Sweet Potatoes Health Benefits : रताळी विशेषत: उपवासाला खाल्ली जातात. पण, बरेच जण दैनंदिन आहारात त्यांचा समावेश करण्यास प्राधान्य देतात. रताळी सामान्यतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जास्त उपलब्ध असतात; तर काही प्रदेशांत उन्हाळ्यातही त्यांची लागवड केली जाते. म्हणूनच दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली आणि कमी ओळखले जाणारे हे सुपरफूड जर वर्षभर खाल्लं, तर आरोग्यावर कसा परिणाम होईल? विशेषतः महिलांसाठी… याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

वर्षभर रताळ्यांचे नियमितपणे सेवन केल्याने हॉर्मोनपासून ते चमकदार त्वचेपर्यंत सगळ्याच गोष्टीसाठी मदत होऊ शकते. त्यामध्ये फायबर, कॉम्प्लेक्स कार्ब्स, बीटा-कॅरोटीन (व्हिटॅमिन एचे एक रूप) आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात; जे योग्य रीत्या खाल्ल्यास पचन सुधारण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास, रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात, असे ठाणे येथील किम्स हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉक्टर गुलनाज शेख यांनी सांगितले आहे.

तर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार- रताळी खाल्ल्यावर महिलांना अनेकदा चांगली ऊर्जा मिळते, साखर खाण्याची इच्छा कमी होते आणि मूड अधिक संतुलित राहतो. कारण- त्यात स्टेडी रिलीज कार्बोहायड्रेट्स (ज्या कार्बोहायड्रेट्समुळे ऊर्जा हळूहळू आणि दीर्घकाळ मिळते) आणि व्हिटॅमिन बी 6 असतात; जे सेरोटोनिन तयार करण्यास मदत करतात.

याचा प्रजनन आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम व बी व्हिटॅमिनसारखे पोषक घटक चक्रांचे नियमन करण्यास, मासिक पाळी येण्याच्या दोन आठवडे आधी मानसिक (पीएमएस) अस्वस्थता कमी करण्यास आणि एकूण हार्मोनल संतुलनास समर्थन देण्यास मदत करतात. रताळ्यांमधील दाहकविरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे त्वचा उजळ दिसू शकते आणि केस कालांतराने आणखी आरोग्यदायी वाटू शकतात.

रताळी खाताना कोणी काळजी घ्यावी?

रताळी सामान्यतः सुरक्षित आणि फायदेशीर असतात. पण, तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार रताळ्यांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार असलेल्या व्यक्तींनी खाताना सावधगिरी बाळगली पाहिजे.

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी रताळी किती खावीत याकडेही लक्ष दिले पाहिजे; विशेषतः जर ते बटरने स्मॅश, तळून किंवा गोड करून खाल्ली जात असतील तर. रताळ्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स नियमित बटाट्यांच्या तुलनेत कमी असतो; परंतु त्याचे सेवनाचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे.

आहारात समावेश करताना काय लक्षात ठेवले पाहिजे?

तुम्ही रताळ्यांचे सेवन कशा प्रकारे करता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे तज्ज्ञांनी सल्ला दिला की, पनीर, अंडी किंवा काही बियांसारख्या प्रोटीन किंवा आरोग्यदायी चरबीसह रताळी खाल्ल्यास जेवण संतुलित होते आणि रक्तातील साखरेसाठीही ते चांगले असते.

याव्यतिरिक्त तुमच्या जेवणात वेगवेगळ्या रंगांची रताळी जोडण्याचा प्रयत्न करा. नारिंगी, जांभळी आणि पांढरी. कारण- त्यामध्ये थोडे वेगळे पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे फक्त एकावरच लक्ष न देता, विविध आणि आरोग्यदायी आहाराचा भाग म्हणून त्यांचा आनंद घ्या, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.