाम ही प्रिसक्राईब केलेलेच करायला हवेत) केले जातात! आपण मागच्या लेखात हे बघितलं की पाठीच्या स्नायूंचं (शरीरातील सगळ्याच स्नायूंच) आरोग्य हे परिवर्तनीय आहे. या स्नायूंची योग्य ती निगा राखली तर हे स्नायू दीर्घकाळ त्यांचं काम चांगल्या प्रकारे करू शकतात. पाठीचे स्नायू हे मूलभूतरीत्या मणक्यांमधील गाडीवर आणि मणक्यांवर येणारा भार वाटून घेण्याचं काम करतात, ज्यामुळे गादी आणि मणका यांचं आरोग्य दीर्घकाळ चांगलं राहतं. बहुतेकवेळा या स्नायूंची निगा राखली जात नाही, जसजसं वय वाढतं तसं त्यांची शक्ती कमी होत जाते आणि मणक्यांवर येणारा भार वाटून घेण्यात हे स्नायू असमर्थ ठरतात परिणामी मणक्यांमधल्या गादी वर संपूर्ण भार येतो आणि तिचं आरोग्य बिघडतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीर्घकाळपर्यंत कोणतीच शारीरिक हालचाल किंवा व्यायाम न करणं, बैठी जीवनशैली, चुकीच्या बसण्याच्या पद्धती, स्थूलत्व, संप्रेरकांमधले बदल, चुकीचा आहार यापैकी एक किंवा अनेक कारणामुळे पाठीच्या स्नायूंमध्ये काही बदल होतात. याला इंग्रजीत ‘अडोपटिव रीडक्टिव रीमोडेलिंग’ अस म्हणतात. शब्द जरी अवघड वाटला तरी त्याचा अर्थ सोपा आहे. ‘अडोपटिव रीडक्टिव रीमोडेलिंग’ म्हणजे स्नायूंचा आकार लहान होत जातो आणि त्यांच्या रचनात्मक पदार्थांमध्ये बदल होऊ लागतात ज्यामुळे त्या स्नायूची शक्ती कमी होत जाते, तो पटकन दुखवला जाऊ शकतो, त्याला झालेली लहानशी इजादेखील पटकन भरून येत नाही. असे स्नायू साहजिकच निष्क्रिय होत जातात.

हेही वाचा : फिट व्हायचंय, पण व्यायामाचा कंटाळा; बेडवरच करा हे सोपे व्यायाम

हे होऊ नये म्हणून काय करायचं?

एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर ‘शास्त्रशुद्ध’ व्यायामाला आपल्या आयुष्याचा भाग बनवायचं, इथे शास्त्रशुद्ध शब्द यासाठी वापरते आहे कारण बहुतांश वेळा व्यायामाबद्दल विचारलं की रुग्ण सर्रास उत्तर देतात हो आम्ही रोज 5 किलोमीटर चालतो, आम्ही रोज योगासनं करतो, तरी कंबर दुखते! पाठीच्या स्नायूंसाठी किंवा एकंदरीतच शरीरासाठी कुठलाही एका प्रकारचा व्यायाम सरसकट करता येत नाही. शिवाय तो करण्याची पद्धत, तीव्रता , नियमितपणा या गोष्टी त्यासोबत येतातच.

हेही वाचा : चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी तरुणाईने करावा आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

नियमितपणे फिजिओथेरपिस्ट आणि ऑर्थोपेडिक डॉक्टरांना भेट देऊन त्यांच्याकडून आपल्या वयानुसार, क्षमतेनुसार आणि गरजेनुसार व्यायाम डिजाइन करवून घेतले आणि ते रोज केले तर आयुष्याची गुणवत्ता कमालीची सुधारते. आम्ही ठरवून दिलेल्या व्यायामप्रकारामध्ये कोणत्याही एका गोष्टीचा अतिरेक नसतो, शिवाय सरसकट सगळ्यांना एकाच पद्धतीचे व्यायामही देता येत नाहीत.

हेही वाचा : Health Special : आरोग्यदायी भोपळ्याची किमया तुम्हाला ठाऊक आहे का?

मुख्यत्वे चार स्तंभांवर व्यायाम ठरवले जातात. एरोबिक व्यायाम ज्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होईल, वजन कमी करण्यात किंवा आटोक्यात ठेवण्यात मदत होईल, त्यामुळे पाठीच्या कण्यावर येणारा भार कमी होईल. लवचिकता वाढवणारे व्यायाम, वेगवेगळ्या पाठीच्या स्नायूंचे स्ट्रेचिंग शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवले जातात. स्ट्रेन्थ ट्रेनिंग म्हणजे प्रत्येक स्नायूंसाठी विशिष्ट असे शक्ती वाढवणारे व्यायाम आणि चपळता वाढवणारे अजिलिटी व्यायाम. यात सांगितलेले सगळे प्रकार हे अक्षरशः व्यक्तीगणिक बदलतात ‘देअर इज नो वन साइज फिट्स टु ऑल’! वयानुसार,दुखण्याच्या तीव्रतेनुसार, गरजेनुसार, रुग्णाच्या व्यावसायिक, सामाजिक मागण्यांनुसार, जीवनशैलिनुसार व्यायाम ‘प्रिसक्राईब’ (हो औषधांसारखे व्यायाम ही प्रिसक्राईब केलेलेच करायला हवेत) केले जातात. शिवाय ज्या रुग्णांना तीव्र वेदना आहेत, स्पोंडीलोसिस, स्पोंडीलायटीस, रेडीकयूलो पथि, स्टेनोसिस सारखे विकार आहेत त्यांचे व्यायाम ठरवताना वेगळे निकष लावावे लागतात. गरोदर महिला, मणक्यांचे ऑपरेशन झालेल्या व्यक्ती, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक यांचे व्यायाम ही वेगळ्या निकषांवर ठरवले जातात. थोडक्यात पाठीच्या स्नायूंचं आरोग्य राखाल, तर मणक्याचं आरोग्य आपोआप राखलं जाईल. त्यासाठी फिजिओथेरपिस्ट आणि ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडून आपल्याला योग्य ते व्यायाम शिकून घेणं आणि व्यायामाला आपल्या आयुष्याचा भाग करणं आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exercises for back muscles there is no one size fits to all hldc css
First published on: 26-12-2023 at 15:31 IST