Yoga Poses For International Yoga Day : तुम्हाला आठवतायंत का तुमच्या शाळेचे दिवस जेथे शारीरिक शिक्षणाच्या तासाला आपल्याला लेझीम प्रकार, सूर्यनमस्कार आणि काही सोपी योगासने शिकवली जायची. तेव्हा अनेक जणांना कंटाळा यायचा तर काही जण मजा-मस्ती म्हणून ही सगळी योगासने करायची. पण, योगासनांचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यास त्याचा शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास फायदा तर अगदी तणाव कमी करण्यापासून ते रक्ताभिसरण सुधारण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी लाभ होतो असे म्हणतात. तर दरवर्षी २१ जून ‘योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. तर त्याचनिमित्त आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ ची थीम, इतिहास, योग दिन कसा साजरा करावा याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
योगा ही एक प्राचीन पद्धत आहे जी भारतात ५,००० वर्षांपूर्वी उगम पावली. शरीर, मन आणि आत्म्याच्या कल्याणासाठी योगा ही पद्धत विकसित करण्यात आली आहे. योग आसन, प्राणायाम आणि ध्यान यांच्या संयोजनाद्वारे शारीरिक शक्ती, मानसिक स्पष्टता आणि भावनिक संतुलनास प्रोत्साहन देण्यात मदत होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास (International Yoga Day History)
योगाचा आदर करून त्याचे फायदे जगभरात पोहोचवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावावरून संयुक्त राष्ट्रांनी २०१४ मध्ये २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून, हा दिवस जगभरात साजरा केला जात आहे ; ज्यामध्ये लाखो लोक योगाभ्यास करण्यासाठी आणि निरोगी, अधिक जागरूक जीवनशैली स्वीकारण्यासाठी एकत्र येतात.
२०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन कधी आहे? (When Is International Yoga Day )
२०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवार, २१ जून रोजी साजरा केला जाईल. उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस, उन्हाळी संक्रांती म्हणून ही तारीखनिवडण्यात आली होती. भारतात, हा दिवस पहिला योगी किंवा आदियोगी मानल्या जाणाऱ्या भगवान शिव यांनी जगासोबत योगाचे ज्ञान सामायिक करण्यास सुरुवात केली असे मानले जाते.
आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम काय आहे? (International Yoga Day Theme)
आयुष मंत्रालयाने २०२५ चा आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम जारी केली आहे. २१ जून हा दिवस “एक पृथ्वी, एक आरोग्य” या थीमसह साजरा केला जाईल. लोकांना योगाचा वापर करून अधिक जाणीवपूर्वक करून जगण्यास प्रोत्साहित करावे, हानी टाळावी, त्यांच्या निवडींबद्दल जागरूक राहावे आणि निसर्गाचा आदर करावा ; असे या थीमचे महत्व असणार आहे. या वर्षीची थीम असे दर्शवते की, आपले आरोग्य ग्रहाच्या आरोग्याशी जोडलेले आहे. त्यामुळे जर ग्रह नसेल तर आपण निरोगी राहू शकत नाही. आपण श्वासाद्वारे आत घेतो ती हवा, आपण खातो ते अन्न आणि आपण पितो ते पाणी या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे योग आपल्याला जागरूक होण्यास, जबाबदारी घेण्यास, आपल्या जीवनात आणि आपल्या सभोवतालच्या जगात संतुलन शोधण्यास मदत करतात.
आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ कसा साजरा करायचा? (How To Celebrate International Yoga Day)
- तुम्ही २१ जून रोजी एखाद्या स्थानिक ग्रुपचा भाग होऊन किंवा तुमच्या घरी आरामात ऑनलाइन क्लासमध्ये सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करू शकता.
- तुम्ही ऑफिस, शाळा किंवा तुमच्या परिसरातील उद्यानात योग सत्र आयोजित करू शकता.
- या वर्षीची थीम पर्यावरणपूरक सवयींना प्रोत्साहन देते, म्हणून पुन्हा वापरता येणारी पाण्याची बाटली घेऊन जा, प्लास्टिक टाळा. तसेच तुमच्या योग सत्रात चालत जा किंवा सायकलने जा.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोणती ५ सोपी आसने तुम्ही करू शकता? (Yoga Poses For International Yoga Day )
ताडासन (माउंटन पोज )
ताडासन तुम्हाला स्थिर आणि संतुलित वाटण्यास मदत करते. या आसनामुळे स्थिर राहणे, लक्ष केंद्रित करणे आणि पृथ्वीशी असलेले नाते प्रोत्साहित करते, जे या वर्षीच्या योग दिनाच्या थीमसाठी योग्य आहे.
भुजंगासन (कोब्रा पोज)
भुजंगासनला इंग्रजीत कोब्रा पोज असेही म्हणतात. भुजंगासन केल्याने पाठीचा कणा आणि छातीला स्ट्रेच मिळतो. भुजंगासन करताना पालथे झोपून कंबरेपासून छातीचा भाग व मान वर उचलावी. या आसनामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि जीवन, निसर्गाबद्दल मोकळेपणा जाणवतो.
पद्मासन (लोटस पोझ)
ध्यानासाठी बेस्ट, शांती, स्पष्टता आणि श्वासोच्छवासास प्रोत्साहन देणारे पद्मासन आहे.
वृक्षासन (ट्री पोज )
झाडाप्रमाणे एका पायावर संतुलन साधल्याने स्थिरता आणि लक्ष केंद्रित होते. वृक्षासनामुळे शरीर, मन यांच्यात सुसंवाद साधण्यास मदत होते.
शवासन (कॉर्प्स पोज )
शवासन याला विश्रांतीची आसन आहे. हे आसन विश्रांती आणि चिंतनाला प्रोत्साहन देणारे आहे.