What Happens If You Eat Fenugreek Seeds Daily: मेथी नाव जरी साधं असलं तरी तिचे आरोग्यदायी फायदे अफाट आहेत. मेथी आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु, केवळ मेथीच नाही, तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. स्वयंपाकघरातील हा छोटासा घटक शरीरासाठी मोठे वरदान ठरू शकतो. पण, तुम्ही कधी विचार केलाय का की, फक्त १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ले, तर शरीरात किती बदल होऊ शकतात? याबद्दल जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ पी. एस. सुषमा यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

मेथीतील पोषक खजिना

मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर, प्रथिने, लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन डी व व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील अनेक प्रक्रिया सुधारतात आणि एकंदर आरोग्य चांगले ठेवतात.

रक्तातील साखर नियंत्रण

जर तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ले, तर तुमचे आरोग्य अनेक प्रकारे सुधारू शकते. मेथीचे दाणे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी फायद्याचे ठरतात. मेथीमध्ये विरघळणारे फायबर असते जे कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे शोषण कमी करते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोध असलेल्या लोकांसाठी हे विशेषतः उपयुक्त आहे.

कोलेस्ट्रॉल आणि हृदय आरोग्य

मेथी आतड्यांमधील कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करून, त्याची पातळी घटवते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारते.

पचन सुधारणा आणि वजन नियंत्रण

उच्च फायबरमुळे मेथीचे दाणे पचन सुधारतात, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवून देतात व पोटातील जळजळ कमी करतात. नियमित सेवनाने भूक नियंत्रित राहते. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

मेथीचे सेवन कसे करावे?

  • एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी खा किंवा पाणी प्या.

काही सावधगिरी

तथापि, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, मेथीच्या दाण्यांवरील प्रतिक्रिया व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकतात. मेथीचे दाणे जास्त प्रमाणात खाल्ल्यास ॲलर्जीक प्रतिक्रियांसारखे नकारात्मक दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे काहींना अतिसार, मळमळ, चक्कर येणे किंवा डोकेदुखी होऊ शकते. ॲलर्जी असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

थोडक्यात, १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ल्यास रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल, पचन, वजन नियंत्रण अशा अनेक बाबतीत सुधारणा होऊ शकते. पण, प्रमाण महत्त्वाचे जास्त झाल्यास फायदे उलटे होऊ शकतात.