मोबाइलच्या गरजेचं रुपांतर व्यसनात कधी झालं हे आपल्याला कळलंच नाही. लहानांना त्याची सवय होऊ लागलीय आणि तरुण पिढीवर तर त्याचे थेट दुष्पपरिणाम दिसायला लागले आहेत. त्यातूनच सोयीपेक्षा हा मोबाइल आपलं जगणंच हैराण करुन सोडताना दिसतोय.

आई-वडिलांनी मोबाइल काढून घेतल्यामुळे हरियाणातील चौथीतल्या मुलाचा हाताच्या नसा कापून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न.. अलीकडेच प्रसिद्ध झालेली ही बातमी. या प्रकरणात तो मुलगा वाचला पण इतक्या क्षुल्लक गोष्टीमुळे इतक्या टोकाला जाण्याचा विचार चौथीतल्या म्हणजे साधारण नऊ-दहा वर्षांच्या मुलाच्या डोक्यात येतो कसा? मोबाइलच्या अतिवापराचं हे टोकाचं उदाहरण अर्थात एकमेव उदाहरण नाही.

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
Shash Mahapurush Rajyog
३० वर्षांनी ‘शश राजयोग’ बनल्याने ‘या’ तीन राशी होणार प्रचंड श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो पैसाच पैसा
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

नुकतंच नागपूरमध्ये घडलेलं एक दुर्दैवी प्रकरणं. अगदी ताजं. वेणा तलावात नौकाविहार करायला गेलेल्या तरुणाची बोट फेसबुक लाइव्ह करायच्या नादात उलटली आणि त्यांच्यातल्या आठ जणांना जलसमाधी मिळाली. त्याआधीच आठ-दहा दिवसांपूर्वी मुंबईच्या मरीन ड्राइव्ह इथं पावसाचा आनंद घ्यायला गेलेली एक तरुण मुलगी सेल्फी काढायच्या नादात असताना समुद्रात पडली आणि जीवाला मुकली.

मुंबईतल्या चेंबूरमध्ये राहणारा दहावीत शिकणारा मुलगा. त्याने खूप हट्ट केल्यामुळे त्याला आयफोन दिला होता. तो दहावीत नापास झाला. नंतर त्याच्या पालकांना असं लक्षात आलं की तो अभ्यास न करता मोबाइल आणि लॅपटॉपवर गेम्स खेळायचा. आणखी चौकशी केल्यावर डॉक्टरांना माहिती मिळाली की तो आठवी आणि नववीत असतानासुद्धा मित्रांच्या फोनमधून असे गेम्स खेळायचा. त्याला गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय खूप कठीण जात होते. या विषयांचा मुद्दा आला की तो गेम्स खेळायला लागायचा. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला की धड बोलायचा नाही. हिंसक व्हायचा. त्यामुळे त्याला तीन आठवडय़ांसाठी दवाखान्यात दाखल केलं. त्यानंतर तीन महिने तो सुधारगृहात होता. तिथे त्याचं कौन्सिलिंग केलं गेलं. आता तो मुलगा बीकॉमच्या शेवटच्या वर्षांमध्ये शिकतोय आणि पार्ट टाइम नोकरीही करतोय.

आणखी एक २१ वर्षीय मुलगा एका फायनान्स कंपनीत इंटर्नशिप करत होता. तिथे त्याला काहीच काम नसायचं. तो इतका कंटाळायचा की वेळ घालवण्यासाठी तो दिवसभर चॅटिंग करायचा. हळूहळू तो डेटिंग साइटकडे वळला. त्यानंतर तासन्तास फोनवर बोलणं, चॅटिंग करणं असं सुरू झालं. रात्रभर तो बोलत बसायचा. अजिबात झोपायचा नाही. त्याच्या पालकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी त्याला डॉक्टरांकडे नेलं. त्याने कौन्सिलिंगला चांगला प्रतिसाद दिला. आता तो त्यातून बाहेर आला आहे.

आपल्या आसपास मोबाइलच्या अतिवापराची अशीच उदाहरण आपण बघत असतो. मोबाइलचा सामान्यांच्या रोजच्या जीवनातला वापर जसजसा वाढला तसतसं त्यासाठी विविध सुविधा-सवलती देणं सुरू झालं. अशा प्रलोभनांमध्ये ग्राहक अडकत गेला. यामध्ये सगळ्यात सोपं लक्ष्य होतं तरुणांचं. त्यामुळे त्यांना आकर्षित करतील अशा कॅमेरा, म्युझिक अशा महत्त्वाच्या सुविधा त्यात तयार केल्या. असं एकेक करत काळानुरूप मोबाइलमधल्या सुविधा वाढत गेल्या. वय, काम, आवडनिवड, प्राधान्यक्रम यांनुसार मोबाइलमध्ये आकर्षक सुविधा आणल्या गेल्या. या सगळ्यात फक्त मोबाइल आकर्षक वाटून चालणार नव्हते. मोबाइलचं नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांचीही इथे महत्त्वाची भूमिका होती. हे लक्षात आल्यानंतर त्यांनीही आकर्षक सुविधांचा सपाटाच लावला. तरुण अशा रीतीने मोबाइलच्या आहारी जाण्यामागे मोबाइल बनवणाऱ्या कंपन्या आणि मोबाइलचं नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्या या दोघांचाही मोठा हातभार आहे.

