डॉ. किशोर कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com

पर्यावरणाच्या बाबतीत आपण कितीही म्हटले, की आम्ही असे करतो, तसे केले; परंतु तरीही पर्यावरण कामगिरीत आपण नापास झालो आहोत. भारताला पर्यावरण सुस्थितीत ठेवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील असे दिसते. पर्यावरण कामगिरीबाबत (ईपीआय-२०२०) भारत जगातील १८० देशांच्या यादीत १६८ व्या स्थानी आहे. अमेरिकेतील येल विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणात भारताला हे स्थान मिळाले आहे. पर्यावरण सुस्थितीत ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजना, सुरू असलेले प्रयत्न आणि भविष्यकालीन पर्यावरणीय योजना याआधारे हा पर्यावरणीय कामगिरी सूचकांक प्रकाशित केला आहे. येल विद्यापीठ कोलंबिया विद्यापीठाच्या साहाय्याने व वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मदतीने दर दोन वर्षांनी हा सूचकांक प्रकाशित करते. अशा प्रकारची सूचकांक पद्धत २००२ साली सुरू करण्यात आली. २०२० च्या सूचकांकाप्रमाणे डेन्मार्क प्रथम स्थानावर असून त्याने ८२.५ गुण मिळवले आहेत. २०१८ च्या सूचकांकाप्रमाणे भारत त्या वेळी १७७ व्या स्थानी होता. या वेळी १६८ व्या स्थानी आहे. २०२०च्या सूचकांकात दक्षिण आशियातील देशांत भारताप्रमाणेच अफगाणिस्थानचा क्रमांकही खूप खाली आहे. तो १७८ व्या स्थानी आहे. मात्र पर्यावरण कामगिरीच्या बाबतीत भूतान(१०७), श्रीलंका(१०९), मालदीव(१२७), पाकिस्तान (१४२), नेपाळ (१४५) आणि बांगलादेश (१६२) यांचे स्थान बरेच वरचे आहे. भूतान आशिया खंडात प्रथम क्रमांकावर आहे. ३२ पर्यावरणीय निकषांवर कामगिरीचे मूल्यमापन करून हे क्रमांक देण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लिहिले आहे की, देशांनी पर्यावरण समस्या किती चांगल्या पद्धतीने हाताळल्या हे ईपीआय सूचकांक विशद करतो. अर्थात सर्वच देशांसमोर या समस्या होत्या; परंतु ज्यांनी या समस्या किंवा प्रश्न यशस्वीपणे सोडवले त्यांना चांगला सूचकांक मिळाला. ३२ निकषांतील गुणांची सरासरी काढली जाऊन त्याआधारे क्रमवारी निश्चित करण्यात आली. सरासरीत भारताला १०० पैकी २७.६ गुण मिळाले. जर वेगवेगळ्या मापदंडांची आकडेवारी पाहिली तर भारताची स्थिती अधिकच दयनीय आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास वायू गुणवत्तेत भारताला १३.४ गुण मिळाले आणि त्याचा सूचकांक आहे १७९. या क्षेत्रात भारतापेक्षा वाईट कामगिरी केवळ पाकिस्तानची आहे. गेल्या १० वर्षांतील या क्षेत्रातील कामगिरी पाहता भारताला उणे गुण (निगेटिव्ह स्कोअर) दिले गेले होते. वायू गुणवत्तेत भारताची इतकी वाईट कामगिरी का होती, याचे उत्तर दिल्लीतील प्रदूषणात दडलेले आहे. हिवाळ्यात दिल्लीबरोबरच अनेक ठिकाणी वायू प्रदूषण एवढे वाढले होते की, लोकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. दिल्लीत क्रिकेटचा सामना खेळवला गेला तेव्हा काही खेळाडूंनी मास्क घालूनच सराव केला आणि काही खेळाडूंनी प्रत्यक्ष सामन्यातदेखील मास्क घातला होता, हे आपल्याला आठवत असेल. पर्यावरणीय स्वास्थ्य या मापदंडाप्रमाणे भारताचा सूचकांक आहे १७२ व गुण १६.३. वातावरणातील तरंगते कण म्हणजेच २.५ पीएम या निकषावर भारताचा सूचकांक १७४ व गुण १०.९ आहेत. पाकिस्तान वगळता दक्षिण आशियातील ८ देशांची कामगिरी भारतापेक्षा सरस आहे. येल विद्यापीठाने स्पष्ट केले की, सूचकांक निश्चिती पीएम २.५ मुळे दर वर्षीच्या मृत्युदरानुसार करण्यात आली आहे. स्वयंपाकघरातील प्रदूषणाच्या बाबतीत भारताची स्थिती त्यातल्या त्यात समाधानकारक आहे. यात भारताचा सूचकांक १२८ आहे. तरीही बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि अफगाणिस्थान आपल्यापेक्षा सुस्थितीत आहेत. वातावरणातील ओझोन प्रभावबद्दल बोलायचे झाल्यास भारत १७९ व्या स्थानी आहे. इतर देश त्या मानाने सुस्थितीत आहेत. भारत सरकारने मोठा गाजावाजा करत स्वच्छ भारत अभियान राबवले; परंतु स्वच्छता आणि स्वच्छ पाणी या बाबतीतही भारताची स्थिती फार काही आनंददायी नाही, असे खेदाने म्हणावे लागेल. भारत १३९ व्या स्थानी असून गुण मिळाले आहेत १९.४. नेपाळ, बांगलादेश, भूतान अफगाणिस्थान यांना भारतापेक्षा वरचे स्थान आहे. कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात त्यातल्या त्यात खूपच समाधानाची बाब आहे, परंतु तरीही वैश्विक स्तरावर पहिल्या १०० देशांत भारताला स्थान मिळालेले नाही, तिथे क्रमांक आहे १०३. हवामान बदलाच्या क्षेत्रातही भारत चांगल्या स्थितीत नाही. इथे भारताला १०६ वे स्थान प्राप्त झाले आहे व गुण आहेत ४५.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

