विनायक परब  –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय प्रतिवर्षी चीनच्या लष्करी सामर्थ्यांचा आढावा घेणारा एक अभ्यास अहवाल तयार करते. यंदाचा अहवाल अनेक अर्थानी महत्त्वाचा आहे. स्वत: अमेरिका या अहवालात म्हणते की, आता अमेरिकेचे नव्हे तर चीनचे नौदल हे जगातील सर्वात मोठे नौदल ठरले आहे. आकडेवारी देताना हा अहवाल म्हणतो की, अमेरिकेच्या नौदलाकडे २९३ युद्धनौका तर चीनकडे ३५० युद्धनौका आणि पाणबुडय़ा आहेत. त्यांची विगतवारी टनावारी करायला गेले तर अमेरिकेचे नौदल सामथ्र्यशाली भासू शकते; मात्र वस्तुस्थिती तशी नाही. कारण चीनकडे असलेल्या युद्धनौका आणि पाणबुडय़ा या अत्याधुनिक आणि बहुपयोगी पद्धतीने युद्धात वापरता येण्याजोग्या आहेत. शिवाय येत्या काळात त्यांचे शस्त्रास्त्रसामथ्र्यही दुपटीने वाढविण्याचा चीनचा मनोदय आहे. एवढेच नव्हे तर शेजारील शत्रुराष्ट्र असलेल्या भारताला घेरण्याच्या उद्देशाने म्यानमार, पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत त्यांनी जवळीक साधली असून तिथे चीनच्या नौदलाचा तळ उभारण्याचे घाटते आहे.

अमेरिकच्या संरक्षण मंत्रालयाने हे आता म्हणजे २०२० साली सांगितलेले असले तरी त्याचे संकेत पार २००४ पासून मिळत होते. त्याच वेळेस म्यानमार, पाकिस्तान आणि श्रीलंकेशी जवळीक साधण्यास चीनने पद्धतशीरपणे सुरुवात केली होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये नौदलाने बजावलेल्या कामगिरीनंतर आणि विशेषत भारतीय नौदलातील आयएनएस विक्रांत आणि विराटच्या कामगिरीनंतर त्यातून धडा घेत चीनने विमानवाहू युद्धनौका बांधणीसाठी कंबर कसली होती. आपल्याला पूर्व-पश्चिम किनारपट्टीवर आणि शिवाय हिंदूी महासागरात अशा एकूण तीन विमानवाहू युद्धनौकांची गरज आहे, असे असतानाही आज आपल्याकडे केवळ एकच आयएनएस विक्रमादित्य शिल्लक आहे. चीनला विमानवाहू युद्धनौकांची निकड जाणवायला विलंब झाला. मात्र त्यानंतर त्यांनी वेगात पावले उचलली. पहिली विमानवाहू युद्धनौका रशियाकडून घेतली. नंतर स्वत तयार केली. आणि आता चीनची दुसरी स्वयंपूर्ण बनावटीची विमानवाहू युद्धनौका तयार झाली आहे. याशिवाय सहा अधिक विमानवाहू युद्धनौका बांधणीचा त्यांचा प्रयत्न आहे. आरमारी लढाईत पाणबुडय़ांना स्वतंत्र महत्त्व असते. आपले पाणबुडीदळ जुनेपुराणे, वयोमान संपलेले आणि तुटपुंजे आहे. तर चीनचे संख्येत अनेक पटींनी अधिक आणि अत्याधुनिक आहे. स्कॉर्पिन पाणबुडय़ा प्रत्यक्ष भारतीय नौदलात दाखल होण्यास काहीसा वेळ लागणार आहे. खरे तर आताच्या घडीस पाकिस्तानचे पाणबुडीदळही प्रभावी वाटावे, एवढी आपली अवस्था दुर्दैवी आहे. अशा अवस्थेत आलेला हा अहवाल महत्त्वाचा ठरावा. हा अहवाल चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे चीनने म्हटले असले तरी भारतीय नौदलाकडे असलेली माहितीही यापेक्षा वेगळी नाही. उघडपणे कुणी बोलत नाही इतकेच!

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेच्या नौदलालाही आव्हान देणारी भाषा चीनने गेल्या अनेक वर्षांत केली असून हिंदूी महासागर आणि अरबी समुद्रावर प्रभाव राखण्याचा मनोदय त्यांनी यापूर्वीच जाहीर केला आहे. त्यामुळे लडाखमध्ये गलवान येथे उद्भवलेल्या संघर्षांसारखाच संघर्ष येणाऱ्या काळात या दोन्ही समुद्रांवर होणे तेवढेच अपेक्षित आहे. प्रत्यक्षात अशी परिस्थिती सागरावर उद्भवल्यास आपल्याकडील नौदल अधिकारी कितीही सक्षम असले तरी  युद्धनौका आणि खासकरून पाणबुडय़ांच्या संख्याबळात कमी पडणे आपल्याला परवडणारे नाही. सध्या लष्करीदृष्टय़ा गलवानमध्ये आपण पाय रोवून उभे असलो तरी समुद्र हे पूर्णपणे वेगळे रणांगण आहे. इथे ‘जलमेव यस्य बलमेव तस्य’ म्हणजेच ज्याची सागरावर सत्ता तोच जगात सर्वश्रेष्ठ हे पूर्णपणे लागू आहे. वेदांतील हे विचार आपल्याहीपेक्षा चीननेच अधिक गांभीर्याने घेतलेले दिसतात. त्यामुळे आपलीच अवस्था सध्या ‘जलमेव चिंता’ अशी झालेली आहे!