scorecardresearch

‘या’ आहेत टाय बांधण्याच्या हटके पद्धती…

तुम्हीही शिका स्टायलिश टाय बांधायला

tie-bow
प्रतिनिधिक छायाचित्र

ऑफिसची मीटिंग असली की टापटीप फॉर्मल्स, टाय घालून तयार राहा! हे असं नेहमीच होत असतं. पण, आता फक्त मीटिंगसाठीच नव्हे तर लुक एकदम ट्रेण्डी वाटावा यासाठीही ही टाय संस्कृती अजमावायलाच हवी!

युद्ध एखाद्या भूमीवर, दोन किंवा अधिक राष्ट्रांच्या सन्यामध्ये अलिप्तपणे कधीच होत नसतं. त्याचे कायमस्वरूपी किंवा तात्पुरते परिणाम जगभरात दिसून येतात. या संक्रमणातून पेहरावाचीही सुटका होत नसते. अशाच एका युद्धासाठी रोमन साम्राज्याच्या काळात सनिकांचे गट ओळखू येण्यासाठी त्यांच्या गळ्याभोवती वेगवेगळ्या रंगाचे कापड गुंडाळले जात. याच कापडाचं आधुनिक रूप म्हणजे पुरुषांच्या गळ्यातला ताईत बनलेला ‘टाय’. सनिकांची ओळख पटण्यासाठी बांधण्यात येणारं हे कापड पुढच्या काळामध्ये समाजात प्रतिष्ठेचं चिन्ह बनलं आहे.

क्रवॅट ते टाय
रोमन साम्राज्याच्या काळात टायची संकल्पना आली असली, तरी तिच्या जन्माची सुरुवात झाली ‘क्रवॅट’पासून. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपात झालेल्या तीस वर्षीय युद्धात क्रोएशन सनिकांच्या गळ्याभोवती पारंपरिक पद्धतीने छोटा स्कार्फ बांधण्याच्या पद्धतीची दखल पíशयांनीही घेतली. त्यावरून याला ‘क्रवॅट’ हे नाव पडलं. साधारणपणे पाच ते सहा इंचाचा लहान स्कार्फ पट्टय़ाच्या सहाय्याने गळ्याभोवती बांधला जायचा. हा पट्टा शर्टाच्या कॉलरमध्ये लपला जायचा. त्यामुळे समोर फक्त स्कार्फ दिसायचा. राजा चौदावा लुईच्या क्रवॅट घालण्याच्या पद्धतीमुळे त्या काळात फ्रेंच दरबारात क्रवॅट हा पेहरावाचा प्रमुख भाग बनला. फ्रेंच दरबारी, प्रतिष्ठित व्यक्ती आवर्जून हा क्रवॅट बांधत असत. त्यामुळे सहाजिकच क्रवॅट बांधलेली व्यक्ती म्हणजे प्रतिष्ठित, उच्चवर्गीय व्यक्ती अशी ओळख निर्माण झाली. सतराव्या आणि अठराव्या शतकातील फ्रेंच राजघराणी पेहरावाबद्दल चोखंदळ होती. त्यामुळे सहाजिक ही क्रवॅट पुरुषी पेहरावाचा भाग असली, तरी रफल्स, लेस अशा वेगवेगळ्या स्वरूपात वापरली जायची. पुढे अठराव्या शतकात युद्धात गळ्याभोवती वार झाल्यास बचावासाठी चामडी पट्टा बांधला जाई. त्यातून गळ्याभोवती रुमाल बांधण्याच्या ‘स्टॉक टाय’चा उगम झाला. त्यातून पुढे बंधाना आणि औद्योगिक क्रांतीच्या वेळेस टायचा जन्म झाला.