आशिया खंडात एक पाकिस्तान सोडला तर इतर देशांच्या तुलनेत भारत सुस्थितीत आहे असे म्हणायला हरकत नाही. या शिवाय जैवविविधता, वन्यजीव सूचकांक, परिसंस्था सेवा, मत्स्य, कार्बन उत्सर्जन, कृषि, नायट्रोजन व्यवस्थापन, जलस्रोत, वृक्ष संवर्धन व संरक्षण, सागरी जीव संरक्षण इत्यादी क्षेत्रांत भारताची स्थिती चिंताजनक आहे. हवामान बदलाच्या क्षेत्रात तर भारताने खूपच निराशा केली, हे १० वर्षांच्या तुलनात्मक आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या अहवालाप्रमाणे ब्लॅक कार्बन, कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात सोडणे तसेच हरितगृह वायू मोठय़ा प्रमाणात वातावरणात सोडण्याचे वाढते प्रमाण यामुळे हवामान बदलाची स्थिती चिंताजनक झालेली आहे. या क्षेत्रात स्थिती सुधारायची असेल तर भारताला आपले प्रयत्न दुपटीने वाढवावे लागतील. ते करण्यासाठी आपल्या देशाला शाश्वत विकासाचे जे अनेक पैलू आहेत त्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. हवा व पाण्याचा दर्जा सुधारावा लागेल. पर्यावरणीय आरोग्याला प्राथमिकता द्यायला हवी. जी हवा  श्वासांद्वारे आपण आत घेतो तिचा दर्जा सुधारणे मुख्य काम आहे. पिण्याच्या स्वच्छ पाण्याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. सांडपाण्याचे व्यवस्थापन, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन या बाबी महत्त्वाच्या आहेत. येल विद्यापीठाने जसे ताशेरे ओढले आहेत अगदी तसेच ताशेरे सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हिरॉन्मेंट या दिल्लीस्थित संस्थेने आपल्या डाउन टू अर्थ या नियतकालिकाद्वारे त्यांच्या वार्षिक अहवालात ओढले आहेत. हवामान बदलाच्या बाबतीतील कामगिरी आठ निर्देशांकाद्वारे परीक्षित करण्यात आली.

