सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे महत्त्वाचे निर्णय योग्य विचारांती घ्याल. वैयक्तिक लाभ बाजूला ठेवून समाजाचे हित साधाल. मनात आलेल्या विचारांवर पुनर्विचार करून मगच ते मांडावेत. नोकरी-व्यवसायात धीराने वागावे. सहकारी वर्गाकडून नव्या कल्पना मिळतील. जोडीदाराच्या कर्तबगारीचे त्याच्या कार्यक्षेत्रात कौतुक होईल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. कुटुंब सदस्यांचे प्रश्न शांत डोक्याने सोडवण्याचा प्रयत्न कराल. अपचनाचा त्रास सतावेल.

वृषभ शुक्र-शनीच्या नवपंचम योगामुळे शुक्राच्या नावीन्यपूर्ण दृष्टीला शनीच्या पारंपरिकतेची जोड मिळेल. जुन्या गोष्टी नव्याने वापरात आणाल. नोकरी-व्यवसायात आर्थिक गणिते वेगळ्या पद्धतीने मांडाल. सहकारी वर्गाचा कामाचा उत्साह वाढवाल. सांघिक कामात सर्वाना महत्त्व द्याल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. त्याचा दृष्टिकोन सर्वाच्या हिताचा ठरेल. कुटुंब सदस्यांची प्रगती होईल.  कंबर आणि मणका यांची काळजी घ्यावी.

मिथुन रवी-बुधाच्या युती योगामुळे रवीचा अधिकार आणि बुधाची बुद्धिमत्ता यांचा मिलाप दिसून येईल. नोकरी-व्यवसायात अभ्यासपूर्वक सादरीकरण प्रभावी ठरेल. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाची काहीशी नाराजी पत्करून निर्णय घेणे भाग पडेल. जोडीदाराच्या कामाचा वेग वाढेल. कामातील किचकटपणामुळे अधिक व्यवधान ठेवावे लागेल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. दूषित पाण्यामुळे पोट बिघडेल. वेळेवर उपाय, इलाज करणे आवश्यक!

कर्क चंद्र आणि शुक्र या स्त्री ग्रहांच्या नवपंचम योगामुळे कलेच्या क्षेत्रात प्रगती कराल. नेहमीच्या चाकोरीबद्ध कामाच्या सादरीकरणाला कलेची जोड द्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या अपेक्षेप्रमाणे कामाचा उरक पाडाल. सहकारी वर्गाला विशेष प्रशिक्षण द्याल. जोडीदाराच्या तब्येतीच्या तक्रारी कमी होतील. त्याला भावनिक आधाराची गरज भासेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. नियमांचे पालन कराल. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावे लागेल.

सिंह चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे कृतिशीलता आणि व्यवहार यांची संगत चांगली जुळेल. लाभदायक पावले उचलाल. नोकरी-व्यवसायात अधिकारांची अंमलबजावणी योग्य प्रकारे कराल. वरिष्ठांच्या मतांचा आदर कराल. सहकारी वर्गावर नव्या जबाबदाऱ्या सोपवाल. जोडीदार आपल्या कामाव्यतिरिक्त समाजसेवेत रस दाखवेल. आपणास त्याचा अभिमान वाटेल असे कार्य तो करेल. सर्दी, खोकला, घशाशी संबंधित त्रास सहन करावे लागतील.

कन्या चंद्र-मंगळाच्या युतीयोगामुळे नव्या जोमाने कामाला सुरुवात कराल. साकल्याने विचार करून अंतिम निर्णयाप्रत पोहोचाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या नियमांचे तंतोतंत पालन कराल. सहकारी वर्गाची मदत मिळेल. कामाला गतिमान करण्यासाठी विशेष लक्ष पुरवावे लागेल. जोडीदार आपले कार्यकौशल्य पणाला लावेल. त्याचा योग्य मोबदलाही त्याला मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींचा मोठा आधार वाटेल. वातविकार बळावतील. औषधोपचार घ्यावेत.

