सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष ‘एक घाव दोन तुकडे’ असा पवित्रा घेऊन चालणार नाही. त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. त्यापेक्षा शांत डोक्याने सर्व बाजूंनी साकल्याने विचार करून निर्णय घ्या. नोकरी-व्यवसायात विवेकी विचारांमुळे वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारीवर्ग मदत करण्यास उत्सुकता दाखवेल. नात्यातील आधीचे ताण तणावयुक्त प्रसंग विसरून पुढे जा. जोडीदाराचा दृष्टिकोन समजून घ्या. रक्ताभिसरणासंबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
वृषभ मंगळ-नेपच्यूनच्या केंद्रयोगामुळे आपल्या कल्पनाविश्वातच रममाण व्हाल. योग्य वेळी परिस्थितीचे भान ठेवून मानसिक तणावातून बाहेर पडाल. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. नोकरी-व्यवसायात ज्यांचा कधी विचारही केला नसेल अशा अडचणी समोर येऊन उभ्या राहतील. अशा वेळी वैचारिक गोंधळाला सामोरे जावे लागेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. मूत्राशयाच्या तक्रारींकडे विशेष लक्ष द्या. वैद्यकीय तपासणी करा.
मिथुन शनी-चंद्राच्या युतीयोगामुळे हाती घेतलेल्या कार्यात अडचणी निर्माण होऊन विलंब होईल. आपली चूक नसताना त्रास सहन करावा लागेल. नोकरी-व्यवसायात एकापेक्षा अनेक जबाबदाऱ्या पेलाव्या लागतील. वरिष्ठांचा पाठिंबा आणि सहकारीवर्गाचे साहाय्य मिळेल. जोडीदार आपले विचार, मते समजून घेणार नाही. तरी त्याबाबत आत्ता वाद न घालता जोडीदाराला थोडा वेळ द्यावा. कौटुंबिक वातावरण धावपळीचे राहील. पोट आणि घसा सांभाळा.
कर्क शुक्र-चंद्राच्या युतीयोगामुळे नवनवीन कल्पना अमलात आणाल. मित्रमंडळींच्या भावना समजून घ्याल. त्यांना वैचारिक आणि भावनिक आधार द्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा दबाव सहन करावा लागेल. सहकारीवर्गाकडून अपेक्षित मदत मिळेल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवाल. कुटुंब सदस्यांकडून आनंदवार्ता समजतील. जोडीदार आपल्या कामाच्या ताणामुळे थकून जाईल. आपण त्याला समजून घेऊन उभारी द्याल.
सिंह रवी-चंद्राच्या लाभयोगामुळे उत्साह वाढेल. दिलदार वृत्तीने गरजूंना मदत कराल. नोकरी-व्यवसायात परदेशाशी संबंधित कामाला किंवा प्रोजेक्टला गती मिळेल. सहकारीवर्गाचा व्यवहारी दृष्टिकोन उपयोगी पडेल. जोडीदाराकडून आपल्या प्रश्नांना, समस्यांना योग्य आणि समर्पक उत्तरे-उपाय सापडतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न आणि शांत राहील. कामाच्या धावपळीमुळे मांडय़ा भरून येणे, पोटऱ्यांमध्ये गोळे येणे असे शारीरिक त्रास सहन करावे लागतील.
कन्या गुरू-चंद्राच्या लाभयोगामुळे धार्मिक गोष्टींतून आनंद मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण कराल. सहकारीवर्ग अपेक्षित साहाय्य करणार नाही. पण ते फारसे मनावर न घेता संयम बाळगा. कामातील सातत्य सोडू नका. काल्पनिक मनोरे रचून मनावरचा ताण वाढवू नका. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. जोडीदार आपणास चांगले समजून घेईल. आपणही त्यास समजून घ्यावे.
तूळ चंद्र-गुरूच्या लाभयोगामुळे वृत्ती आनंदी राहील. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. ज्येष्ठांचा सहवास फलदायी ठरेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची नाराजी जाऊन त्यांचे पाठबळ मिळेल. सहकारीवर्गाला आवश्यक ती मदत कराल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. जोडीदाराचे म्हणणे आधी ऐकून घ्यावे लागेल. मग योग्य वेळी आपले मत मांडा. अन्यथा शब्दाने शब्द वाढत जाईल. तत्त्व आणि भावना यांच्यात संघर्ष होईल. तब्येत चांगली राहील.
वृश्चिक मंगळ-नेपच्यूनच्या केंद्रयोगामुळे वैचारिक गोंधळ वाढेल. निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल. नोकरी-व्यवसायात आपल्या कामाची स्वतंत्र छाप उमटवाल. सहकारीवर्गाकडून वाहवा मिळवाल. यामुळे पुढल्या कामाचा उत्साह आणखी वाढेल. जोडीदाराशी चांगले सूर जुळतील. कौटुंबिक वातावरण प्रेमाचे आणि उत्साहाचे राहील. डोकेदुखी, सायनस तसेच युरीन इन्फेक्शन यांसारखा त्रास होण्याची शक्यता दिसते. वेळेवर औषधोपचार घेणे आवश्यक!
धनू शनी-चंद्राच्या युती योगामुळे आपल्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होतील असे नाही. नोकरी-व्यवसायात आपल्या गुणवत्तेचा पुरेपूर उपयोग होत नाहीये याची खंत न बाळगता त्यासाठी नवा पर्याय शोधून काढाल. सहकारीवर्ग मदतीचा हात देईल. जोडीदाराच्या सोबतीने कुटुंब सदस्यांच्या उपयोगी पडाल. आपल्या मार्गदर्शनाचा त्यांना नक्कीच लाभ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शीर दबल्यामुळे खांदेदुखी उद्भवेल.
मकर चंद्र-रवीच्या केंद्रयोगामुळे वरवर व्यवहारी वागलात तरी आतून प्रेमाचा पाझर फुटेल. एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार कराल. रवीच्या ऊर्जेमुळे हाती घेतलेल्या कामांना गती मिळेल. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास कराल. भेटीगाठी यशस्वी ठरतील. मित्रपरिवाराच्या ओळखीतून अनेक कामं पुढे सरकतील. जोडीदाराच्या भावनांचा आणि मतांचा आदर कराल. कौटुंबिक वातावरण उत्साहाचे राहील. खाज येणे, त्त्वचा कोरडी पडणे असे त्रास बळावतील.
कुंभ रवी-चंद्राच्या लाभयोगामुळे बौद्धिक क्षेत्रात विशेष चमकाल. दुसऱ्याला समजावून सांगण्याच्या हातोटीमुळे संकटकाळी त्याला धीर द्याल. मित्र मंडळी, आप्तेष्ट यांच्या आपसातील वादापासून दूर राहा. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारीवर्गाकडून फारशा अपेक्षा सध्या तरी न ठेवणे हेच उत्तम! आरोग्य चांगले राहील. जोडीदार त्याच्या क्षेत्रात विशेष कार्य करेल.
मीन चंद्र-शुक्राच्या युतीयोगामुळे मनपसंत कपडय़ांची खरेदी कराल.उत्साह वाढेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे ऐकून घेण्याव्यतिरिक्त पर्याय नाही. सहकारीवर्ग मात्र आपल्या बाजूने उभा राहील. जोडीदारासह जवळपासच्या प्रवासाचे नियोजन कराल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. उष्णतेच्या विकारांपासून स्वत:ला दूर ठेवा. काळजी करण्यापेक्षा योग्य ती काळजी घ्या. आनंदी राहा.