गोहत्या बंदी कायदा महाराष्ट्रात लागू झाल्यानंतर मुंबईतील कत्तलखाने आणि गोशाळा हे दोन्ही घटक एकदम मोठय़ा प्रमाणात प्रकाशात आले. मुंबईसारख्या अतिगर्दीच्या आणि जागेला सोन्याचा भाव असणाऱ्या शहरात गोशाळा असतील का असादेखील प्रश्न पडू शकतो. पण मुंबईतील जैन धर्मीयांच्या आर्थिक ताकदीवर व धार्मिक भावनेवर येथे अनेक गोशाळा स्थिरावल्या. काही भर मुंबईत तर काही उपनगरात दूर, तर काही विस्तारित मुंबईत, ठाणे, पालघर जिल्ह्य़ात.

मुंबईच्या गोशाळांचा इतिहास १८३४ पर्यंत मुंबई पांजरापोळ ट्रस्टच्या स्थापनेपर्यंत मागे जातो. मुंबई पांजरापोळची स्थापना १८२ वर्षांपूर्वी झाली. सध्या मुंबई आणि परिसरात (चेंबूर, रायता, भिवंडी, वालसिंद, लाखिवली) पाच गोशाळा असा त्यांचा मोठा व्याप आहे. प्रत्येक ठिकाणी किमान ३५० च्या आसपास गोवंशाचे पालन व संवर्धन येथे केले जात असल्याचे येथील अधिकारी सांगतात.

मुळात बेवारस आणि वृद्ध जनावरांना सांभाळण्यासाठी सुरू झालेल्या या मुंबई पांजरापोळमध्ये सध्या बाहेरून आलेल्या भाकड अथवा कसायांकडून सोडवलेल्या गोवंशाचं प्रमाण पाच-दहा टक्के इतकंच आहे. मुंबईत अतिगर्दीच्या अशा भागात म्हणजेच भुलेश्वरमध्ये तीन-चार एकर जागेवर यांचे मुख्य कार्यालय व पांजरापोळ आहे. सुमारे ३५० गाईंचं वास्तव्य आहे. पण येथे असणाऱ्या गाईंमध्ये दुभत्या गाईंचं प्रमाण सर्वाधिक आहे. भाकड, म्हाताऱ्या गाई संस्थेच्या इतर केंद्रांवर पाठवल्या जातात. जवळपास सर्वच गाई या काठियावाडी प्रजातीच्या आहेत. संस्थेच्या इतर केंद्रांवर प्रत्येकी सुमारे दोन-अडीचशे एकर जागा असून ३५०च्या आसपास गोवंश सांभाळला जातो. मुंबईबाहेरील केंद्रावर काही प्रमाणात पोलिस कारवाईत पकडून आणलेल्या आणि शेतकऱ्यांनी सोडलेल्या गाई सांभाळल्या जातात. पण एकंदरीतच एकूण गोवंशाच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प म्हणावं असंच आहे.

किंबहुना मुंबईतील बहुतांश पांजरापोळ किंवा गोशाळांची हीच सद्य:स्थिती आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने मुंबई परिसरातील गोशाळांना भेट दिल्यानंतर हा भेद प्रामुख्याने जाणवला. आज या गोशाळांची गोवंशाच्या हाताळणीनुसार वाटणीच झाली आहे. गोशाळेसाठी लागणारी जागा आणि मुंबईतील जागेला असणारा सोन्याचा भाव यामुळे मोठय़ा गोशाळा या मुंबईच्या हद्दीबाहेरील विस्तारित मुंबईत, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात आढळतात. वसई, विरार, भिवंडी परिसर, मुरबाड परिसर येथे मोठय़ा प्रमाणात जागा घेऊन या गोशाळा सध्या कार्यरत आहेत.

