बदलती समाजव्यवस्था, मूल्यव्यवस्था, मोबाइल, इंटरनेटसारखी माध्यमं या सगळ्याचा आजच्या कोवळ्या पिढीवर नेमका काय परिणाम होतो आहे, हे सांगणारी याच पिढीच्या मुलीनं अवघ्या सोळाव्या वर्षी लिहिलेली मराठीतली कादंबरी..

सोळा वर्षांच्या मुलीकडून काय अपेक्षा असते?

तिनं आनंदाने किलबिलत नाचावं-बागडावं, अभ्यास करावा, मित्र-मैत्रिणींमध्ये रमावं, पुढे काय करायचं याची स्वप्नं बघावीत..

पण याच वयात एखाद्या मुलीने चक्क कादंबरी लिहिली तर..

होय. असं घडलंय.

तिचं नाव आहे श्रुती आवटे, वय र्वष १६. ला शिकणाऱ्या श्रुतीने थोडीथोडकी नाही, तर सव्वाशे पानांची ‘लॉग आऊट’ नावाची कादंबरी लिहिली आहे आणि ती मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहे.

काय आहे या कादंबरीत?

सोळा वर्षांच्या मुलीच्या आयुष्यात घडू शकतं ते सगळं..

ही गोष्ट फक्त जान्हवी नावाच्या एका दहावीतल्या शहरी मुलीची नाही, तर ती आहे, तिचे आई-बाबा, तिचा दादा जयेश यांची. तिची मैत्रीण सई, मालविका, सुनीता, सुरेखा यांची. तिचे मित्र आयुष, समीर प्रतीक यांची. एका अर्थाने आज ज्या ज्या घरात पौगंडावस्थेतलं मूल आहे, त्या प्रत्येक घरातली, त्या प्रत्येक समाजातली. या कादंबरीमधली जान्हवी हुशार, समंजस अशी मुलगी. आईवडिलांवर, भावावर जिवापाड प्रेम करणारी, आपल्या मैत्रिणीच्या आयुष्यात काहीतरी गुंतागुंत झाली आहे हे लक्षात आल्यावर अस्वस्थ होणारी. जगण्याकडे आपल्या वयाच्या वकुबानुसार परिपक्वतेने बघणारी. घर, शाळा, अभ्यास, कविता हेच विश्व असलेली. थोडक्यात सांगायचं तर आनंदात जगणारी. संवेदनशील कुटुंबात, आई-वडील-दादाच्या प्रेमाच्या पालखीत वाढणाऱ्या जान्हवीच्या आयुष्यात पाऊल न वाजवता प्रेम येतं. तिच्या आसपास मित्रमंडळींमध्ये चाललेल्या फ्रेंडशिप-प्रेम वगैरे गोष्टींकडे परिपक्वतेने बघणारी जान्हवी आयुष या तिच्या मित्रात नकळत गुंतत जाते. सुरुवातीला मैत्रीचं रूप घेऊन आलेलं हे नातं हळूहळू एका विचित्र वळणावर जाऊन पोहोचतं आणि अतिशय विचारपूर्वक निर्णय घेऊन जान्हवी त्यातून बाहेर पडते; पण या सगळ्या दरम्यानच्या प्रवासात श्रुतीने कादंबरीत जो अवकाश भरला आहे, तो तिच्या वयाच्या तुलनेत खूपच परिपक्वता दाखवणारा आहे.

या कादंबरीचं महत्त्व अशासाठी की सोळा वर्षांच्या मुलीने तिच्या वयाची कादंबरी लिहिली आहे. तिच्या आसपासची पौगंडावस्थेतली मुलं-मुली, त्यांचं भावविश्व, त्यांचे नातेसंबंध, कुटुंबव्यवस्थेतले ताणतणाव, त्यांचा या मुलांवर होणारा परिणाम हे सगळं ती रेखाटत जाते. तिला त्यातून काही भाष्य करायचं आहे म्हणून नव्हे तर ते सगळं तिच्या आसपासचं वास्तव म्हणून कादंबरीत येतं. आईवडिलांचा घटस्फोट झाल्याने अस्वस्थ झालेली, बालपण हरवलेली, भटकटत जाणारी तिची मैत्रिण काय किंवा आईवडिलांच्य वितंडवादामुळे घराबाहेर भावनिक आधार शोधू पाहणारा आयुष काय, आजच्या समाजाचा आरसाच आहेत. ‘तू कुलकर्णी आहेस, तेव्हा अशी मार्काची भीक काय मागतेस’ असं शाळेतल्या बाई एका मुलीला ऐकवतात ते वाचून किती उघडय़ानागडय़ा स्वरूपात या वयातल्या मुलांपर्यंत समाजातल्या जातिव्यवस्थेचं वास्तव पोहोचतं आहे हे लक्षात येतं. या वयातल्या मुलांमध्ये असलेलं एकमेकांबद्दलचं तीव्र आकर्षण आणि दुसरीकडे शाळेत ‘पुनरुत्पादनावरचा धडा तुमचा तुम्हीच करा’ असं शिक्षकांनी मुलांना सांगणं यातून लैंगिक शिक्षणाचा किती बोऱ्या वाजलेला आहे हे लक्षात येतं. बालकवींची फुलराणीसारखी कविता शिकतानाही मुलांनी शिक्षकांची टर उडवत त्या कवितेकडे लव्ह स्टोरी म्हणून बघतात. त्याबरोबरच सिनेमा या घटकाचा मुलांवर होणारा परिणाम या कादंबरीतून समोर येतो. सगळ्यात मुख्य म्हणजे मोबाइलसारख्या संपर्कमाध्यमाने निर्माण केलेली प्रायव्हसी आणि व्यक्तीच्या खासगीपणावर केलेलं आक्रमण, त्याचा मुलांवर होणारा परिणाम, फेसबुकवरून जगाला सामोरी जाणारी पौगंडावस्थेतली मुलं आणि त्यांना येणारे अनुभव अशा अनेक गोष्टींना कवेत घेत श्रुतीने अगदी सहजगत्या जान्हवीची गोष्ट सांगितली आहे.