आयआयटी मुंबईच्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिपार्टमेंटमधील प्राध्यापक गिरीश कुमार हाच मुद्दा पुढे नेतात. ‘मोबाइल नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांच्या चुकीच्या जाहिरातींपासून सगळी सुरुवात होते. एका नेटवर्कची फोरजीची जाहिरात होती. ‘आमचं नेटवर्क रात्री वापरलं तर ५० टक्के कॅशबॅक’ असं त्यात सांगितलं होतं. यामागे नेटवर्कचं गिमिक होतं. रात्रीसुद्धा दिवसाइतकंच त्यांचं चांगले नेटवर्क वापरलं जाऊन त्यांना पैसे मिळावे यासाठी ती जाहिरात केली होती. अशा आशयाच्या इतरही नेटवर्कच्या जाहिराती आहेत,’ असं प्राध्यापक कुमार सांगतात. अशा जाहिरातींना बळी पडणारा तरुण वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या तरुणांमुळे त्यांचे पालकही यात अडकत जातात. पर्यायाने मोबाइल वापरकर्त्यांची संख्या वाढीस लागते. यात मोबाइलवर बोलणाऱ्यांची आणि इंटरनेट वापरकर्त्यांची संख्याही वाढते. या वाढत्या संख्येबद्दल प्राध्यापक कुमार सांगतात, ‘भारतात मोबाइलवर बरेच लोक बराच वेळ बोलत असतात. त्यामुळे मोबाइल नेटवर्कचे टॉवरसुद्धा जास्त फ्रीक्वेन्सी प्रसारित करतात. पण यामध्ये एक गोष्ट दुर्लक्षित होत आहे. या टॉवरमधून प्रसारित होणाऱ्या या फ्रीक्वेन्सीचा आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे. परिणामी त्यांना काही ना काही शारीरिक त्रास आहे. आजचा फ्रीक्वेन्सीचा प्रमाणक (नॉर्म) ४५० मिलीवॉट पर स्केवर मीटर इतका आहे. पण पाच वर्षांपूर्वी हेच प्रमाण ४५०० इतकं होतं. याबद्दल आम्ही अनेक पत्रं लिहिली, अभ्यास केला. त्यानंतर ते प्रमाण कमी झालं. पण ४५० हेसुद्धा खूप जास्त आहे’, अशी महत्त्वपूर्ण माहिती कुमार सांगतात. म्हणजेच, मोबाइल नेटवर्कच्या जाहिराती, ग्राहकांची वाढती संख्या, टॉवरमधून प्रसारित होणारी जास्त फ्रीक्वेन्सी या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. अर्थात म्हणून प्राध्यापक कुमार मोबाइलचा वापर नाकारत नाहीत. ते आवर्जून सांगतात, ‘मोबाइलचे अनेक फायदे आहेत म्हणूनच जगभरात मोबाइल इतक्या मोठय़ा संख्येने वापरला जातो. नेट बँकिंग, कॅब बुकिंग, सिलेंडर बुकिंग, संबंधित व्यक्तींशी संपर्कात राहणं अशी अनेक महत्त्वाची कामं मोबाइलमार्फत होतात.’

जेव्हा एखाद्या गोष्टी शिवाय एखादी व्यक्ती राहूच शकत नाही किंवा त्या गोष्टीचा वियोग त्या व्यक्तीला सहन होत नाही तेव्हा ती व्यक्ती त्या गोष्टीच्या व्यसनाधीन झाली आहे असं म्हटलं जातं.  मोबाइल वापरण्याचं सर्वाधिक प्रमाण तरुणांचं आहे. तरुण वर्ग दिवसातले कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त आठ तास मोबाइलवर असतो. पण खरं तर तज्ज्ञांच्या मते हे प्रमाण २० मिनिटं इतकंच असायला हवं. म्हणजेच मोबाइलचा वापर कित्येक पटींने जास्त वेळ होत आहे. एखादा मुलगा आठ तास मोबाइलवरच असेल तर उरलेल्या १६ तासांमध्ये तो काय-काय करेल? काम, विश्रांती, झोप, कुटुंबासमवेत वेळ, मित्रपरिवारासोबत गप्पा, वाचन, सिनेमा बघणं अशा अनेक गोष्टी १६ तासांमध्ये होणं शक्य नाही. शिवाय यात पुरेशी झोप झाली नाही तर त्या व्यक्तीचं दुसऱ्या दिवशीचं वेळापत्रक कोलमडून गेलंच म्हणून समजा. म्हणूनच तंत्रज्ञान माणसासाठी आहे, माणूस तंत्रज्ञानासाठी नाही, हा फरक लक्षात घ्यायला हवा.

माणसाच्या आयुष्यातल्या काही गोष्टी सोयीच्या व्हाव्यात यासाठी तंत्रज्ञान विकसित होत गेलं आहे. त्यात नवनवीन शोध, प्रयोग होत ते आता प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनलं आहे. तंत्रज्ञानाने माणसाचं आयुष्य सोपं केलं. पण त्याचा अतिवापर, अतिरेक माणूस करत असेल तर तो तंत्रज्ञानाचा दोष नाही. याच तंत्रज्ञानातला मोबाइल हा महत्त्वपूर्ण घटक आहे. भारतात ंमोबाइल इंटरेनट वापरकर्त्यांचा आकडा या जूनपर्यंत ४२० दशलक्ष इतका होणार आहे, असं इंटरनेट अ‍ॅण्ड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाने या वर्षी मार्चमध्ये एका अहवालात जाहीर केलं होतं. इंटरनेटचा वापर हाच मोबाइल अ‍ॅडिक्शनला जास्त कारणीभूत असल्यामुळे ही वाढ महत्त्वाची ठरते.