तूळ भावनांचा कारक चंद्र आणि व्यावहारिक दृष्टिकोन देणारा बुध यांच्या केंद्रयोगामुळे कर्तव्यपूर्तीकडे झुकते माप जाईल. नोकरी-व्यवसायात परिस्थितीत झालेले बदल सहजरीत्या अंगवळणी पाडून घ्याल. सहकारी वर्गाला मदत कराल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. कौटुंबिक वातावरणात शिस्तीसह प्रेमाचे दोन शब्द आणि आपुलकी आवश्यक आहे. कुटुंब सदस्यांच्या चुका त्यांना दाखवून द्याल. परिस्थिती योग्य प्रकारे हाताळावी.

वृश्चिक चंद्र-शुक्राच्या समसप्तम योगामुळे आपल्या हळव्या मनाची प्रचीती  जवळच्या व्यक्तींना येईल. नोकरी-व्यवसायातील जबाबदाऱ्या नेटाने पूर्ण कराल. आपल्या नेमकेपणाचे कौतुक होईल. सहकारी वर्गाला मदत कराल. तसेच कामामधील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. रखडलेली कामे पूर्ण करण्याच्या मागे लागावे. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. मनाविरुद्ध घटना घडल्यास त्रागा करून डोकेदुखी वाढवू नका.

धनू चंद्र-हर्षलच्या लाभयोगामुळे संशोधन क्षेत्रातील कार्यात यश मिळेल. सर्वसामान्यांपेक्षा वेगळे विचार मांडाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांशी पटवून घ्यावे लागेल. शब्द जपून वापरा. सहकारी वर्गाकडून कामे करून घेताना उदार मनाने त्यांच्या समस्याही सोडवाल. आपल्या मार्गदर्शनामुळे गरजवंतांना दिशा मिळेल. जोडीदाराशी मिळतेजुळते घ्यावे. लहानमोठय़ा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे इष्ट! मोजका आहार घ्यावा. अपचन टाळा. व्यायाम आवश्यक!

मकर चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे मरगळ झटकून उत्साहाने कामाला लागाल. नव्या उमेदीने कार्यक्षेत्रात उतराल. नोकरी-व्यवसायातील जबाबदाऱ्या उत्साहाने पूर्ण कराल. सहकारी वर्गाकडून अपेक्षित नेमकेपणा आणि कालमर्यादा यांचे पालन होणार नाही. जोडीदाराच्या कामाचे स्वरूप बदलेल. त्याला आणि त्याच्या बदलत्या वेळापत्रकाला समजून घ्यावे लागेल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. मुलांची प्रगती होईल. उत्सर्जन संस्थेचे विकार बळावतील.

कुंभ आत्मकारक रवी आणि मनाचा कारक चंद्र यांच्या नवपंचम योगामुळे हाती घेतलेले प्रकल्प वेग घेतील. पारमार्थिक क्षेत्रात ओढ वाटेल. नवनवीन गोष्टींचा अभ्यास कराल. नोकरी-व्यवसायात संशोधनाच्या क्षेत्रात आपल्या हातून मोठे योगदान घडेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्गाच्या कुरबुरी चालू राहतील. कुटुंब सदस्यांना नव्या संधी उपलब्ध होतील. त्यांच्या कष्टाचे चीज होईल. खांदे आणि मानेचा व्यायाम करावा. दुखणे अंगावर काढू नये.

मीन चंद्र आणि नेपच्यून या संवेदनशील ग्रहांच्या युतीयोगामुळे रोजच्याच कामांमध्ये थोडाफार बदल करून त्यात उत्साह निर्माण कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक असेल. सहकारी वर्गाच्या संमतीने जबाबदाऱ्या पेलण्याचे आव्हान स्वीकाराल. जोडीदारासह मोकळेपणाने बोलल्यामुळे हलके वाटेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. डोळ्यांची काळजी घ्यावी.