टायचं नवं रूप
आधुनिक टायचा जन्म १९२६ मध्ये न्यूयॉर्कला झाला. जेस लँग्सडोर्फने कापडाला त्रिकोणी आकारात कापून तीन भागांमध्ये शिवण्याची पद्धत शोधली. त्यामुळे टायला सध्याचा आकार मिळाला. पुढे त्यात आधारासाठी लायिनगच्या वापरास सुरुवात झाली. पुढील काळामध्ये टायच्या रंगरूपात बदल घडत गेले, पण त्याचं स्वरूप कायम राहिलं. आज टाय वेगवेगळ्या कापड, िपट्र्स, रंगांमध्ये उपलब्ध आहे. टायसाठी सिल्क कापडाचा प्रामुख्याने वापर होत असला, तरी हल्ली लोकर, वुलन कापडाचे टायसुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. उत्तम टाय बांधणं हीदेखील एक कला आहे. अर्थात आज ‘थ्री इडियट’ सिनेमातील डॉ. विरू सहस्रबुद्धे अर्थात व्हायरसप्रमाणे हुकने शर्टाला अडकवणारे रेडीमेड टायसुद्धा बाजारात मिळतात, पण त्यामुळे पारंपरिक टायची लोकप्रियता कमी झालेली नाही.

टायचा आकार
बाजारात वेगवेगळ्या आकाराचे टाय उपलब्ध आहेत. त्याचे प्रकार आपण पुढे पाहूच. पण साधारणपणे ३.२५ इंच रुंदीचा टाय सर्व पुरुषांना साजेसा दिसतो. याशिवाय तुमची शरीरयष्टी ब्रॉड असेल तर रुंद टाय वापरू शकता. बारीक शरीरयष्टी असल्यास टायचा आकारही बारीक असू द्यात. टायची लांबी तुमच्या बेल्टपर्यंत हवी. अति लांब टायमुळे शरीराला बाक जाणवतो. मध्यंतरी आखूड टायचे काही प्रकार बाजारात आले होते, पण त्याच्या अवघडलेल्या रूपाने ते फारसे लोकप्रिय झाले नाहीत.

टायचे प्रकार
१. फोर इन हँड नेकटाय
टायचा हा सगळ्यात प्रसिद्ध आणि लोकमान्य प्रकार. त्रिकोणी आकारातील हा टाय वेगवेगळ्या पद्धतीने घालता येतो. याच्या पद्धतींवरून याचे पुढे प्रकार पडतात. पण त्यातील सर्वात सोपा प्रकार म्हणजे फोर इन हँड टाय.
टाय घालायची पद्धत
– टायचं बारीक टोक उजवीकडे आणि रुंद टोक डावीकडे घ्या. रुंद टोक बारीक टोकापेक्षा थोडं लांब ठेवा. रुंद टोकाने बारीक टोकाला एक पीळ द्या.
– दुसरा पीळ घेताना तयार झालेल्या गाठीमध्ये मागच्या बाजूने रुंद टोक टाका.
– गाठ घट्ट किंवा सल करण्यासाठी रुंद टोक ओढा.

२. विडसोर टाय
टायचा आकार जाड हवा असल्यास ही पद्धत वापरता येते.
– फोर इन हँडप्रमाणे पहिला पीळ घेताना मागच्या बाजूने रुंद टोक उजव्या बाजूला पुढे घ्या.
– रुंद टोक बारीक टोकाच्या मागच्या बाजूने नेत डाव्या बाजूने आत टाका.
– नंतर फोर इन हँडप्रमाणे गाठ बनवा.
याशिवाय मीटिंग किंवा पार्टीसाठी टायमध्ये प्रयोग करायचे असल्यास तो वेगवेगळ्या पद्धतीने बांधता येतो. टायच्या गाठीचे पदर वाढवून त्यात वेगळेपणा आणता येतो.

३. सेव्हेन फोल्ड टाय
हा टायचा प्रकार फोर इन हँडच्या जातकुळीतलाच आहे. पण टायला जाडेपणा देण्यासाठी सात घडय़ांमध्ये शिवतात. हे टाय सिल्क कापडात असतात आणि शिलाई पद्धतीमुळे नेहमीच्या टायपेक्षा यांच्या किमती अधिक असतात. त्यामुळे खास प्रसंगी हे टाय वापरता येतात. हे टाय तुम्ही नेहमीच्या पद्धतीने घालू शकता.

४. स्किनी टाय
रणबीर कपूरमुळे प्रसिद्ध झालेला बारीक टायचा हा प्रकार मागच्या वर्षी बराच गाजला. नेहमीच्या टायपेक्षा याचा आकार निमुळता असतो. त्यामुळे तरुणांमध्ये हा अधिक प्रसिद्ध आहे. सेमी फॉर्मल शर्टसोबत हा टाय सहज घालता येतो. त्यावर कोट किंवा ब्लेझर घ्यायची फारशी गरज नसते.