दिवसेंदिवस ही आकडेवारी वाढतच आहे.  मोबाइल वापरण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. फोन करणे, फोटो काढणे, गाणी ऐकणे, इंटरनेट सर्फिग, चॅटिंग करणे, गेम्स खेळणे, व्हिडीओ बघणे अशी मोबाइल वापरण्याची विविध कारणं आहेत. पण हीच कारणं मोबाइलच्या अतिवापराची निमित्तंही ठरताहेत.

पूर्वी घरातल्या लॅण्डलाइनवर फोन आला की तो कोणाचा आहे ते कळायचं. आता मोबाइलमुळे तसं राहिलं नाही. स्वत:चं एक जग तयार झालं आहे. त्यात एकांत मिळाला तर पण त्याबरोबरच एकटेपणाही आला. असुरक्षितेची भावनाही आली. पण फक्त बाजारपेठेचा विचार करणाऱ्या मोबाइल कंपन्या आणि मोबाइल सव्‍‌र्हिस पुरवणाऱ्या कंपन्यांना त्यातच सोन्याची अंडी देणारी कोंबडी दिसायला लागली. त्यातच मोबाइलवर इंटरनेटची सुविधा सुरू झाली. मोबाइलने हळूहळू आपल्याला त्यात बांधलं आणि आता आपण त्यांला बांधून राहिलो आहोत. ज्यांना त्याच अडकायचंच नव्हतं त्यांनी आधीच वाटा शोधल्या होत्या. मोबाइलच्या या चक्रात अडकल्यामुळे येणारा एकाकीपणा आणि सुसंवादाची कमतरता या मुद्दय़ाबाबत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी सांगतात, ‘पूर्वीच्या काळी प्रत्यक्ष भेटून गप्पा मारण्यातली मजा आता हरवत चालली आहे. आताच्या धावपळीत कोणाकडे त्यासाठी वेळच नाही. जागतिकीकरणात लोक चालत नाहीत तर सुसाट पळताहेत. १०० वर्षांचं जगणं त्यांना दहा वर्षांत जगायचंय. लोकांशी व्यक्तिगत पातळीवर असलेला संपर्क मोबाइलमुळे तुटतो. वैयक्तिक संवाद होत नाही. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाइलमध्ये सतत नवनवीन प्रयोग केले जातात. त्यामुळे त्याकडे वळणाऱ्यांची संख्या वेगाने वाढते. शेजारी बसलेल्या माणसाशी पाच मिनिटं बोलणं एखाद्याला कंटाळवाणं वाटतं. पण तीच व्यक्ती फोनवर किंवा चॅटिंग करत एखाद्याशी बराच वेळ बोलू शकते. स्माइलपेक्षा आता स्माइली महत्त्वाची झाली आहे.’ मोबाइलची नकारात्मक बाजू मांडताना डॉ. शेट्टी त्याच्या सकारात्मकतेकडेही लक्ष वेधतात. मोबाइलचे चांगले फायदेही आहेत. पण त्याचा उपभोग घेताना गरजेपेक्षा जास्त वापर झाला की त्यातून वाईटच परिणाम दिसून येतात, असंही ते सांगतात.

हरयाणातील मुलाच्या बाबतीत घडलेला प्रसंग प्रातिनिधिक असला तरी असे प्रकार कमी-अधिक तीव्रतेने सगळीकडे दिसून येतात. लहान मुलांचा मोबाइलचा वाढता वापर, तो त्यांना हवा तेव्हा न मिळाल्यामुळे त्यांची होणारी चिडचिड, त्यांची चिडचिड कमी होण्यासाठी पालकांनी त्यांच्या हातात दिलेला मोबाइल या सगळ्या गोष्टी चुकीच्या दिशेने जात आहेत. लहान मुलं नीट जेवावीत म्हणून त्यांना मोबाइल दिला जातो. ते पालकांसोबत बाहेर असताना त्यांनी गोंधळ घालू नये म्हणून त्या मुलाला नर्सरी ऱ्हाइम्स लावून दिल्या जातात. ते हट्टीपणा करत असतील तर त्यांना मोबाइलमधले फोटो, व्हिडीओ दाखवले जातात. पण हे अतिशय चुकीचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मनोविकारतज्ज्ञ डॉ. वाणी कुल्हाळी याबद्दल महत्त्वाचे मुद्दे नमूद करतात, ‘मुलांच्या रडण्याचा आवाज होतो, ते त्रास देतात म्हणून पालक त्यांच्या हातात मोबाइल देतात. पण हे चुकीचं आहे. त्यांना त्याबाबत विचारलं की ‘आम्ही नर्सरी ऱ्हाइम्स दाखवतोय’ असं उत्तर मिळतं. पण ते दाखवणंही चुकीचंच आहे. लहान मुलं मोबाइलमधून बरोबर नाव शोधून फोन लावत असतील, गेम खेळत असतील तर त्यांचं याबद्दल कौतुक केलं जातं. हेही चुकीचंच आहे. पालकांनी त्यात भुलून जाऊ नये. असं केल्याने मुलांना प्रोत्साहन मिळतं, त्यांचं मोबाइल हाताळण्याचं प्रमाण वाढतं आणि ते वाढलं की धोका असतो. साताठ वर्षांनंतर मुलांना मोबाइल दिला तर मुलांमध्ये अतिवापराचे प्रकार होत नाहीत. पण मूल दोन वर्षांचं असल्यापासून त्याच्या हातात मोबाइल दिला तर त्यांच्या मेंदूला त्याची सवय होते आणि ते पुढे त्रासदायक ठरतं.’ हाच मुद्दा डॉ. शेट्टी पुढे नेतात. ते सांगतात, ‘मुलांच्या मोबाइल वापराकडे पालकांनी विशेष लक्ष द्यायला हवं. मुलं जेवताना पालकांनी त्याच्या हातात मोबाइल देऊच नये. असं केल्याने जेवण आणि मोबाइल असं समीकरण त्याच्या डोक्यात पक्कं होईल. दुसरं म्हणजे, ते मूल रडायला लागलं की त्याला शांत करण्यासाठी मोबाइलचा वापर सर्रास होतो. हे करणंही अत्यंत चुकीचं आहे. जरा वेळ त्याला त्रास होऊ द्या. रडून रडून कंटाळून तो शांत होईल. मुलांना अशा प्रकारे थोडा त्रास झाला तर काही बिघडत नाही.’

