08 July 2020

News Flash

विनोदाचा अस्सल बाज

स्वतंत्र भाषाशैली, मार्मिक व प्रासंगिक विनोदबुद्धी आणि पात्रांमधील विनोदी संवाद ही चतु:सूत्री सांभाळत लेखक बब्रुवान रुद्रकंठावर यांनी त्यांच्या हलक्या फुलक्या विनोदाने आपली स्वतंत्र ओळख विनोदाच्या...

| February 27, 2015 01:12 am

स्वतंत्र भाषाशैली, मार्मिक व प्रासंगिक विनोदबुद्धी आणि पात्रांमधील विनोदी संवाद ही चतु:सूत्री सांभाळत लेखक बब्रुवान रुद्रकंठावर यांनी त्यांच्या हलक्या फुलक्या विनोदाने आपली स्वतंत्र ओळख विनोदाच्या क्षेत्रात निर्माण केली आहे. या पुस्तकातील प्रत्येक कथेत दिसणारे विनोदी पात्र म्हणजे बबऱ्या! जो एक पत्रकार आहे. बबऱ्याने प्रत्येक कथेमध्ये आपल्या विनोदाचे वेगळेपण सांभाळले आहे. प्रत्येक लेखात त्याच्या भाषेतून लेखनाला व्यक्तिमत्त्व बहाल केले आहे. अनेक कथांमध्ये पत्रकाराची भूमिका बजावताना आपण मूर्ख आहोत असे समोरच्याला भासवत अनेकदा खऱ्याखुऱ्या मूर्खाच्या गंभीरपणे घेतलेल्या मुलाखतींचे वर्णन स्वत:च्या भाषेचा साज चढवत केले आहे. अनेक कथांमध्ये माणसाची मानसिकता आणि तिचे वैचारिक विश्लेषण केल्यामुळे कथा अधिक रंगत गेली आहे.