५. बो टाय
नेहमीच्या टायला पर्याय हवा असेल, तर बो टाय नक्कीच वापरू शकता. गळ्याला जसा बो असेल त्या आकारात बांधला जाणारा हा टाय पूर्वी विशिष्ट पार्टीसाठी वापरला जायचा. कित्येक फॉर्मल पार्टीजमध्ये बो-टाय हा ड्रेसकोड आमंत्रणपत्रिकेत नमूद केला जातो. पण हल्ली हा टाय ऑफिसमध्ये सर्रास वापरला जातो. वेगवेगळ्या िपट्र्स, रंगांमध्ये हे टाय उपलब्ध आहेत.

६. वेस्टर्न बो टाय
नावाप्रमाणेच या टायला गळ्याभोवती बो असतो आणि खाली टायची निमुळती दोन टोकं सोडलेली असतात. सेमी फॉर्मल कार्यक्रम किंवा पार्टीसाठी हा टाय वापरू शकता. थोडा फेमिनीन बाजूकडे झुकणारा हा टाय पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या पेहरावात आवर्जून पहायला मिळतो.

७. बोलो टाय
गळ्याला छोटंसं पेडंट आणि त्यापुढे मोकळा सोडलेल्या टायची निमुळती दोन टोकं हा बोलो टायचा आधुनिक प्रकार. ऑफिस किंवा मीटिंगवरून थेट एखाद्या समारंभाला जात असाल, तर फॉर्मल सूटवर हा टाय नक्कीच वापरून पहा. हा टाय दिसायला वेगळा असल्याने पटकन लक्ष वेधून घेतो.

८. क्रवॅट टाय
सतराव्या शतकातील क्रवॅटचं आधुनिक स्वरूप आजही पहायला मिळतं. थंडीच्या दिवसांमध्ये ऑफिस किंवा पार्टीसाठी तुम्ही हा टाय वापरू शकता. याचा लुक उबदार दिसतो. विशेषत: सनिकी पोशाख किंवा राजपुती पेहरावामध्ये हा टाय आवर्जून वापरला जातो. त्यामुळे रॉयल लुकसाठी हा टाय वापरू शकता.

९. नेकचीफ
थोडक्यात सांगायचं तर गळ्याभोवती बांधायचा छोटा रुमाल किंवा स्कार्फ हे या टायचं स्वरूप. आपल्याकडे सिनेमामुळे हा टाय गुंड किंवा मवाली वृत्तीचे लोक वापरतात असा समज झाला आहे. पण डेनिम शर्टवर छान िपट्रचा स्कार्फ उठून दिसतो. व्यवस्थित बांधल्यास हा टाय सेमी-फॉर्मल लुकसाठी आवर्जून वापरता येईल.
अर्थात टाय दिसायला आकर्षक असला, तरी टीकेपासून याची सुटका झालेली नाही. युरोपियन राष्ट्रांच्या वसाहतवादी धोरणाचे प्रतीक म्हणून ओळख मिळाल्याने इराणसारख्या अनेक देशांमध्ये टाय वापरले जात नाहीत. टायची संस्कृती युद्धाच्या सनिकांपासून आलेली आहे. पूर्वीच्या काळी सनिकांना बळाने, जबरदस्तीने युद्धात जुंपले जायचे. त्यामुळे टायला बंधनाचं स्वरूप मानलं जाऊन टाय घालणारा ‘कॉर्परेट स्लेव्ह’ ही संकल्पना रूढ झाली आहे. त्यामुळे नवे स्टार्टअप, गुगल, फेसबुकसारख्या कंपन्यांमध्ये टाय संस्कृती पाहायला मिळत नाही. फ्रायडे ड्रेसिंग, सेमी फॉर्मल ड्रेसिंगची संकल्पनाही यातूनच आलेली. असं असलं तरी रुबाबदार सूट आणि त्यावर बांधलेला नेटका टाय यातील ऐट तसूभरही कमी झालेली नाही. त्यामुळे पेहरावाचा भाग म्हणून टाय वापरून पाहायलाच हवा.

मृणाल भगत

response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2017 at 11:00 IST
ताज्या बातम्या