मोबाइलच्या अधीन होणाऱ्या लहान मुलांमध्येही वेगवेगळे मुद्दे दिसून येतात. त्यातही विविध वयोगटांतील लक्षणं, वागणं वेगवेगळं असतं. त्यांचं वय, मानसिकता, विचार करण्याची पद्धत या घटकांवरून त्यांचं मोबाइलशी असलेलं नातं वेगवेगळं असतं. मनोविकारतज्ज्ञ   डॉ. वाणी कुल्हाळी याबद्दल अतिशय सविस्तर माहिती देतात, ‘तीन वर्षांपर्यंतच्या मुलांना फोटो, आवाज यांचं आकर्षण असतं. पण मोबाइलची सवय लागल्याने चंचल नसलेली मुलं चंचल होतात. त्यांच्यातला हट्टीपणा वाढतो. कोणतीही गोष्ट ते साध्या पद्धतीने न विचारता हट्ट करूनच विचारतात. त्यांचा मोबाइलचा वापर वाढल्यामुळे त्यांना झोपेचे आजार होतात. मोबाइलमध्ये असलेल्या फ्लिकरमुळे लाइट कमी-जास्त होतो. यावर झोपेचं वेळापत्रक मेंदूमध्ये मांडलेलं असतं. परिणामी त्यांना झोपेचा आजार होतो. तीन ते सहा वर्षांमध्ये हे त्रास आणखी वाढत जातात. याचा परिणाम शिक्षणावर आणि सभोवतालच्या इतर मुलांसोबतच्या संवादावर शिकण्याचा वेग मंदावतो. ही मुलं अभ्यासातही मागे पडतात. कोणाशीही सुसंवाद करत नाहीत आणि खेळीमेळीने राहत नाही. सहा ते अकरा वर्षांच्या मुलांना गेम्स खेळायची सवय लागते. इथेही अभ्यासाकडे आणि जेवणाकडे दुर्लक्ष होतं. आठ-नऊ वर्षांच्या मुलांना इंटरनेट सर्चिग कसं करायचं, फोटो कसा काढायचा हे कळू लागतं. त्यांना गेम डाऊनलोड करता येतो. ते इंटरनेटवरच्या चुकीच्या घातक गोष्टींचे बळी ठरण्याची शक्यता निर्माण होते (वल्नरेबिलिटी टू ऑनलाइन अ‍ॅब्युज आणि वल्नरेबिलिटी टू फायनान्शिअल डिझास्टर). मुलं डाऊनलोड करत असलेले काही गेम्स फ्री नसतात. ते जेव्हा डाऊनलोड करतात तेव्हा त्यांच्या पालकांना ते माहीत नसतं. त्यांचे पैसे बिलामध्ये बघितल्यावर पालकांना त्याबद्दल कळते. बारा वर्षांच्या अनेक मुलांमध्ये ‘फँटम फोन’ हा प्रकार दिसून येतो. म्हणजे त्यांना मोबाइल वाजल्याचा सतत भास होतो. मोबाइल त्यांच्या जवळ नसला तरी तो वाजल्याचा आवाज येतो. ऑनलाइन मोबाइल गेम खेळताना ऑनलाइन कोणी असेल तर ते बघून तिथे त्यांच्यासोबत खेळतात. ते त्यात इतके गुंतले जातात की त्यांचं इतर गोष्टींकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. या सगळ्यातून अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यात त्यांना अपयश येतं.’

लहानांप्रमाणे मोठय़ांमध्ये अ‍ॅडिक्शनचं प्रमाण खूप आहे. ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त ही मंडळी वैयक्तिक आयुष्यात मोबाइलचा अतिवापर करतात. त्यांचा मोबाइलचा अतिवापर होतो आहे हे कसं समजायचं त्याबद्दल डॉ. कुल्हाळी सांगतात, ‘मुलांच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टीसाठी असलेला वेळ त्या गोष्टीवर खर्च न करता पालकांनी मोबाइलवर खर्च केला तर ते अ‍ॅडिक्ट आहेत असं समजायचं. मोबाइलमुळे मोठय़ांमध्ये स्लिप डिसऑर्डर या आजाराचं प्रमाण जास्त दिसतं. मोबाइल पोर्नोग्राफीचं अ‍ॅडिक्शनही प्रौढांमध्ये खूप आहे. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या येतात. कारण पोर्नोग्राफीमुळे जोडीदाराकडून अवास्तव लैंगिक अपेक्षा केल्या जातात. त्यामुळे जोडीदाराबद्दलचं आकर्षण कमी होत जातं.’

