Dipika Kakar Breastfeeding Story : दीपिका कक्कर सध्या तिच्या लिव्हर कॅन्सरच्या शस्त्रक्रियेमुळे चर्चेत आहे. शस्त्रक्रियेनंतर ती घरी परतली आहे. सोशल मीडियावर ती तिच्या आरोग्याविषयी अपडेट्स देताना दिसते. अलीकडेच दीपिकाने तिच्या एका यूट्यूब ब्लॉगमध्ये आयुष्यातील सर्वात कठीण क्षणाविषयी सांगितले. तिला कर्करोगाचे निदान झाल्यानंतर मुलगा रुहानचे स्तनपान थांबवावे लागले. याविषयी ती सांगते, “ही एक मोठी शस्त्रक्रिया होती. मला पहिली गोष्ट करायची होती, जी सर्वात कठीण गोष्टींपैकी एक होती, ती म्हणजे एका रात्रीत रुहानचे स्तनपान करणे थांबवणे. माझ्याकडे पर्याय नव्हता. मला ते करावे लागले. मी रात्रभर खूप रडले. तो लवकरच दोन वर्षांचा होणार असल्याने मला रुहानचे स्तनपान सोडावे लागणार होते, पण मला माहीत नव्हते की ते असे असेल.”
पण, तिला या कठीण परिस्थितीची एक सकारात्मक बाजूसुद्धा दिसली. दीपिका सांगते, “प्रत्येक गोष्टीमागे नेहमीच एक चांगले कारण असते. जेव्हा आम्हाला कळले की मला दुसऱ्या स्टेजचा कर्करोग आहे, तेव्हाही मी त्याला स्तनपान करत होते, पण स्तनपान सोडणे चांगले होते, कारण मला जे खायचे होते ते त्याला खाऊ घालायचे नव्हते जसे की औषधी इत्यादी. “
कर्करोगाचे निदान झालेल्या आईचे स्तनपान करणे सोडण्यामागे कारणे असू शकतात. दी इंडियन एक्स्प्रेसने याविषयी तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेतली. पुणे येथील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चाइल्डच्या ऑब्स्टेट्रिशियन सल्लागार, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि इनफर्टिलिटीतज्ज्ञ डॉ. अश्विनी राठोड सांगतात की, केमोथेरपी किंवा रेडिएशनसारख्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये अनेकदा अशा औषधी वापरल्या जातात, ज्या स्तनपान करणाऱ्या बाळासाठी हानिकारक ठरू शकतात. “या हानिकारक औषधी आईच्या दुधात दिसू शकतात, ज्यामुळे बाळाला विषारी पदार्थांचा धोका निर्माण होऊ शकतो तसेच बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर खोलवर परिणाम होऊ शकतो,” असे डॉ. राठोड पुढे सांगतात.
याशिवाय कर्करोगामुळे आईचे आरोग्यसुद्धा बिघडू शकते. यामध्ये थकवा, मळमळ आणि इतर लक्षणे उद्भवू शकतात, ज्यामुळे दूध तयार करण्याची किंवा बाळाची योग्य काळजी घेण्याची तिची क्षमतासुद्धा कमी होऊ शकते. डॉ. राठोड सांगतात, “अशा परिस्थितीत, आईने तिचे आणि तिच्या बाळाचे आरोग्य जपण्यासाठी तिच्या आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे.”
कर्करोगाचे निदान झाल्यानंतर अशा तणावपूर्ण परिस्थितीत बाळाचे स्तनपान सोडण्याच्या निर्णयाने आईवर भावनिक परिणाम दिसू शकतो, जो खूप गंभीर असू शकतो. “स्तनपान हे एक आई बाळामध्ये बंधन निर्माण करणारा अनुभव असतो, पण जेव्हा अशा परिस्थितीत स्तनपान सोडावे लागते तेव्हा आईला अपराधीपणा, दुःख आणि काहीतरी गमावल्याची भावना येऊ शकते,” असे डॉ. राठोड सांगतात.
अशावेळी काय करावे?
डॉ. राठोड सांगतात की, आईने कर्करोगाचे उपचार घेताना येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आरोग्यासंबंधित तज्ज्ञ आणि समुपदेशकांकडून मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि बाळाला फॉर्म्युला किंवा डोनर दुधाद्वारे पुरेसे पोषण मिळताहेत का, याची खात्री करणे आवश्यक आहे. “प्रत्येक परिस्थिती ही वेगळी असते. अशावेळी आई आणि बाळाच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे,” असे डॉ. राठोड सांगतात.