सगळ्यात पहिली गोष्ट ही, की फ्रेंडशिप, प्रेमप्रकरण, प्रेमभंग, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड हे सगळं आता कॉलेजमधल्या नव्हे, तर शाळेतल्या मुलांचं भावविश्व आहे, ही गोष्ट ही कादंबरी अतिशय सहजपणे मांडते. यात मुलामुलींमध्ये प्रेम व्यक्त करतानाचं अवघडलेपण तेच आहे, पण त्यात कुठेही चोरटेपण किंवा गिल्ट अजिबात नाही. ते आईवडिलांपर्यंत घेऊन न जाण्याचा सावधपणा आहे, पण एकमेकांमधला चोरटेपणा नाही. पंधराएक वर्षांपूर्वी ज्या गोष्टी कॉलेजच्या पातळीवर केल्या जात त्या आता शाळेच्या पातळीवर केल्या जातात हे एक प्रकारे धीटपणे पुढे येतं.

मनातला संघर्ष कागदावर मांडला

श्रुती पुण्यात राहते. सध्या ती बारावी सायन्स शिकते. तिला संगीत, अभिनय आणि नृत्याची आवड आहे. तिने अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘फॅन्ड्री’ तसंच ‘बावरे प्रेम’ या दोन सिनेमांमध्ये छोटय़ा भूमिका केल्या आहेत. शिवाय ती सध्या कथ्थक शिकते आहे. तुला एकदम कादंबरीच का लिहाविशी वाटली, या प्रश्नावर ती सांगते, कादंबरी लिहायची वगैरे असं काही डोक्यात नव्हतं. दहावीची परीक्षा झाल्यानंतर मी मोकळी होते. खूप काही सांगावंसं वाटत होतं. मी लहानपणापासून डायरी लिहायचे, कविता लिहायचे; पण त्यातून जे व्यक्त होत होतं, ते पुरेसं आहे, असं वाटत नव्हतं. शाळेत माझ्या आसपास जे घडत होतं, त्यामुळे मी खूप अस्वस्थ होते. मला सारखं वाटत होतं की, मला या सगळ्याबद्दल काही तरी म्हणायचं आहे, म्हणून मग जसंजसं वाटेल तसं तसं मी लिहीत गेले. ते आईबाबांना वाचून दाखवायचे; पण त्याची कादंबरी होईल असं मला कधीही वाटलं नव्हतं.

श्रुती सांगते, नववी-दहावीच्या काळात मी प्रचंड अस्वस्थ होते. शारीरिक, मानसिक बदल होत होते, त्यातून सांभाळलं जायचं नाही. मन एक सांगायचं, बुद्धी वेगळंच सांगायची. मनाला प्रेम, भिन्न लिंगी जोडीदार हवा असायचा. बुद्धी नको म्हणून सांगायची. सिनेमा बघून त्याचे वेगळेच परिणाम व्हायचे. या गोष्टी आपल्या आयुष्यात घडाव्यात असं वाटायचं. मोठी माणसं वेगळंच काही तरी बोलायची. हा सगळा माझा संघर्ष स्वत:शीच सुरू होता. मी जे पाहिलं, अनुभवलं त्यातूनच माझी जान्हवी उभी राहिली आहे. माझ्या आसपासचे, माझ्या वयाचे सगळे जणही त्याच फेजमधून जात होते. आपल्याला नेमकं काय हवंय, माणूस म्हणजे काय, प्रेमाचा शोध म्हणजे काय, या सगळ्यामधून झालेला संघर्ष मी मांडला आहे.