या सगळ्यात महत्त्वाची भूमिका ठरते ती पालकांची. तरुणांचा मोबाइलचा अतिवापर आटोक्यात आणण्यासाठी डॉ. हरीश शेट्टी एक चांगला उपाय सुचवतात, ‘मोबाइल मुलांच्या बेडरुममध्ये न ठेवता हॉलमध्ये ठेवावा. तरच ते त्यांच्या खोलीतून बाहेर येतील. याचबरोबर गॅजेट फ्री डे करण्याची वेळ आता आली आहे. यावर गॅजेट बेडरुम असा एक प्रकार मी शोधला आहे. यामध्ये रोज रात्री साडेदहा वाजता घरातले सगळ्यांचे मोबाइल फोन एकत्र करून एका ठिकाणी बंद करून ठेवायचे असतात. एखादी शांत, लाजाळू असते व्यक्ती सगळ्यांपासून दूर राहण्याच्या प्रयत्नांत मोबाइल अ‍ॅडिक्ट होते. एखादी व्यक्ती निराश असते तेव्हा अ‍ॅडिक्ट होते. घरात वाद झाले असतील तर सगळ्यांपासून दूर जाण्याच्या नादात ते अ‍ॅडिक्ट होतात. खूप जण डेटिंग साइट्सवर वेळ घालवतात. मोबाइल जगातील अनेकांशी तुम्हाला जोडून देतो. आठ ते ८० वयोगटांतील लोक मोबाइल अ‍ॅडिक्ट आहेत. मोबाइल वापरावर आपण आपल्या परीने र्निबध आणायला हवेत. एखाद्याच्या घरी पूजा असेल तर त्याने ‘गॅजेट्स आर नॉट अलाऊड’ अशी बाहेर पाटी लावायची वेळ आता आली आहे. मोबाइलच्या बाबतीत हे करू नका ते करा असा सल्ला डॉक्टरांनी दिला तर तो ऐकून सोडून दिला जातो. ते गंभीरपणे कोणी घेत नाही. पण एखाद्या आजाराचं पथ्य म्हणून सांगितलं तर ते गांभीर्याने घेतलं जातं. एखाद्या आजारासाठी खाण्या-पिण्याची जशी पथ्यं सांगितली जातात, तशीच मोबाइल वापराची पथ्यं सांगायची आता वेळ आली आहे. या अ‍ॅडिक्शनमुळे नोकरी जाणे, जोडीदार सोडून जाणे, घटस्फोट होणे अशा टोकाच्या गोष्टी घडू शकतात.’

मध्यंतरी एक जोक व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत होता. ‘आजकाल पाहुणे घरी आले की त्यांना पाणी विचारण्याआधी वायफाय हवंय का विचारा आणि बघा पाहुणे किती खूश होऊन तुमच्या पाहुणचाराचं कौतुक करायला लागतील.’  तसंच कोणी घरी बोलावलं तरी त्यांना लगेच प्रश्न केला जातो, ‘तुझ्या घरी वायफाय आहे ना?’ वायफायची इतकी सवय झाली आहे की कोणाच्या घरी जाण्याआधी त्याबद्दल खात्री करून घ्यावीशी वाटते. कॉफी शॉप, आईस्क्रीम पार्लर, स्नॅक्स कॉर्नर अशा काही ठिकाणीही ‘फ्री वायफाय’ अशी पाटी लावली जाते.

नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे मोबाइलच्या वापरालाही दोन बाजू आहेत. प्रवासात काही महत्त्वाची गोष्ट आढळून आली तर त्याचा फोटो काढला जातो. एखादी महिला एकटीने प्रवास करत असतील तर ती ज्या वाहनाने प्रवास करतेय त्याचा नंबर मोबाइलमध्ये नोंदवून तो कुटुंबीयांना ती पाठवू शकते. एखाद्या ठिकाणी पहिल्यांदा जाताना गुगल मॅप अतिशय उपयुक्त ठरतो. मोबाइलचं रिचार्ज संपलं असेल आणि बॅलन्सची गरज असेल तर विशिष्ट अ‍ॅप्सवरून बॅलन्स भरला जातो. शिवाय मोबाइल बँकिंगही करता येते. नव्या शहरात आपल्याला घ्यायला येणाऱ्या व्यक्तीशी मोबाइलद्वारेच संपर्क साधता येतो. कॅबचं बुकिंगसुद्धा मोबाइलवरून होतं. एवढंच काय तर प्रवासात काही अडचणी आल्या तर त्यासंदर्भातला फोटो काढून संबंधितांना टॅग करून ट्विटरवर ट्वीट करता येतं. उदाहरणार्थ परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज ट्विटरवर सक्रिय असतात. त्यांचं नाव टॅग करून अनेकदा परदेशात अडचणीत असलेल्यांबद्दल माहिती दिली गेली आहे. त्यांनीही वेळोवेळी त्यातून अडकलेल्यांना सोडवलं आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही अशा रीतीने ट्विटरवरून आलेल्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ मदत केल्याची उदाहरणं आहेत. एखाद्याचा मित्र/मैत्रीण परदेशात अडचणीत असेल तर त्याबद्दलची माहिती फेसबुकवर पोस्ट केली जाते. यामुळे एकाच वेळी अनेकांना त्यांच्या समस्येविषयी समजतं. शिवाय त्यापैकी अनेक जण मदतीस पुढे सरसावतात. मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडिया अशांचा चांगला आणि महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापर नक्कीच केला जाऊ शकतो. आणि बरेच लोक याचा अशा प्रकारे वापर करतातही. त्यामुळे मोबाइल वाईटच कसा असं एकतर्फी बोलणं उचित ठरणार नाही. त्याचा अतिरेक झाला की त्याचे दुष्परिणाम दिसून येतातच. आणि हे दुष्परिणाम जीवावर बेतणारेही ठरले आहेत. गेल्या वर्षभरात गाडी चालवताना मोबाइलचा वापर करणाऱ्यांच्या मृत्युचा आकडा वाढतच चालला आहे. मुंबईत लोकल ट्रेनचा ट्रॅक मोबाइलवर बोलत, ऐकत ओलांडणारे इतके आपल्याच नादात असतात की ट्रेनसारखं धूड अंगावर आलेलंही त्यांना समजत नाही. अशा अपघातांच्या संख्येतही अलीकडे वाढ झाली आहे.