गोवंश संवर्धन हा प्राथमिक हेतू असला तरी गेल्या काही वर्षांत मुंबई आणि परिसरातील गोशाळांची साधारणपणे तीन प्रकारांत विभागणी झाली आहे. एक – पूर्वापार सुरू असलेल्या गोशाळा किंवा पांजरापोळ. जेथे सध्या बहुतांशपणे स्वत:कडील (मालकीची) जनावरच वाढवण्यावर व त्यांची वंशवृद्धी करण्यावर भर आहे. दोन – भाकड आणि म्हातारा झालेला गोवंश सांभाळणाऱ्या गोशाळा किंवा पांजरापोळ. तीन – कत्तलखान्याकडे नेताना पकडला गेलेला गोवंश सांभाळणाऱ्या गोशाळा.

मुंबई आणि उपनगरातील गोशाळांचा समावेश हा प्रामुख्याने पहिल्या प्रकारात होतो. तर केवळ भाकड आणि म्हातारी जनावरंच पाळणारी गोशाळा आहे ती मुंबई जीवदया मंडळीची; मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरारच्या पुढे सकवार आणि भालिवली येथे. आणि फक्त पोलिस कारवाईत सापडणाऱ्या गोवंशाची देखभाल करण्यावर भर देणारी गोशाळा विश्व हिंदू परिषद संचालित असून ती भिवंडीपासून पंधरा किलोमीटरवरील आनगाव येथे आहे.

पहिल्या प्रकारातील काही गोशाळा जवळपास शंभर र्वष कार्यरत आहेत. मुंबई पांजरापोळ ट्रस्ट, मुंबई गोशाळा मंडळी कांदिवली, सेठ नथुरामदास चॅरिटेबल ट्रस्ट संचालित गोशाळा मुलुंड ही काही मोजकी उदाहरणं. या गोशाळांकडे बऱ्यापैकी जागा आहे, भरपूर कर्मचारी आहेत, कायमस्वरूपी वैद्यकीय सुविधा आहेत. दूध आणि इतर उत्पादनं ही त्यांच्यासाठी महत्त्वाचं उत्पन्न ठरतात.

पण गेल्या वीसएक वर्षांत नव्याने सुरू झालेल्या काही गोशाळा म्हणजे निव्वळ कोंडवाडाच म्हणाव्या लागतील. मंदिर, आश्रम आणि जोडीला गोशाळा असं हे पॅकेज डील प्रकरण आढळून आलं. आश्रमाच्या साधूंच्या मर्जीनेच येथे बाहेरून जनावर आणता येतं. अन्यथा स्वत:च्या मालकीच्या गोवंशाचे संवर्धन करणे आणि तो पुढे वाढवणे हेच त्यात अभिप्रेत आहे. अगदीच जुजबी सुविधा आणि अपुरा कर्मचारीवर्ग, कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय व्यवस्था नसणे हे वास्तव या वेळी जाणवले. अशा गोशाळांमध्ये जागेची प्रचंड कमतरता आहे. परिणामी अगदीच कमी जागेत दोन-तीनशे जनावरं कोंबलेली असतात. पण तरीदेखील अनेक मोक्याच्या जागा या लोकांनी पटकवल्या आहेत हे जाणवते. गेल्या वीसएक वर्षांत हे प्रमाण अगदी पद्धतशीरपणे वाढत चालल्याचं दिसून येतं. जयश्री हनुमान लक्ष्मीधाम गौशाळा पेल्हार, सनातन गौशाला फाउंडेशन भोयंद पाडा वसई, सेवाधाम गोशाळा रायता ह्य़ा गोशाळा त्याचं अगदी नेमकं उदाहरण म्हणता येतील.