दरडोई हरितगृह वायूंचे उत्सर्जन, हरितगृह वायूंचा वाढता दर, कार्बन डाय ऑक्साइडचे जमिनीवरून होणारे उत्सर्जन, चार हरितगृह वायू व एक प्रदूषक यांचा वाढता दर आणि उत्सर्जनाचा वाढता दर समायोजित करणे इत्यादी. अहवालात पुढे असे म्हटले आहे की काळा कार्बन, कार्बन डाय ऑक्साईड व हरितगृह वायू यांचे दरडोई उत्सर्जन गेल्या दहा वर्षांत बरेच वाढले आहे. त्यामुळेच हवामान बदलाच्या संदर्भात आपली कामगिरी २.९ गुणांनी घसरली आहे.

पर्यावरणीय कामगिरी सूचकांकामुळे पर्यावरणीय प्रश्न नेमके काय आहेत, पर्यावरणीय स्थिती आणि गती कोणत्या बाजूने जात आहे, इतर देश कशाप्रकारे समस्या हाळताहेत आणि योग्य योजनांची निवड करून त्या उपयोगात आणणे किती आवश्यक आहे, याचा अंदाज घेता येतो. उपलब्ध आकडेवारी आणि योग्य समीक्षण सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या योजनांत योग्य ते बदल करण्याची संधी प्राप्त करून देते. त्याच बरोबर ज्यांच्याकडून समस्यांचे निराकरण करून घ्यायचे असते त्यांना योग्य तो सल्ला आणि मार्गदर्शन करता येते. त्यामुळे पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी जी आर्थिक आणि वैचारीक गुंतवणूक केली जाते त्याची चांगली निष्पती होण्याची शक्यता जास्त असते. त्या दृष्टीने पर्यावरणीय कामगिरी सूचकांक एक मजबूत योजना आखण्यासाठी उपयुक्त आहे. ज्या योगे संयुक्त राष्ट्र संघाने नेमून दिलेले शाश्वत विकास ध्येय साध्य करणे सोयीचे होते आणि समाजाला एक शाश्वत भविष्य मिळवून देण्याच्या उद्देशाने एक पाउल पुढे उचलणे शक्य होते. एकंदरीतच पर्यावरणीय कामगिरी सूचकांक प्रत्येक देशाला आपल्या पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून कार्य करतो. आपण कु ठे  कमी पडतो, कुठे नव्याने सुरुवात करायची आहे, कुठे ज्यादा कुमक द्यायची हे याचा अंदाज प्रत्येक राष्ट्राला घेता येतो.

येल विद्यापीठाने हा जो अहवाल तयार केला त्या प्रकल्पाचे संचालक झ्ॉक वेंड्लिंग म्हणतात, कोणत्याही कार्यात उत्कृष्ट निकाल हवा असेल तर सुशासन हवे. निर्णय निर्णायक असणे व जनसामान्यांच्या फायद्याचे असणे गरजेचे आहे. योजना आखताना सर्वसामान्य माणसांच्या प्रतिनिधीचा आणि नि:पक्षपाती, जागरूक पत्रकारांचा समावेश असायला हवा. योजनेचा मसुदा काळजीपूर्वक आखायला हवा. योजनेतील उद्दिष्टे आणि कार्यक्रम यावर खुली चर्चा व्हायला हवी. या सर्वाची सांगड योग्य प्रकारे घालणारे सुशासन हवे.