मोबाइलच्या अतिवापरावरून मुलांना बोलणाऱ्या पालकांना मुलं मोबाइलवरही अभ्यास करत असतात हे पटत नाही. त्यांना मोबाइलवर अभ्यास करणं ही संकल्पना माहीतच नसते. मोबाइलवर अभ्यास म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप, हाइकच्या माध्यमातून नोट्स एकमेकांना शेअर करणं, एखाद्या प्रोजेक्टबद्दल चर्चा करणं, एखादं लेक्चर समजलं नसलं तर ते त्याबद्दल समजावून घेणं वगैरे. पण ही संकल्पना पालकांना फारशी पटत नसल्यामुळे पालक-मुलांमध्ये होणारं द्वंद्व घरोघरी बघायला मिळतं. या निमित्ताने अभ्यासाचं स्वरूप बदलतं चाललंय हे लक्षात घ्यायला हवं.

गेल्या काही दिवसांपासून ‘नो मोबाइल डे’ अशी एक संकल्पना ठिकठिकाणी सुरू झाली आहे. पण मुळात अशी संकल्पना सुरू करावी लागणं हेच वाईट लक्षण आहे. कारण म्हणण्याइतपत मोबाइलचा वापर अति झालाय आहे, हे नाकारता येणार नाही. यामध्ये दोन टोकाच्या भूमिका आहेत. एक म्हणजे मोबाइलचा अजिबातच वापर नाही आणि दुसरा म्हणजे मोबाइलचा अतिवापर. पण या दोन्ही टोकाच्या भूमिका चुकीच्या आहेत. सर्व गोष्टींचं तारतम्य ठेवून सुवर्णमध्य गाठणं महत्त्वाचं आहे. पूर्वी शाळेच्या परीक्षेत हमखास  ‘विज्ञान शाप की वरदान’, असा निबंधासाठी विषय असायचा. शाळांमध्ये यावर अनेकांनी निबंधही लिहिले असतील. पण विज्ञान, तंत्रज्ञान त्यांचं काम करतं. त्यातून किती आणि घ्यायचं हे प्रत्येकावर अवलंबून आहे. कुटुंबातील चारही जण जर आपापल्या कामात व्यग्र असतील, त्यांच्यात संवाद होत नसेल, एकत्र एका वेळी घरात असतानाही आपापल्या मोबाइलमध्ये डोकं असेल, एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय हेच माहिती नसेल तर त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात, याचा त्यांना अंदाज यायला हवा. मोबाइल हा माणसाचा अवयव नसून त्याची काही कामं सोपी करणारं एक तंत्रज्ञान आहे. त्याला यंत्रासारखंच वागवलं पाहिजे, याचं भान बाळगायची आज गरज निर्माण झाली आहे.

फेसबुकवर मैत्री करताना सावधान..!

फेसबुकवरच्या मैत्रीचे अनेक बरे-वाईट किस्से आहेत. फेसबुकवरच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना आपण कधी भेटलेलो असतोच असं नाही आणि भविष्यात कधी भेटण्याची शक्यता असते असंही नाही. हे ‘फेसबुक फ्रेण्ड्स’मध्ये मोडतात. पण फेसबुकवर मैत्री करताना नेहमीच चांगले अनुभव येतात असं नाही. फेसबुकचा गैरफायदा घेणारे असंख्य लोक आहेत. विक्रोळीत राहणाऱ्या एका मुलीची एका मुलाशी फेसबुकद्वारे ओळख झाली. मैत्री झाली. त्याने एका वेगळ्या नावाने रिझव्‍‌र्ह बँकेकडून मेल पाठवला आणि एक फॉर्म भरून राजस्थान आणि दिल्लीच्या एका बँक खात्यात साडेआठ लाख रुपये भरण्यास तिला सांगितले. तिने त्याच्या म्हणण्यानुसार बँकेत पैसे भरले. मात्र तिने पैसे भरताच त्याचा फोनही बंद झाला आणि त्याचे फेसबुक अकाऊंटही गायब झाले. आणखी एक उदाहरण एका फॅशन डिझायनर असलेल्या तरुणीचं. एका अनोळखी व्यक्तीशी फेसबुकवर ओळख झाली. मोबाइल चॅटिंग, मैत्री, ब्लाइंड डेटिंग याचं रूपांतर प्रेमात झालं. एक वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर त्या मुलाने तिला लग्नाचे आमिष दाखवले. दरम्यान, तो त्या मुलीला ठाणे आणि वाशी परिसरातील लॉजवर नेऊन तिचा गैरफायदा घेऊ लागला. त्या वेळी तिच्या ते लक्षात आलं नाही. मात्र त्यानंतर काही दिवसांनी तो तिला टाळू लागला. तिची फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आल्यावर तिने त्याच्याविरुद्ध तक्रार केली. ही फसवणूक फक्त प्रेमसंबंध, लैंगिक अत्याचार इथवर राहत नाही; तर व्यवसायातही फेसबुकच्या माध्यमातून फसवणूक केली जाते. एका व्यापाऱ्याला अशाच एका अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणे महागात पडले. हा व्यापारी व्हिक्टोरिया केटरशी फेसबुकच्याद्वारे संपर्कात आला होता. भारतातील अक्रोड खरेदी करण्यावरून तिने त्या व्यापाऱ्याची फसवणूक करून त्याच्याकडून १ कोटी ८० लाख लुबाडले. ही उदाहरणं सांगण्याचं कारण हेच की मोबाइलच्या अतिवापरात फेसबुकचा अतिवापरही येतो आणि अशा वेळी फ्रेण्ड रिक्वेस्ट येणाऱ्या सगळ्यांना अनेक जण सरसकट अ‍ॅड करतात. तसंच फ्रेण्ड् लिस्टमधला फ्रेण्डचा आकडा वाढावा या स्पर्धेपायी अनेकांची चुकीच्या व्यक्तीला अ‍ॅड करण्याची चूक घडते आणि तीच चूक नंतर महागात पडते.