केवळ भाकड आणि म्हातारी जनावरं पाळणारी जीवदया मंडळीची सकरवार आणि भालिवली येथील गोशाळा मात्र सर्व सुविधांनी सुसज्ज अशी आहे. ७० कर्मचारी, दोन पूर्णवेळ पशुवैद्यक आणि महत्त्वाचं म्हणजे प्रचंड मोठी जागा. कसायांकडे जनावर द्यावं लागू नये या एकमेव भावनेतून १९१० सालीही गोशाळा सुरू असल्यामुळे येथे भाकड व म्हाताऱ्या जनावरांचा भरणा अधिक आहे. पण त्यामुळेच दूधदुभत्याचं उत्पन्न येथे मिळत नाही. जीवदया मंडळींच्या निधीतूनच हे सारं काम सुरू आहे. सकवार आणि भालिवली या दोन्ही ठिकाणी मिळून १४००च्या आसपास गोवंश येथे सांभाळला जातो. शरद पवार मुख्यमंत्री असताना संस्थेचे विश्वस्त दशरथभाई ठाकर यांनी सरकारी दुग्धालयातील भाकड व वृद्ध जनावरं कसायांनी लिलावात घेऊ नयेत म्हणून त्यांची रवानगी या गोशाळेत करायला सुरुवात केली. सध्या ते प्रमाण कमी झालं आहे. पण गोवंश हत्या बंदी झाल्यानंतर शेतकरीच त्याचं जनावर घेऊन येण्याचे प्रमाण येथे वाढत आहे.

आनगावची गोशाळा सुरू करतानाच विशिष्ट उद्देश ठेवून सुरू करण्यात आली होती. विश्व हिंदू परिषदेचं आणि संघ परिवाराचं प्रचंड मोठं जाळं येथे कार्यरत आहे. पोलिस कारवाईत पकडलेल्या गाईच सांभाळायच्या असल्यामुळे ठाणे पालघर जिल्ह्य़ातील वकिलांची एक मोठी फौजच यांच्याशी कार्यकर्त्यांच्या रूपाने संलग्न असल्याचं सचिव त्रिलोक जैन सांगतात. भिवंडी आणि परिसरात पकडलेला गोवंश सोडवल्यानंतर तो कुठे ठेवायचा असा प्रश्न १९९९ च्या आसपास गोरक्षकांना न्यायालयाने विचारला होता. अशी जागा नसेल तर सोडवलेल्या गोवंशाचा ताबा गोरक्षकांना दिला जाणार नाही असे न्यायालयाने ठणकावून सांगितल्यावर या गोरक्षकांनी आनगाव येथे एक एकर जागेवर गोशाळा सुरू केली. पुढे वामनराव प्रभू यांनी साडेतेरा एकर जागा उपलब्ध करून दिल्यावर ही गोशाळा सुरू झाली. तब्बल साडेतेरा एकरवरील हा अतिप्रचंड पसारा १७०० च्या आसपास गोवंशला संरक्षण देत आहे. त्याच जोडीने गेल्या एक-दोन वर्षांपासून शेतकऱ्यांनी सोडून दिलेल्या भाकड गाईंची संख्यादेखील वाढली आहे.

या तीनही प्रकारांतील गोशाळांचा खर्च हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. गोपालनाबरोबरच त्यातून उत्पन्न हा ज्यांचा उद्देश आहे तेथे खर्चाचं प्रमाण अधिक आहे. पण ते सधन ट्रस्टपुरतेच. पांजरापोळ रायत्याचा खर्च बारा लाख महिना (३५० जनावरांसाठी), तर सनातन फाउंडेशनची गोशाळा तितक्याच जनावरांसाठी केवळ पाच लाखच खर्च करते. अर्थातच दोन्हीकडच्या गोवंशाच्या सुदृढतेमध्ये थेट फरक जाणवतो. तर जीवदया मंडळीचा खर्च महिन्याला ३० लाख (१३०० जनावरांसाठी) तोदेखील भाकड जनावरांसाठी केला जातो. आनगावची गोशाळादेखील महिन्याला पंचवीस लाख खर्च करते. म्हणजेच ट्रस्ट आणि कार्यकर्त्यांच्या जाळ्यावरच त्या त्या गोशाळेतील जनावरांच्या संवर्धनात फरक पडताना दिसतो आणि त्यातूनच गोवंशाच्या आरोग्याला चांगलाच फटका बसताना दिसतो.

