सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-गुरूच्या लाभयोगामुळे मानसिक स्थिती सुधारेल. मनोबल वाढेल. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. नोकरी-व्यवसायात सारासार विचार करून निर्णय घ्याल. सहकारीवर्गाशी बोलताना शब्द जपून वापरावेत. अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता! जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. पचनसंस्थेच्या तक्रारी भेडसावतील. आहारावर नियंत्रण ठेवावे.

वृषभ कर्मस्थानातील बौद्धिक राशीमधील चंद्र-नेपच्यूनचा युतीयोग नव्या संकल्पनांसाठी स्फूर्तिदायक ठरेल. नोकरी-व्यवसायात नव्या दृष्टिकोनासह नवे विचार, उत्स्फूर्त लेखन, भाषण सर्वापुढे सादर कराल. सहकारीवर्ग आपल्या कामात उत्साहाने साथ देईल. जोडीदार त्याच्या कामातील अडीअडचणींवर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. कुटुंब सदस्यांच्या भावनिक समस्या समजून घ्याल. श्वसनमार्ग आणि उत्सर्जनमार्ग यांबाबत त्रास उद्भवेल.

मिथुन मंगळ-बुधाच्या षडाष्टक योगामुळे विचार आणि कृती यात विसंगती आढळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक! सहकारीवर्गाकडून कामाचा पाठपुरावा करून घ्याल. मित्रमंडळींना मदतीची आश्वासने देऊ नका. जोडीदाराचा व्यावहारिक दृष्टिकोन आपणास उपयुक्त ठरेल. कुटुंब सदस्यांची कामे मार्गी लागतील. वैचारिक दमणूक होईल. विश्रांतीची गरज भासेल. कोरडय़ा त्वचेचे त्रास सतावतील. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

कर्क शनी-चंद्राच्या लाभयोगामुळे चंद्राच्या चंचलतेला शनीच्या चिकाटीचा लगाम बसेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी सांभाळून कामाला न्याय देणे कठीण जाईल. सहकारीवर्गाच्या समयसूचकतेमुळे मोठे नुकसान टळेल. जोडीदाराची त्याच्या कार्यक्षेत्रात फारच ओढाताण होईल. कुटुंब सदस्यांकडून आनंदवार्ता समजतील. मान आणि मणक्याची विशेष काळजी घ्यावी. वेळेवर व्यायाम केल्याने लाभ होईल.

सिंह चंद्र-बुधाच्या नवपंचमयोगामुळे कामातील उमेद आणि उत्साह वाढेल. विचारांना चालना मिळेल. नोकरी-व्यवसायात नव्याने प्रयोगशीलतेला प्राधान्य देऊन हाती घेतलेल्या कामात यश संपादन कराल. अधिकाराचा योग्य उपयोग कराल. सहकारीवर्गाला लाभ करून द्याल. जोडीदाराच्या अडचणी समजून घ्याव्यात. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. रक्तवाहिन्या, रसवाहिन्या यासंबंधित त्रास वाटल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक!

कन्या रवी-चंद्राच्या नवपंचमयोगामुळे आचार आणि विचारात सुसूत्रता येईल. रखडलेल्या कामाला गती येईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक गणिते नव्याने मांडाल. सहकारीवर्गाला मदतीचा हात द्याल. जोडीदाराच्या गुणांची विशेष दखल घेतली जाईल. कुटुंबासाठी दोघे मिळून नव्या योजना आखाल. प्रगतीचा आलेख उंचावेल. मुलांचा उत्कर्ष होईल. गुडघे, इतर लहान सांधे यांची काळजी घ्यावी. आहार आणि व्यायामाकडे विशेष लक्ष द्यावे.

तूळ चंद्र-बुधाच्या केंद्रयोगामुळे भावना आणि विचार यांत संघर्ष होईल. विचारांचा विजय होईल असे वर्तन ठेवावे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मतांचा मान राखाल. सहकारीवर्ग, मित्रमंडळी यांच्या साथीने अर्थनियोजन कराल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी, तसेच त्याचे मनोबल वाढवावे. कौटुंबिक वातावरणात अतिविचारांमुळे तणाव जाणवेल. हा तणाव कमी करण्यास आपण प्रयत्न कराल. उत्सर्जनसंस्था आणि सांधे यांची विशेष काळजी घ्यावी.

वृश्चिक आत्मकारक रवी आणि मनाचा कारक चंद्र यांच्या केंद्रयोगामुळे मानसिक स्थैर्य डळमळेल. नोकरी-व्यवसायात काही निर्णय खंबीरपणे घ्यावे लागतील. वरिष्ठांच्या पाठिंब्यामुळे महत्त्वाच्या कामांना गती येईल. सहकारीवर्गाच्या चुका, त्रुटी त्यांच्या निदर्शनास आणून द्याल. मोठे नुकसान होता होता वाचेल. जोडीदाराची जबाबदाऱ्या वाढल्यामुळे जास्त दमणूक होईल. पुळी-पुटकुळीचे गळूमध्ये रूपांतर होऊ देऊ नका. त्वचेची काळजी घ्या.

धनू बुद्धीचा कारक बुध आणि स्फूर्तीचा कारक नेपच्यून यांच्या नवपंचमयोगामुळे बौद्धिक क्षेत्रात विशेष प्रगती कराल. उत्स्फूर्त लेखन, संभाषण कराल. नोकरी-व्यवसायात महत्त्वाच्या चर्चासत्रांमध्ये आपले मुद्दे नेमकेपणाने मांडाल. सहकारीवर्गाच्या तारतम्यामुळे महत्त्वाची कामे वेगाने पुढे सरकतील. मित्रपरिवाराची मदत मिळेल. जोडीदाराच्या कष्टाचे चीज होईल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवाल. पूर्वीचे त्वचाविकार  उफाळून येतील. पचन सुधारावे.

मकर चंद्र-मंगळाचा युतीयोग आत्मविश्वास वर्धक ठरेल. नवे करार कराल. आधीची रखडलेली कामे पूर्णत्वाला न्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. संशोधनात्मक कार्यात त्यांचा मोठा पाठिंबा मिळेल. सहकारीवर्गाच्या फायद्याचे ठरतील असे निर्णय घ्याल. जोडीदाराला त्याच्या कार्यात यश मिळेल. नातेसंबंध जपाल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न कराल. पोटातील आतडय़ांचे काम मंदावेल. थकवा जाणवेल. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

कुंभ चंद्र-शुक्राच्या नवपंचमयोगामुळे आपली जीवनमूल्ये जपून प्रत्येक क्षणाचा चांगला उपयोग करून घ्याल. नोकरी-व्यवसायात आपल्या शास्त्रशुद्ध ज्ञानाचा इतरांनाही लाभ मिळवून द्याल. जोडीदाराचा त्याच्या कार्यक्षेत्रात नावलौकिक वाढेल. जुने लोक नव्याने  संपर्कात येतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहावे म्हणून काही गोष्टींचा त्याग कराल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नातेवाईक, शेजारीपाजारी मदतीला धावून येतील. मनोबल वाढवण्यासाठी योगसाधना करावी.

मीन चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे आपला उत्साह वाढेल. आप्तेष्टांकडून मदत, सहकार्य आणि पाठिंबा मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून वैयक्तिक पातळीवर आणि संस्थेच्या दृष्टीनेदेखील लाभदायक ठरेल असा सल्ला मिळेल. जोडीदाराच्या कामातील अडचणींवर मात करताना त्याची अतिरिक्त दमणूक होईल. मणक्याचे आरोग्य सांभाळा.