मंजिरी कपडेकर – response.lokprabha@expressindia.com
हिवाळा विशेष

मस्त थंडीत उबदार कपडय़ांमध्ये स्वत:ला गुंडाळून घेऊन गरमगरम पदार्थ खाण्याची मजा काही औरच असते. त्यातही थंडीत गुळाचा वापर केलेले गोड पदार्थ जिव्हादेवींनाही हवे असतात आणि शरीराला पोषक आणि आरोग्यदायीही असतात.

उसाच्या रसातील पिठलं

साहित्य : उसाचा रस दोन वाटय़ा, रवाळ बेसन गरजेनुसार, लाल तिखट चार चमचे, मीठ चवीनुसार, दोन कांदे बारीक चिरलेले, एक हिरवी मिरची चिरलेली. फोडणीसाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद, तेल अर्धी वाटी.

कृती : कढईत तेल तापवा. त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा घाला. मिरच्या, हिंग, हळद, मिरची पावडर घाला. मग उसाचा रस घाला. उकळी आल्यावर नेहमीप्रमाणे पीठ घालून शिजवा. झाकून ठेवा. वाफ येऊ द्या. वरून कोथिंबीर घाला, भाकरीसोबत खायला द्या.

उसाची गुऱ्हाळं सुरू झाली की हे उसाच्या रसातील पिठलं किंवा झुणका केला जातो.

गोड, तिखट चवीमुळे खूपच छान लागतो.

कोल्हापूर परिसरातील हा पारंपरिक पदार्थ आहे.

गूळपापडी

साहित्य : गव्हाचे पीठ दोन वाटय़ा, साजूक तूप एक वाटी, गूळ दीड वाटी, डिंक अर्धी वाटी, बदाम- चारोळ्या आवडीनुसार.

कृती : कढईत तूप तापवा. त्यात गव्हाचे पीठ घालून छान भाजा. डिंक घाला. गूळ घाला. लागल्यास आणखी तूप घाला. पातळसर मिश्रण तयार होईल. तूप लावलेल्या ताटात ओता. वडय़ा कापा. गार झाल्यावर काढून ठेवा.

या वडय़ा चांगल्या टिकतात.

हा एक पांरपरिक पदार्थ आहे.

गुळाचा शिरा

साहित्य : रवा दोन वाटय़ा, गूळ दीड वाटी, पाणी पाच वाटय़ा, साजूक तूप एक वाटी किंवा गरजेनुसार, काजू बदामाचे काप, बेदाणे, चारोळे, वेलची पावडर.

कृती : कढईत चार चमचे तूप घाला. रवा भाजून घ्या. परत तूप घाला. गरम पाणी, गूळ घालून छान एकजीव करा. ड्रायफ्रुट्स घाला. राहिलेले तूप घाला. झाकून वाफ येऊ द्या. वेलची पावडर घाला.

रवा भाजण्याच्या आधी तुपात चार लवंगा घाला.

हा शिरा खूपच चविष्ट होतो.

चोंगे

साहित्य : गव्हाचे पीठ दोन वाटी, गूळ अर्धी वाटी, बडिशेपची जाडसर पावडर एक चमचा, सुंठ पावडर अर्धा चमचा, पाव चमचा मीठ, हळद पाव चमचा, भाजलेली खसखस, भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा कीस गरजेनुसार.

कृती : गुळात पाणी घालून विरघळून घ्या. गव्हाच्या पिठात बडीशेप, सुंठ पावडर, हळद, मीठ घालून एकत्र करा. गुळाचे पाणी घालून पीठ मळून घ्या.

चोंग्याच्या पोळपाटाला तेल लावा. त्यावर पिठाचा गोळा ठेवून लाटून घ्या. तव्यावर भाजून घ्या. खाली काढून त्यावर पातळ तूप घाला. त्यावर खोबरं, खसखस घाला, खायला द्या. आणखी गोड पाहिजे असल्यास त्यावर काकवी घाला.

चोंगे हा पदार्थ खूप जुना आहे. मोहरमला नैवेद्यासाठी केला जातो.

गूळ, हळीवाचे लाडू

साहित्य : खोवलेला ओला नारळ चार वाटय़ा, गूळ दोन वाटय़ा, हळीव अर्धी वाटी, सुंठ पावडर अर्धा चमचा, खारकेची पावडर अर्धी वाटी, डिंक, पावडर अर्धी वाटी, साजूक तूप चार चमचे.

कृती : हळीव भाजून पाण्यात भिजवून ठेवा. जाड बुडाच्या कढईत तूप घाला. त्यावर खोबरं घालून परतून गूळ घालून छान एकजीव करा. हळीव घाला. झाकून वाफ येऊ द्या. नंतर खारीक पावडर, डिंक पावडर, सुंठ पावडर घालून एकत्र करा.  एकसारखे परतून घ्या. गोळा होईपर्यंत शिजवा. गार झाल्यानंतर हाताला तूप लावून लाडू वळा.