तुमचं मूल इंटरनेट अ‍ॅडिक्ट आहे कसं ओळखाल?

तुमचं मूल त्याच्या वास्तवातल्या मित्रांपेक्षा ऑनलाइन मित्रांसोबत जास्त मिसळत असेल तर..

ते ऑनलाइन असताना अडथळे आल्यास त्याची चिडचिड होत असेल  तर..

पूर्वी त्याला रस असलेल्या गोष्टींमध्ये आता अजिबात रस वाटत नसेल तर..

त्याच्या इंटरनेट वापराबद्दल तो अतिशय गुप्तता पाळत असेल..

कुटुंब, मित्रपरिवारासोबत फार वेळ घालवत नसेल तर..

मोबाइल वापरणारे म्हणतात…

मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. व्यवसाय, नोकरी, काम, अभ्यास, चॅटिंग, सर्फिग अशी मोबाइल वापरण्याची वेगवेगळी कारणं असतात. पण त्याचा अतिवापर केला की त्याचे परिणामही लगेच दिसून येतात. म्हणूनच मोबाइल वापरकर्त्यांकडूनच मोबाइल अ‍ॅडिक्शन म्हणजे काय, ते मोबाइल किती आणि कशासाठी वापरतात याविषयी जाणून घेतलं.
संकलन : राधिका कुंटे

01-lp-reactionआता फारसं कौतुक नाही.
मोबाइलचं अ‍ॅडिक्शन अधिकांश मुलांमध्ये दिसतं. नवीन माहिती मिळवण्यासाठी, गेम्ससाठी मुलं त्याला चिकटलेली असतात. शॉर्टकट सगळ्यांना आवडतो. अपडेट सगळ्यांना राहायचं असतं म्हणून मग मोठय़ांनाही मोबाइल आवडतोच. मध्यंतरी मला व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकचं थोडं अ‍ॅडिक्शन झालं होतं. त्यामुळे मी ते इन्स्टॉल केलं होतं. आता मात्र त्याचं कौतुक उरलं नाही. कधी कधी त्याचा कंटाळाही येतो. मध्यंतरी पुन्हा एकदा पाच-सहा दिवस बंदच ठेवलं होतं. वायफाय नसल्याने नेटपॅक पुरवून वापरते. नेटपॅक झोपण्यापूर्वीच आठवणीने बंदही करते.
– रश्मी रानडे, गृहिणी

02-lp-reactionदहावीच्या अभ्यासात अ‍ॅप्सचा उपयोग
मोबाइल अ‍ॅडिक्शन म्हणजे फक्त गेम्स खेळणं नाही. अभ्यास किंवा दुसरी कामं असली तरीही काही वेळा सतत मोबाइल चेक करावासा वाटतो. सेल्फीचं वेड लागू शकतं. माझ्या फोनमध्ये एकही गेम नाही, पण सोशल मीडियावर मेसेज आले नाहीत तर काही वेळा पुन्हा चेक करते. फोटो-व्हीडिओज पुन्हा पाहते. यूटय़ूबवर काही मालिकांचे रिपिट एसपिसोड पाहते. कुकिंगचे, गाण्याचे व्हिडीओज बघते. मी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर आहे. इन्स्टाग्राम सध्या अनइन्स्टॉल केलं आहे. फेसबुक लाइव्हाचं फॅड वाढताना दिसतंय. त्यामुळं आपले कलागुण इतरांपर्यंत पोहोचू शकतात आणि त्याचा करिअरला उपयोग होऊ शकतो. दहावीच्या अभ्यासाठी मला अ‍ॅप्सचा चांगला उपयोग झाला. सध्या मी फक्त वायफायच वापरत आहे. पण आता कॉलेजसाठी प्रवास सुरू होईल, तर वेळप्रसंगी नेटपॅकचा उपयोग होईल.
– रिद्धी जोगळेकर