अनेक गोशाळांतील गोवंश हा मृत्यूनंतर पुरण्याची पद्धत आहे. पण जागा हाच त्यातील महत्त्वाचा घटक असल्यामुळे त्यामध्ये एकवाक्यता नाही. पांजरापोळ ट्रस्टकडे जागा भरपूर असल्यामुळे ते जनावर पुरतात. तर गायीच्या मृत्यूनंतरदेखील तिचा वापर व्हावा या उद्देशाने ती कोराकेंद्राला देणं योग्य असल्याचे पेल्हार गोशाळेचे वीरेंद्र पटेल सांगतात. सकरवार आणि आनगाव येथे हीच पद्धत अवलंबली जाते.

दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सर्वाचा भर हा केवळ दुग्ध उत्पादनांवरच आहे. गोवंशाच्या मलमूत्रापासून खत, इंधन, गॅस निर्मिती ह्य़ाबाबत तशी उदासीनताच दिसून येते. या सर्व गोशाळांमध्ये केवळ आनगावलाच गोबर गॅसचा प्रकल्प आहे.

गोशाळेत वाढून सुदृढ झालेला गोवंश गरजू शेतकऱ्यांना देण्याची पद्धतदेखील बहुतांश गोशाळांमध्ये आहे. पण ती केवळ ओळखीतून आणि योग्य कागदपत्रांच्या पूर्ततेतनंतरच. सध्या हे प्रमाणदेखील जरा कमीच झालं आहे.

मुंबई आणि परिसरातील गोशाळांची एकंदरीत सद्य:स्थितीही अशी आहे. सुरुवात जरी केवळ जैन धर्मीयांच्या धार्मिकतेतून झाली असली तरी आता मात्र त्यात अनेकजण शिरकाव करत आहेत. मुंबईत असलेला सधन जैन मारवाडी वर्ग आणि हिंदुत्ववाद्यांची ताकद यातून छोटय़ा छोटय़ा खुराडय़ातून गोशाळांचं प्रमाण वाढत आहे. त्याला आश्रम आणि मंदिराची जोड मिळत आहे. एका माहितीनुसार उल्हासनगरमध्येच पाच गोशाळा आहेत. खरं तर उल्हासनगर हे आधीच दाटीवाटीने वसलेलं आणि वेडंवाकडं कसंही वाढलेलं उपनगर आहे. त्यात या गोशाळांची निगा कशी राखली जात असेल याचा अंदाज येऊ शकतो.

गोहत्या बंदी कायदा झाल्यानंतर गोशाळांचं महत्त्व वाढू लागलंय. पण त्यासाठी आज तरी कसलीच नियमावली अस्तित्वात नाही. एकाही गोशाळेला कधीही कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यानी भेट दिल्याचं अथवा तपासणी केल्याचं आढळून आलं नाही. थोडक्यात काय सध्या तरी हे सगळंच रामभरोसे सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही.

अशी राखली जाते निगा.

उपनगरातील कांदिवली येथील मुंबई गोरक्षक मंडळींची गोशाळा ही जुन्या गोशाळांपैकी एक कार्यरत गोशाळा आहे.

या गोशाळेचे काम सकाळी चार वाजल्यापासून सुरू होते. गाईंना आधी खायला हिरवा चारा दिला जातो. त्यानंतर गाईंचे दूध काढले जाते. हे दूध काही शाळा, इस्पितळे आणि वृद्धाश्रमांना दान म्हणून दिले जाते. या गोशाळेतून सुमारे १५ ते २० संस्थांना थेट दूध पोहोचवले जाते. त्यानंतर गाईंच्या वासरांना गाईंच्या दुधासाठी सोडले जाते. दुपारच्या वेळेस गईंना उसाच्या चिप्पाडांचा खुराक दिला जातो. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस गाईंना धुतले जाते. संध्याकाळी गाईंना धान्य मिश्रितसुका पेंडा दिला जातो आणि विश्रांतीसाठी सोडले जाते. यासाठी तीस कर्मचारी येथे कार्यरत आहेत.

