News Flash

पी हळद, हो गोरी…

स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भाज्यांना, वेगवेगळ्या पदार्थाना मराठी भाषेच्या म्हणी वाक् प्रचारांमध्ये मानाचं स्थान मिळालं आहे.

| November 21, 2014 01:14 am

01prashantस्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भाज्यांना, वेगवेगळ्या पदार्थाना मराठी भाषेच्या म्हणी वाक् प्रचारांमध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. उदाहरणार्थ अध्र्या हळकुंडाने पिवळे होणे, राईचा पर्वत करणे, विळ्याभोपळ्याचं नातं असणे या म्हणी..

आम्ही सर्व जण रात्री आठ वाजताच टेबलवर जमा झालो. दुसऱ्या बाजूस प्राजक्ताची जेवणाची तयारी चालू होती. हळद, मोहरी असे सर्व फोडणीचे सामान ती हातापाशी घेत आहे हे पाहून मी पद्मजाला म्हटले, ‘‘हळद म्हणजे टरमेरिक व मोहरी किंवा राई म्हणजे मस्टर्ड सीड्स. यावरून खूप वाक्प्रचार आपल्या मराठीमध्ये आहेत. जसे की ‘अध्र्या हळकुंडाने पिवळे होणे’, ‘पी हळद हो गोरी’, ‘राईचा पर्वत करणे.’ जरासे यश मिळाले की काही जणांच्या डोक्यात हवा जाते. अशा वेळी ‘अध्र्या हळकुंडाने पिवळे होणे’ ही म्हण वापरली जाते. तर जेव्हा एखाद्या उतावळ्या व्यक्तीला काहीही प्रयत्न न करता लगेच यश हवे असते तेव्हा ‘पी हळद हो गोरी’ अशा स्वभावाची ती आहे, असे समजतात..’’ इति नूपुर.
राईचा पर्वत करणे म्हणजे छोटय़ाशा गोष्टीचा प्रमाणाबाहेर बाऊ करणे, असा अर्थ सौमित्रने सांगितला.
आज भोपळ्याची भाजी असल्याने प्राजक्ताने विळीवर भोपळा कापायला घेतला. भोपळा चिरत चिरत ती म्हणाली, ‘‘पद्मजा, भोपळा म्हणजे पमकीन. मराठीमध्ये ‘विळ्या-भोपळ्याचे नाते असणे’ अशी एक म्हण आहे. त्याचा अर्थ होतो कमालीचे शत्रुत्व असणे.’’
इतक्यात टेबलवर माझी आई आवळे घेऊन आली. आवळ्याची चटणी, आवळ्याचे सरबत व मोरावळा यांची ती तयारी करणार होती. ते पाहून मी पद्मजाला म्हणालो, ‘‘सूनबाई सर्वात मोठे फळ घेऊन काम करत आहे तर सासूबाई सर्वात छोटे फळ घेऊन. यावरूनच मराठीमध्ये एक म्हण आहे- ‘आवळा देऊन कोहळा काढणे.’’ कोहळा व भोपळा हे कझिन आहेत असे सांगून नूपुर म्हणाली, ‘‘या म्हणीचा अर्थ होतो; दुसऱ्यास छोटा फायदा दाखवून त्याच्याकडून स्वत: मात्र फार मोठा फायदा उकळून घेणे.’’
एवढय़ात फोडणीसाठी कढई काढण्याच्या नादात प्राजक्ताकडून दोन-चार भांडी खाली पडली. ती सॉरी म्हणाली, तेव्हा माझी आई म्हणाली, ‘‘अगं! भांडय़ाला भांडं लागणारच. त्यात काय एवढं!’’ ‘‘पद्मजा, ‘भांडय़ाला भांडे लागणे’ या म्हणीचापण खूप वापर करतो आम्ही..’’ असे सांगून माझी आई म्हणाली, ‘‘घरात भिन्न स्वभावाची माणसे जेव्हा एकत्र राहात असतात तेव्हा त्यांच्यात वादविवाद होणे हे स्वाभाविक असते.’’
भांडय़ांचा विषय निघाला म्हणून मग मीदेखील ताटावरून पाटावर आणि पाटावरून ताटावर व ताटातले वाटीत हे वाक्प्रचार सांगितले.
काही लोक काहीही काम न करता फक्त मानमरातब घेण्यातच धन्यता मानतात. त्यांना फक्त मिरवायचे असते कष्ट उपसायचे नसतात. अशा लोकांसाठी पहिला वाक्प्रचार वापरला जातो.