या मिश्रणाच्या वडय़ाही करता येतात.

बाजरीचे उंडे

साहित्य : बाजरी चार वाटय़ा, गूळ गरजेनुसार, दूध गरजेनुसार, मीठ पाव चमचा.

कृती  : बाजरीला पाण्याचा हात लावून झाकून अर्धा तास ठेवा. नंतर मिक्सरमध्ये रवाळ फिरवून घ्या.

बाजरीचे जेवढे मिश्रण असेल त्याच्या निम्मे पाणी गरम करायला ठेवा. त्यात मीठ घाला. उकळी आल्यावर बाजरीचा रवा घालून छान एकजीव करा. झाकून वाफ येऊ द्या. नंतर काढून त्याच्या पोकळ वाटीसारखे उंडे करून चाळणीवर ठेवून मोदकाप्रमाणे वाफवून घ्या.

नंतर बोलमध्ये एक उंडा फोडून घ्या त्यावर दूध आणि गूळ घाला, खायला द्या.

शाकंभरी पौर्णिमेला हे उंडे करतात. हिवाळा असतो. बाजरी आणि गूळ शरीराला ऊर्जा देतात. ही रेसिपी अतिशय पौष्टिक आहे.

भोपळ्याच्या घाऱ्या

साहित्य : लाल भोपळ्याचा कीस चार वाटय़ा, गूळ दोन वाटय़ा, गव्हाचे पीठ दोन वाटी किंवा लागेल तसे, जायफळ पावडर, खसखस, तेल तळण्यासाठी, मीठ चवीनुसार

कृती : जाड बुडाच्या भांडय़ात लाल भोपळ्याचा कीस, गूळ घ्या. हे मिश्रण शिजवून घ्या. ते गार झाल्यावर त्यात जायफळ पूड, मीठ घाला. गव्हाचे पीठ घालून छान एकजीव करा.

नंतर प्लास्टिक पेपरवर किंवा केळीच्या पानावर लिंबाएवढा गोळा ठेवून थापून घ्या. वरून खसखस लावा. तेलात तळून घ्या.

या घाऱ्या गार किंवा गरम कशाही छान लागतात.

लाल भोपळा, गूळ, गव्हाचे पीठ यामुळे घाऱ्या पौष्टिक होतात.

गूळपोळी

साहित्य : चिरलेला गूळ दोन वाटय़ा, सुक्या खोबऱ्याचा कीस एक वाटी, भाजलेलं बेसन अर्धी वाटी, सुंठ पावडर एक चमचा, जायफळ पावडर अर्धा चमचा

पारीसाठी – गव्हाचे पीठ एक वाटी, मैदा अर्धी वाटी, मीठ, तेलाचे मोहन.

कृती : पारीचे सर्व साहित्य एकत्र करा. पीठ मळून घ्या.

एक चपटा डबा घ्या त्यात निम्मा गूळ घाला. त्यावर एक चमचा पाणी घाला. त्यावर परत गूळ घाला. हा डबा बंद करून कुकरमध्ये ठेवा. एक शिट्टी घ्या. गार झाल्यावर काढून गूळ एकत्र करा. त्यात सुकं खोबरं, बेसन, जायफळ, सुंठ घालून एकजीव करा. गोळे करून घ्या. पिठाच्या दोन पाऱ्या करा. त्यात हा गोळा ठेवा बंद करून लाटून घ्या. तूप सोडून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.

गव्हाचे लाडू

साहित्य : गहू दोन वाटय़ा, बिया काढलेला खजूर एक वाटी, गूळ एक वाटी, तळलेला डिंक एक वाटी, किसलेलं सुकं खोबरं दोन वाटय़ा, भाजलेली खसखस पाव वाटी, साजूक तूप गरजेनुसार, वेलदोडे पावडर एक चमचा, जायफळ पावडर एक चमचा, काजू, बदाम बारीक तुकडे करून, अर्धी वाटी काळ्या मनुका, बेदाणे आवडीनुसार, गोडंब्या मिळाल्या तर पाव वाटी.

कृती : गहू कढईत घालून चांगले खमंग भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्सरवर वाटून घ्या. खजुराचे तुकडे करून मिक्सरवर जाडसर वाटून घ्या. काजू, बदाम बेदाणे, काळ्या मनुका, गोडंब्या सर्व साजूक तुपावर परतून घ्या. गव्हाच्या मिश्रणात सर्व साहित्य घाला. डिंक हातांनी चुरडून घाला. गूळ चिरून घाला. चांगले एकजीव करा. लागेल तसे साजूक तूप पातळ करून घाला. खोबऱ्याचा कीस हलकाच भाजून घाला. खसखस घाला. एकत्र करून लाडू बांधा.

हे लाडू अतिशय पौष्टिक होतात, चवीला छानच लागतात. हिवाळ्यात खाण्यासाठी खूपच चांगले आहेत.