निमित्त
विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

रोबोवॉर्स, ड्रोन चॅलेंज आणि फुल थ्रॉटल रेसिंगमध्ये सुरू असलेली रस्सीखेच; थेस्पिअन, आइनस्टाइन रोबो पाहण्यासाठी लागलेल्या लांबलचक रांगा; कुठे नृत्य, संगीताचा दणदणाट तर कुठे देश-विदेशातील मान्यवरांच्या अभ्यासपूर्ण चर्चा.. ‘टेकफेस्ट २०२०’मुळे आयआयटी बॉम्बेचा परिसर गजबजला होता. सगळीकडेच उत्सुकतेने भरलेल्या विविध वयोगटांतील व्यक्तींची गर्दी लोटली होती. दहशतवादी हल्ला असो, शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे असो, बॉम्ब ठेवल्याची धमकी असो वा लिफ्टमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढणं.. बुद्धिमत्तेच्या जोरावर कोणत्याही संकटाशी दोन हात करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा विश्वास तिथल्या ‘टेक्नोकनेक्ट’ प्रदर्शनात दिसून आला. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली विविध उपकरणं पाहण्यासाठी, त्यांचा प्रत्यक्ष आयुष्यातील वापर आणि कार्यप्रणाली जाणून घेण्यासाठी उत्सुक व्यक्तींची या प्रदर्शनात गर्दी झाली होती.

मिशन क्रिटिकल सव्‍‌र्हर

एखाद्या ठिकाणी हल्ला झाला किंवा दुर्घटना घडली की पोलीस, दहशतवादविरोधी पथक, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक अशा विविध यंत्रणांना स्वतंत्रपणे सूचना द्याव्या लागतात. त्यात जाणारा वेळ आणि त्यामुळे वाढणारं नुकसान टाळण्यासाठी या सर्व यंत्रणांना एकाच वेळी सावध करू शकेल, असं तंत्र आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलं आहे. यात एका अतिशय सुरक्षित सव्‍‌र्हरद्वारे एकाच वेळी विविध यंत्रणांशी संपर्क साधला जाईल. ज्या यंत्रणेला सर्वात आधी घटनेची माहिती मिळेल ती यंत्रणा इतर यंत्रणांना सावध करेल. काही वेळा एखाद्या ठिकाणी दुर्घटना घडल्यावर इंटरनेट, फोन अशी सर्व संपर्कसाधनं बंद ठेवावी लागतात, तर काही वेळा अशा सुविधाच घटनास्थळी नसतात. अशा वेळी सुरक्षा यंत्रणांसाठी खास दिल्या गेलेल्या फ्रिक्वेन्सीच्या साहाय्याने या सर्व यंत्रणांशी संवाद साधला जाईल. त्यासाठी ‘रॅपिडली डिप्लॉएबल बेस स्टेशन’चाही पर्याय देण्यात आला आहे. हे बेस स्टेशन वाहनावरून किंवा अगदी एखाद्या बॅकपॅकप्रमाणे पाठीवरूनही वाहून नेता येईल. दोन किलोमीटपर्यंतच्या परिघात संपर्क साधण्याची क्षमता त्यात असेल. सध्या यात ६४ व्यक्तींशीच संपर्क साधण्याची सुविधा आहे, ती प्रत्यक्ष वापराच्या वेळी वाढवता येईल. पोलीस, हवाई दल, बचाव पथक, अग्निशमन दल अशा कोणत्याही यंत्रणांना एकमेकांशी संपर्क साधता येईल. संपूर्ण देशभरासाठी एकच फ्रिक्वेन्सी दिल्यास हे काम आणखी सक्षमपणे करता येईल, असं या प्रयोगातून सुचवण्यात आलं आहे.

गुप्तहेर रोबो

काही वेळा धोक्याची सूचना मिळाली तरी घटनास्थळाची स्थिती जाणून घेण्यासाठी पोलीस किंवा इतर सुरक्षा यंत्रणांना तिथे पाठवणं सुरक्षित नसतं. अशा वेळी त्या ठिकाणची माहिती देण्याचं काम करू शकेल असा स्फेरिकल रोबो म्हणजेच गोल आकाराचा रोबो आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. या पारदर्शी गोलात कॅमेरा आणि इतर सेन्सर आहेत. कॅमेरा ३६० अंशांतील म्हणजे सर्व दिशांचे थ्रीडी नकाशे दाखवू शकतो. ज्याच्या आधारे नेमक्या कोणत्या भागात धोकादायक वस्तू आहे किंवा ओलीस ठेवलेल्या व्यक्ती कोणत्या खोलीत आहेत, याची माहिती मिळू शकते. या रोबोवर दुरून नियंत्रण ठेवता येऊ शकतं. त्यासाठी एक अ‍ॅप तयार करण्यात आलं आहे. त्याद्वारे रोबोला दिशा देता येते. त्याने पाठवलेले नकाशेही अ‍ॅपवर पाहता येऊ शकतात.

हुशार कॅमेरा

सीसीटीव्ही कॅमेरे आता जागोजागी दिसतात. पण दुर्घटना घडल्यानंतर लांबलचक फूटेज तपासून त्यातून संशयितांना शोधून काढण्याचं डोकेदुखीचं काम माणसांनाच करावं लागतं. गर्दीतल्या व्यक्तींच्या संशयस्पद हालचाली टिपण्यासाठी ‘कॅमेरा इंटेलिजन्स’ आणि ‘पर्सन रीआयडेंटिफिकेशन अँड ट्रॅकिंग’ ही तंत्रं आयआयटीतल्या विद्यार्थ्यांनी विकसित केली आहेत. यात एखद्या ठिकाणी एखादी व्यक्ती वारंवार घिरटय़ा घालत असल्यास किंवा एखाद्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद असल्यास त्या व्यक्तीच्या प्रतिमेभोवतीही वेगळी चौकट दाखवली जाते. या तंत्रामुळे संशयिताला ओळखण्याचं काम झटपट होऊ शकेल.