कांदिवलीच्या गोशाळेत एकूण ३७३ गुरे आहेत. त्यापकी ७६ बैल आणि २९७ गाई आणि त्यांची वासरे आहेत. यात भाकड गाई अशा नगण्य. सर्वात जास्त वर्षांची गाय ही सुद्धा दुभतीच आहे. या सगळ्यांना महिन्याभराला सहा टन हिरवा चारा, दोन टन उसाची चिप्पाडे, ७५० किलो मिश्रित पेंडा असा महिन्याभराचा खुराक असतो. गाईला हिरव्या चाऱ्याची एका दिवसाची किंमत साधारणत: पन्नास रुपये इतकी आहे. त्याचबरोबर लागणारी पेंड ही गाईसाठी अत्यावशक असल्याचे व्यवस्थापक सांगतात. या पेंडीमध्ये मका, ज्वारी, गहू, कपासखल्ली, मोहरी आणि अन्य जीवनसत्त्वे यांच्या प्रमाणित मिश्रण गाईंना दिले जाते.

गाईंना वेळोवेळी लसी दिल्या जातात.  त्यात प्रमुख्याने एफ.एम. डी. (फुट अ‍ॅण्ड माउथ डिसीज), एच. एस. (हेमोरहॅजिक सेप्टिकमिया), बी.क्यू. (ब्लॅक क्वॉटर), ब्रुसेलोसिस, लेप्टो या महत्त्वाच्या लसी गाईंना वेळोवेळी दिल्या जातात.

गोशाळेत गुरांना त्यांच्या वय वर्गीकरणानुसार ठेवण्यात येते. व्यायलेल्या गाईंसाठी एक वेगळा गोठा आणि त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. गाईंच्या शिंगांची विशेष काळजी घ्यावी लागते असे व्यवस्थापक सांगतात. ज्या वासरांची शिंगे समोरच्या बाजूने वाढलेली दिसतात त्यांची शिंगे लहानपणीच कापावी लागतात. अन्यथा वाढलेल्या शिंगांचा त्रास इतर गुरांना होऊ शकतो. मोठय़ा शिंगांच्या गाई आहेत त्यांची राहण्याची वेगळी व्यवस्था केली जाते. अशा गाई आपल्या शिंगांनी इतर गुरांना मारत नाहीत ना याची विशेष दखल घेतली जाते.

गोशाळेचे व्यवस्थापक सांगतात की, कांदिवलीसारख्या मध्य मुंबईत राहूनदेखील आमच्याबद्दल लोकांना माहिती नाही. याबद्दल आम्हाला खेद नाही, गोशाळेचे काम उलट व्यवस्थित सुरू आहे. लोक इथे येऊन आम्हाला त्रासच देतात. आम्हाला जास्त प्रसिद्धीही नको आणि लोकांकडून कोणतीही अपेक्षाही नाही अशी टिप्पणी ते करतात.

लोकांमध्ये गाईंच्या पचनसंस्थेविषयी ना जागृती आहे, ना किमान गाय काय पचवू शकते याबाबत माहिती आहे. अमक्या गाईला तमकाच नैवेद्य मला द्यायचा आहे, अशी मागणी आमच्याकडे केली जात होती, गाईंना काहीही खाण्यासाठी घेऊन येण्याचे प्रकार काही वर्षांपूर्वी घडत होते. मात्र आता आम्ही अशा लोकांना प्रवेशच नाकारतो. गोशाळेला दान करणाऱ्या लोकांचे प्रमाणही कमी असल्याचे ते सांगतात.
– तेजस परब

सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
@suhasjoshi2