ती म्हणते, कादंबरी लिहून झाली आणि मला प्रचंड सुख जाणवलं. मला जे वाटत होतं ते लिहून मी मोकळी झाले होते. दुसरीकडे अजून काही तरी सांगायचंय ही हुरहुर होती. हे लिखाण घरच्यांना आवडलं. काही मोजक्या मित्रमंडळींना दाखवलं. त्यांना आवडलं. विश्राम गुप्ते, हरी नरकेसारख्यांनी लिखाण आवडल्याचं सांगितलं. मग घरच्यांनी ही कादंबरी प्रकाशित करू या असं ठरवलं; पण त्या प्रक्रियेत मी नव्हते. मला लिहायचं होतं ते लिहून मी मोकळी झाले आहे. आता कादंबरी प्रसिद्ध झाली आहे; पण आता यापुढे मी परत कादंबरीच लिहीन असं काही नाही. मला तीव्रतेने जे करावंसं वाटेल तेच मी करीन.

पौगंडावस्थेतल्या मुलामुलींच्या जगातलं सगळं काही या कादंबरीत आहे, असं म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती होणार नाही. मुलांनी एखाद्या मुलीला कुणावरून तरी चिडवणं, आयटम है यांसारख्या कॉमेंट्स करणं, कुणाचं कुणाशी चक्कर आहे, लाइन मारणं वगैरे चर्चा, आयुष नावाचा मुलगा जान्हवीला हळूहळू आपल्या प्रेमात पडायला भाग पाडतो, त्याच्यामुळे तिची होणारी घालमेल, त्यानं तिला जळवणं, आपल्यावर खरंच तिचं प्रेम आहे का हे चेक करण्यासाठी वापरलेले मार्ग, घरातली भांडणं सांगून सहानुभूती मिळवणं, फेसबुकवर मुलीच्या नावाने फेक अकाऊंट उघडून जान्हवीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, आपल्या मित्रांपासून लांब राहण्याचा सल्ला देणं, ती कुणा मुलाशी बोलत असेल तर त्याबद्दल विचारणं, बाहेर भेटण्यासाठीचं ब्लॅक मेलिंग आणि या सगळ्यातून अखंडपणे स्वत:शी संवाद साधणारी जान्हवी आपल्याला भेटते. जान्हवी एकीकडे हळूहळू आयुषमध्ये गुंतत गेली आहे आणि दुसरीकडे ती स्वत:लाच प्रश्न विचारते आहे, अस्वस्थ होते आहे. आयुषबद्दल वाटणारं आकर्षण आणि कुटुंबाबद्दलचं प्रेम या हिंदोळ्यावरचं तिचं मन हा संघर्ष यात येतो. मालविका या मैत्रिणीसाठी ती धडपडतेय, मैत्रिणीच्या बहिणीची प्रेमविवाहानंतरची अवस्था बघून तिला प्रेम नक्की काय असतं, असे प्रश्न पडताहेत. एकतर्फी प्रेमातून खून या बातमीने ती अस्वस्थ होते. जान्हवीचं मन अतिशय तरल आहे, ते आपल्या आसपास घडतं ते सगळं टिपकागदासारखं टिपत आहे आणि ते सगळं कवितांच्या रूपात व्यक्तही करतं. आपल्याला जे म्हणायचं आहे, ते म्हणण्यासाठी श्रुतीने केलेली अनुभवांची निवड आणि मांडणी पक्की आहे.

दहावीतला आयुष जान्हवीला जळवण्यासाठी फेसबुकवरून मुलीच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून जान्हवीच्या संपर्कात रहायचा प्रयत्न करतो, ही खरोखरच आजच्या पालकांसाठी डोळ्यांत अंजन घालू पाहणारी गोष्ट म्हणायला हवी. नववी-दहावीतल्या मुलांच्या हातात मोबाइल देताना, त्यांना फेसबुक वापरू देताना त्याचे पुढे जाऊन होऊ शकणाऱ्या परिणामांनाही सामोरं जाण्याची तयारी करून द्यायला हवी हे अप्रत्यक्षपणे ही कादंबरी सांगते. कारण आपण कशामध्ये अडकत चाललो आहोत आणि त्यातून बाहेर पडायला हवं, आयुष्यात काय करायला हवं, हे एखाद्या जान्हवीला समजू-उमजू शकतं, बाकी सगळयाच तितक्या सुदैवी असतील असं नाही.

आपल्या मुला-मुलींच्या भावविश्वात काय चाललं आहे, हे आजच्या पालकांना समजून घ्यायचं असेल तर त्यांनी ही कादंबरी वाचायलाच हवी.