पॉवरफुल इमॅजिनेशन, प्रसंगावधानता आणि तडजोडीची तयारी असेल तर कुठल्याही बिकट प्रसंगातून सफाईदारपणे कशी वाट काढता येते, याचे वर्णन म्हणजे पाव्हन्याचा गनशॉट आन् इमॅजिनेशन ही गोष्ट.
‘इमोशनल राडा’ या कथेत एक राजकीय पार्टी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मजेदार पण विचित्र फिलॉसॉफी कशी वापरते? त्यावरून काय काय प्रश्न उभे राहतात याचे प्रसंगानुरूप वर्णन आहे. राजकारणात प्रत्येक नेत्याला मोठेपण व प्रसिद्धी कशी मिळते? त्या त्या काळातील इश्यूसाठी त्या त्या वेळच्या लोकांच्या मानसिकतेप्रमाणे, विचारसरणीप्रमाणे त्या नेत्याचा जनतेवर प्रभाव पडणे अथवा त्याची निंदानालस्ती होणे अशा गोष्टी घडत असतात. राजकारणातील अशा सापशिडीचे वर्णन या कथेत केले आहे.
‘राइस बीअरचा उतारा’ या कथेत बाबऱ्याचा दोस्त त्याला चक्कीत चलतोस का? असा प्रश्न करतो. ही चक्की कसली? त्यावरून कसे आणि कसले वर्णन केले आहे? ते गुपित ठेवणेच बरे. वाचकांनी त्याचा स्वत: वाचून आस्वाद घ्यावा.
‘शिनचॅन आन् लाइटवर चालणारे पोर’ या कथेत बबऱ्याचा पोर आणि त्याच्या दोस्ताचा पोर या दोघांवर दूरदर्शनवर दाखवल्या जाणाऱ्या कार्टुनच्या मालिकांचा कसा परिणाम झाला आहे त्याचे मजेशीर वर्णन आहे.
‘थिंकटँक, पाखरं आणि जर्मन शेफर्ड’ या कथेतील थिंकटँक या शब्दाच्या कोडय़ाची उकल होण्यासाठी ही रंजकदार कथा वाचणेच योग्य ठरेल. त्याचबरोबर पाखरं या शब्दाचा गैर अर्थ घेतल्यामुळे उडालेली मजा आणि जर्मन शेफर्डचा अनुभव घेण्यासाठी कथा वाचणे उत्तम. ‘शुद्ध चारित्र्याची भानगड’ या कथेत राजकीय पार्टीत शुद्ध चारित्र्यवाला माणूस पाहिजे असे फॅड आल्यावर त्यावरून रंगलेली चर्चा आणि चर्चेअंतर्गत मूळ विषयाला मिळालेल्या कलाटणीतून सांगितली गेलेली वेगळीच गोष्ट आहे. ‘पब्लिसिटी’ या कथेत एका पुढाऱ्याच्या वडिलांचे निधन झाल्यावर ती बातमी पेपरला येते, परंतु त्यात त्या राजकीय पुढाऱ्याचे नाव येत नाही म्हणून तो पत्रकारावर कसा रागावतो, त्याचबरोबर गावातील लोकांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी झोपडीवजा घरात जाऊन भाकरी व ठेचा खातो आणि त्यानंतर त्याची कशी फजिती होते याचे विनोदी वर्णन आहे.
‘पॉलिटिकल पाइप अन् सोशल चोकअप’
एका घराचं ड्रेनेज चोकअप झाल्यामुळे दुरुस्तीसाठी मिस्त्रीला बोलावलं जातं. खरं तर उंदरानं पाइप कुरतडलेला असतो. पण उंदीर सांगितलं तर समोरच्याला त्यातील गांभीर्य कळणार नाही म्हणून उंदराची घूस करून सांगितलं जाते. राईचा पर्वत करून घुशीने पार चेंबपर्यंत पाइप कुरतडून वाट लावलीय असे सांगून त्याचा संबंध राजकारणात जसे घुशीचा प्रॉब्लेम असेल तर गेंडय़ाचा आकार, गेंडा असेल तर हत्ती समोर आणणे अशाप्रकारे सोशल चोकअप वाढविल्याशिवाय एखाद्याच्या करिअरचा पर्याय मोकळा होत नसतो. याचे या कथेत सविस्तर वर्णन केले आहे.
‘टऱ्र्या, डिंग्या आन् गळे’ या कथेत संपादक व राजकारणी ही दोन व्यक्तिमत्त्व आहेत. लेखकाने लिखाण थांबवले आणि राजकारण्याने पार्टीतून रिझाइन केले तर त्याचे परिणाम काय असू शकतात याचे वर्णन केले आहे.
