कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला घाम येणे ही अत्यंत सामान्य बाब आहे. घामामुळे आपल्या शरीरातील तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे शरीरातील काही विषारी घटकही यामाध्यमातून शरीराबाहेर टाकले जातात. प्रत्येकामध्ये घाम येण्याचे प्रमाण कमी जास्त असू शकते. मात्र, जर एखाद्या व्यक्तीला अजिबात घाम येत नसेल किंवा कमी प्रमाणात घाम येत असेल तर?

तज्ज्ञांनुसार, एखाद्या व्यक्तीला कमी घाम येत असेल किंवा घामच येत नसेल, तर हे धोकादायक असू शकते. या स्थितीला ‘एनहायड्रोसिस’देखील म्हणतात. सामान्यत: जेव्हा एखाद्या व्यक्तीला अजिबात घाम येत नाही तेव्हा एनहायड्रोसिसची स्थिती उद्भवते. ज्या लोकांना व्यायाम आणि मेहनत करूनही घाम येत नाही त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो.

Health News : मासिक पाळीच्या काळातील तीव्र पोटदुखी आणि जास्त रक्तस्त्राव असू शकते ‘या’ गंभीर आजाराचे लक्षण

या आजाराची कारणे काय?

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, ज्या लोकांना घाम येत नाही, त्यांच्या शरीराचे तापमान संतुलित नसते. त्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. या समस्येमुळे मेंदूसह शरीराच्या अनेक भागांना इजा होऊ शकते. अनेक कारणांमुळे हा आजार होऊ शकतो. त्यातील काही संभाव्य कारणे पुढीलप्रमाणे.

  • अनेक औषधांमुळे घामाच्या ग्रंथी बंद होतात. त्यामुळे घाम बाहेर पडू शकत नाही.
  • अनेकांना जन्मजात घामाच्या ग्रंथी नसतात.
  • जर मज्जातंतूंना दुखापत झाली असेल तर अशा स्थितीत एनहायड्रोसिस होतो आणि घाम येत नाही.
  • त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्येमुळे घाम न येण्याची समस्या उद्भवू शकते.
  • शरीरात पाण्याची कमतरता हे देखील घाम न येण्याचे कारण असू शकते.

गर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख

घाम न येणे धोकादायक का आहे?

  • घामाच्या कमतरतेमुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो.
  • उष्माघाताचा धोका वाढू शकतो.
  • हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
  • अनेक महत्वाचे अवयव काम करणे थांबवू शकतात.
  • बेशुद्धी किंवा चक्कर येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

कोणत्याही व्यक्तीसाठी घाम येणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला घाम येत नसेल तर तुम्हाला ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)