श्वानाच्या पाठीवरचा कॅमेरा

सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणी हल्ला झाल्यास तिथे नेमकं काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा काहीही मार्ग नसतो. काही वेळा अशा ठिकाणी पोलीस किंवा सैन्य दलाच्या जवानांनी जाणंही सुरक्षित नसतं. अशा ठिकाणची दृश्यं मिळवण्यासाठी हा कॅमेरा तयार करण्यात आला आहे. प्रशिक्षित श्वानाच्या पाठीवर हा कॅमेरा लावून त्याला संबंधित ठिकाणी सोडल्यास त्या ठिकाणची दृश्यं मिळवता येतात. काही विशिष्ट ध्वनींच्या साहाय्याने त्याला दिशा दाखवली जाते. झाडंझुडपं, इमारती, काँक्रीटच्या भिंतीपलीकडचीही दृश्यंही या कॅमेराद्वारे मिळतात.

लिफ्टमधील ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाइस

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे लोक लिफ्टमध्येच अडकून पडण्याच्या आणि गुदमरण्याच्या घटना अनेकदा घडतात. अशा वेळी कोणतंही बटन न दाबता लिफ्टला जवळच्या मजल्यावर पोहोचवेल, असं उपकरण प्रदर्शनात मांडण्यात आलं होतं. ही सर्व प्रक्रिया आपोआप होईल, लिफ्टमधल्या व्यक्तीला, लिफ्टमनला किंवा कोणालाही त्यासाठी काही गरज नसल्याचा दावा आहे.

तेल का तेल, पानी का पानी

जहाजातून तेलगळती झाल्यास त्याचा थर समुद्रातल्या पाण्यावर निर्माण होतो. त्यामुळे समुद्र प्रदूषित होतो आणि त्याचे अनेकदा जलचरांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. अशा वेळी तेल आणि पाणी वेगळं करण्याची क्षमता असलेलं यंत्रही विद्यार्थ्यांनी तयार केलं आहे.

थेस्पिअन आणि आइनस्टाइन

अंधारलेल्या स्टेजवर पडलेल्या प्रकाशझोतात, रोबो थेस्पिअनने ‘नमस्ते इंडिया’ म्हटलं आणि खचाखच भरलेल्या सभागृहातून प्रतिसादाचा दणदणीत सूर उमटला. हात उंचावून, थँक्यू म्हणून थेस्पिअनने या कौतुकाचा स्वीकार केला. आपलं वजन अवघं ३३ किलो असल्याचं त्याने सांगितलं. त्याच्या अभिनयाला, नृत्याला आणि त्याने गायलेल्या गाण्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. शाहरूख खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे बॉलीवूडमधले आवडते कलाकार असल्याचं आणि चिट्टीची भूमिका साकारायला आवडलं असतं, असं रोबोने सांगताच प्रेक्षकांतून उत्साही चित्कार उमटले. ब्रिटनहून भारतात आलेल्या या रोबोला पाहण्यासाठी लोक तासभर रांगेत उभे होते. ३० भाषांत आणि विविध आवाजांत संवाद साधू शकणारा, गाण्याची आणि नृत्याची क्षमता असलेला हा रोबो वाणीदोष असणाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी उपयुक्त ठरू शकतो. मनोरंजन आणि विविध रोबोटिक्स प्रदर्शनांमध्येही त्याचा उपयोग केला जातो.

हाँगकाँगमधील ‘हॅन्सन रोबोटिक्स लिमिटेड कंपनी’ने तयार केलेला आणि आइनस्टाइनप्रमाणे दिसणारा रोबो पाहून प्रेक्षक अवाक् झाले. याआधी २०१७मध्ये त्याची बहीण म्हणून ओळखली जाणारी रोबो सोफिया भारतात आली होती. आइनस्टाइनची गणिती आकडेमोड करण्याची क्षमता आणि तर्कशक्ती अफाट आहे. सध्या तो माणसाने प्रोग्राम केल्याप्रमाणे वागत बोलत असला, तरी लवकरच तो स्वत स्वतला प्रोग्राम करण्याची क्षमता मिळवू शकेल, अशी माहिती त्याने दिली. ‘ज्याच्यावरून माझं नाव पडलं आहे, तो आइनस्टाइन जेव्हा बर्गर खायचा तेव्हा एक मेगाबाइट खाल्ला,’ असं म्हणायचा, या त्याच्या वक्तव्यावर प्रेक्षकांत हशा पिकला.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर, माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेश गांधी, खासदार सुरेश प्रभू, नोबेल पुरस्कार विजेते एरिक स्टार्क मस्किन, अभिनेत्री विद्या बालन, इस्रोच्या गगनयान मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या व्ही. आर. ललितांबिका, इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायणमूर्ती, माजी क्रिकेटपटू झहीर खान अशा मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. रोबो वॉरमध्ये १० देशांतले ६० संघ सहभागी झाले. भारतातली पहिली एअरटॅक्सी असलेली एअरोहंस हेदेखील या महोत्सवाचं महत्त्वाचं आकर्षण ठरलं. महोत्सवात नव्या कल्पना आणि तंत्रांना व्यासपीठ मिळालं.