03-lp-reactionमोबाइलच नाही…
मोबाइलचं अ‍ॅडिक्शन म्हणजे सतत मोबाइलवर राहून इतर गोष्टींवरचं लक्ष उडणं, घरच्यांशी संवाद कमी होणं, अभ्यासात लक्ष न लागणं. माझ्याकडे अजून स्वत:चा मोबाइल नाही. मला त्याची आवड नाही. तो जास्त वापरू नका, असं आमच्या शिक्षकांचं म्हणणं होतं. माझं फेसबुक अकाऊंट आहे, पण ते लॅपटॉपवरून बघतो. आता कॉलेजला गेल्यावर क्लासच्या वेळांच्या अपडेटसाठी घ्यावाच लागला तर मोबाइल घ्यावा लागेल.
– सोहम गावडे

04lp-reactionगेम्स खेळायला आवडतं…
सतत गेम खेळणं म्हणजे मोबाइल अ‍ॅडिक्शन. सतत माहिती मिळवत राहणं. नवीन पिढी त्याबाबतीत हुशार आहे. मी दुपारी फावल्या वेळात थोडा वेळ गेम खेळते. तो ऑफलाइन असतो. कामानिमित्त केलेल्या प्रवासातही गेम्स खेळते. नेटपॅक न वापरता वायफायच वापरते. युटय़ूबवर रेसिपीज, लेटेस्ट फॅशन डिझाइिनगसंबंधी व्हिडीओज आवर्जून बघते.
– संपदा सुर्वे,

05-lp-reactionफक्त सोशल कनेक्टिव्हिटीसाठी…
स्वत:चं कामधाम विसरून मोबाइलच्या मागं लागणं म्हणजे मोबाइल अ‍ॅडिक्शन. ते वाईटच आहे. मी एवढी मोबाइलवर नसते. मी व्हॉट्सअ‍ॅपवरही फारशी नसते. त्याचे अपडेट्सही फारसे करत नाही. माझ्या टूरच्या व्यवसायापुरताच जुजबी वापर करते. कारण व्यवसायासाठी सोशल कनेक्टिव्हिटी हवीच असते. बाहेरगावी गेल्यावर नेटपॅक लागतोच. पण एरवी वायफायचाच वापर अधिक होतो. रात्री ठरवून वायफाय बंद करून झोपते. एरवी फावल्या वेळात इतरांच्या संपर्कामध्ये राहण्यासाठी पाहिलं जातं.
– शिवानी देशपांडे, पर्यटन व्यावसायिक

06-lp-reactionगरजेपुरताच फोन…
मोबाइल अ‍ॅडिक्शन म्हणजे सतत अपडेट राहणं. मी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम वापरते. इंटरनेट सर्फिगसाठी वायफाय आणि नेटपॅक असं दोन्ही वापरते. अभ्यासातून वेळ मिळेल तेव्हाच फोन पाहते. साधारणपणे दिवसभरात दोन-चार वेळा पाहते. मी फोनशिवाय राहू शकते. गरजेपुरताच फोनचा वापर नक्कीच करू शकते.
– वैष्णवी पडवळ, एसवाय लॉ

07-lp-reactionअ‍ॅप्स बघतही नाही…
काही ना काही कारणांमुळे सतत मोबाइल पाहणं म्हणजे मोबाइलचं अ‍ॅडिक्शन. मला मोबाइल अ‍ॅडिक्शन नाही. काही वेळा मी दोनचार दिवस अ‍ॅप्स बघतही नाही. मी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक वापरतो. वायफाय आणि नेटपॅक अशा दोन्हींचा वापर करतो. दहावीचा अभ्यास करताना ठरवून तासभरच बघायचो. आताही थोडा वेळ पाहिलं जातं. कधी कधी फोन चेक करावा असं वाटतं, पण तेव्हा फोन पाहिलाच जातो असं नाही.
– स्वप्निल दामले

08-lp-reactionव्यवसायापुरताच मोबाइल
मोबाइलला अगदी चिकटलेलं असणं म्हणजे मोबाइल अ‍ॅडिक्शन. मी मोबाइल वापरतो तो व्यवसाय, फॅमिली आणि सोशल लाइफपुरतंच. फोनशिवाय मी राहू शकणार नाही, असं नाही. मी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम वापरतो. व्यवसायापुरतं साधारण दहा तास आणि एरवी दिवसभरात दीड तास मोबाइल पाहातो. माझ्या घरी असलेलं वायफाय मी वापरतो. बाहेरगावी जातानाच मोबाइलमध्ये नेटपॅक टाकून तो वापरतो.
– जोनाथन नागावकर, टीवायबीकॉम

गॅजेट हायजिन हा प्रकार प्रत्येकाने अंगी बाळगायला हवा. मोबाइल वापराचे तास कमी करणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे मोबाइलच्या अ‍ॅडिक्शनपासून तुम्ही वाचू शकता. झोपताना मोबाइल बाजूला असणं चुकीचं आहे. तो तुमच्या झोपेच्या चक्रात अडथळा बनू शकतो. जेवताना मोबाइल वापरू नये. त्याचा परिणाम तुमच्या मानसिक आणि शरीरिक बाबींवर होऊ शकतो. बाथरुममध्ये फोन घेऊन जाणं टाळा.
– डॉ. हरीश शेट्टी, मानसोपचारतज्ज्ञ

मोबाइल अतिवापराचे परिणाम :
मानदुखी, डोकेदुखी, पाठदुखी, टेनिस एल्बो, खांदा दुखणं, बोटं दुखणं, सुजणं, स्टीफ राहणं, पाठीच्या कण्याचा त्रास

मोबाइल अतिवापराचे टोकाचे परिणाम:
दारूच्या अधीन होणं, झोपेच्या गोळ्या खाणं, आत्महत्येचा प्रयत्न करणं, नैराश्य येणं
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com