‘कॉस्च्युम अवेअरनेस’- आपल्या देशामध्ये आजच्या घडीला किती वाघ असतील, असा प्रश्न बबऱ्याला त्याचा मित्र विचारतो आणि या प्रश्नाची उकल करता करता एक गोष्ट ऐकवतो. त्या कथेचे वर्णय यात केले आहे. या गोष्टीत कल्पनाविष्काराने प्राण्यांतील चेंज ऑफ कॉस्च्युमची आयडिया रंगविली आहे.
‘सब्जेक्ट टेंडंसीचा हाये’- साहित्यातील राजकारणानं जोर पकडल्यावर राजकारणी आश्चर्यचकित झाले. त्याचवेळी राजकारणीदेखील आत्मचरित्र लिहू लागले, त्यामुळे लिटरेचरमधील पॉलिटिकल अ‍ॅक्टिव्हिटी वाढीस लागली. या दोघांच्या गोंधळातून निर्माण झालेली कथा, या भागात सांगितली आहे.
‘एक गाव मनामंदला’ या कथेत बबऱ्या आणि बबऱ्याच्या मित्राच्या कल्पनेतील गाव आणि त्या गावातील अनेक गोष्टींबद्दलची फॅण्टसी आणि त्यातील कल्पनाविलास मांडला आहे.
‘सच का सामना आन् कन्फेशन’- बबऱ्याचा मित्र आणि बबऱ्या टी.व्ही.वरील रिअ‍ॅलिटी शो ‘सच का सामना’बद्दल चर्चा करता करता एकमेकांत प्रश्न-उत्तरांची देवाणघेवाण करतात आणि मग उत्तरकर्ता मनात चलबिचल होऊन कसा बुचकळय़ात पडतो याचे वर्णन या कथेत केले आहे.
‘थापड : बक्कळ इंटेंशन’- एखाद्या घटनेत रागाच्या भरात जर कोणी कोणाला थोबाडीत म्हणजेच थापडीत मारली, तर त्याचे घटनेतील पात्रांवर कसे परिणाम होऊ शकतात, याचे रसभरित वर्णन म्हणजे ही कथा होय.
लिटरोटेन्मेंट आन् ‘पा’- नवराबायकोतील भांडण सुरू असते. इतक्यात नवऱ्याला मित्राचा फोन येतो. पण भांडायच्या मूडमध्ये असल्यामुळे मित्राचा फोन घेता येत नाही. भांडण संपल्यावर मित्राला फोन करून भांडण सुरू होते, म्हणून फोन घेता आला नाही या गोष्टीचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
‘मास्क, मुस्क्या आन् मुखवटे’
बबऱ्या आणि त्याचा दोस्त एकदा दारू प्यायला बसतात. त्याच्या दोस्ताला बबऱ्या पत्रकार असल्यामुळे, पत्रकारांच्या विषयावर बोलायचे असते, पण दारू प्यायल्यामुळे नशेत असल्याने त्याला मुद्दाच सापडत नसतो, त्यामुळे तो बबऱ्यालाच विचारतो की मी कुठल्या विषयावर बोलत होतो? आणि बबऱ्या शिताफीने विषयाला कलाटणी देतो. त्याचे वर्णन या कथेत आहे. सरतेशेवटी बबऱ्याच त्याला एक कथा सांगतो व त्यात मास्क, मुस्क्या आणि मुखवटे कोणत्या प्रसंगी व का वापरले जातात त्याचे विवरण करतो.
‘इंडिया सपोर्ट्स इमोशनल करप्शन’
बबऱ्याचा दोस्त स्वभावाने खूप हळवा असतो. त्याच्यासारख्या माणसाने सिव्हिल सोसायटीबद्दल डायरेक्ट काही नकारात्मक बोलणे म्हणजे त्याला दहा बैलांची ताकद आणावी लागत असे. तेव्हा कुठे बोलण्याचं डेरिंग होत असे. हे आणि याशिवाय मीडिया जेव्हा एखाद्या माणसाला मोठं करत असते, तेव्हाच त्याला खाली कसं पाडायचं हेही ठरवत असते. याचं वर्णन या कथेत आहे.
या पुस्तकातील प्रत्येक कथेचं वैशिष्टय़ असं आहे, की कथा वाचायला सुरुवात केली तरी त्याचा शेवट कथा पूर्ण वाचून होईपर्यंत अजिबात कळून येत नाही. अतिशय विनोदी भाषेत कथांची हाताळणी केल्यामुळे हमखास निखळ करमणूक होते.
टऱ्र्या, डिंग्या आन् गळे
लेखन – बब्रुवान रुद्रकंठावार
प्रकाशक – जनशक्ती वाचक चळवळ
मूल्य- १५०/- रुपये
पृष्ठ – १६८
रश्मी गोळे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2015 1:12 am

Web Title: marathi book review 4
Next Stories
1 बोली शब्दांचा ऐवज
2 संघर्षांतील सकारात्मक विचारांची कथा
3 विचार समृद्ध करणारा लेखसंग्रह
Just Now!
X