तर कधी कधी लोकांना दाखवण्यापुरते काही लोक दोन वेगवेगळे सवतेसुभे मांडतात, पण प्रत्यक्षात ते दोन्ही एकमेकांना आतून सामील असतात किंवा कधी कधी काही व्यवहार हे एकाच कुटुंबातील दोन जवळच्या व्यक्तींमध्ये होतात. ज्यात व्यवहार असतो, पण नावापुरताच. कारण पैसा हा घराबाहेर जाणारच नसतो. हे सर्व दर्शविण्यासाठी ताटातले वाटीत ही म्हण वापरली जाते.
हे सर्व अर्थ पद्मजा लिहून घेत होती. मराठी शब्द कुठे व कसेही फिरवता येतात हे पदोपदी तिला जाणवत होते.
माझ्या सासूबाई म्हणाल्या, ‘‘खाण्यापिण्याच्या गोष्टींचा विषय निघालाच आहे तर मीही दोन म्हणी सांगते.. ‘खायला काळ अन् भुईला भार’ व ‘खाई त्याला खवखवे’. जर माणसे नुसती ताटावरून पाटावर करणार असतील तर कुटुंबाला त्यांचा काहीही उपयोग नसतो, उलट त्यांचा भारच वाटतो. त्यासाठी ‘खायला काळ..’ ही म्हण वापरतात. तर ज्याने चोरी केलेली असते त्यालाच त्याची बोचणी लागत असते हे दाखवायला ‘खाई त्याला खवखवे’ हा वाक्प्रचार वापरला जातो.
प्राजक्ता लोणी कढवून तूप तयार करत होती. एका बाजूस जेवण चालले होते व दुसऱ्या बाजूस लोणी कढविणे. सौमित्र पद्मजाला म्हणाला, ‘‘मला तूप म्हणजे घी खूप आवडते. आई तूप तयार करेपर्यंत मी तुला काही म्हणी सांगतो. ‘खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी’ व ‘पाचही बोटे तुपात असणे.’ शेवटची म्हण तुला आधीच माहीत आहे. त्यामुळे फक्त पहिलीचा अर्थ सांगतो. जो माणूस अडचणीत असतानाही तडजोड करायला तयार नसतो त्याचे वर्णन करताना ‘खाईन तर तुपाशी..’ ही म्हण वापरतात.’’
‘‘तुपावरून आठवणारी अजून एक म्हण म्हणजे ‘कडू कारले तुपात तळले व साखरेत घोळले तरी कडू ते कडूच.’’ आमच्या सौ.ने तिच्यातर्फे एक भर अजून घातली व सोबत अर्थही सांगितला की एखादा वाईट स्वभावाचा माणूस जेव्हा इतरांनी केलेल्या कितीही उपदेशांनंतरदेखील स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणण्यास राजी नसतो तेव्हा वैतागून असे म्हटले जाते.
आता प्राजक्ताने पोळ्या करण्यासाठी तवा गरम करण्यास ठेवला. सौमित्र म्हणाला, ‘‘तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे असा अजून एक वाक्प्रचार आपल्याला मिळाला. याचा अर्थ होणार आयत्या मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन स्वत:च्या फायद्याचे काम करून घेणे.’’
जेवणात काही तरी गोड हवे म्हणून प्राजक्ताने मला एका बाजूला केळ्याचे शिकरण करण्यास सांगितले. मी मग त्यासाठी पद्मजाला साखर, दूध व केळी घेऊन येण्यास सांगितले. साखर व दुधावरून वाक्प्रचार सांगून शिकवणीचा शेवट नेहमीप्रमाणे गोड करण्याचे आम्ही ठरविले. ‘दुग्धशर्करा योग’ व ‘साखरेचे खाणार त्याला देव देणार’ हे वाक्प्रचार मी तिला लिहून घेण्यास सांगितले. जेव्हा खूप दुर्मीळ व शुभ योग जीवनामध्ये जुळून येतो तेव्हा आपण दुग्धशर्करा हा शब्द वापरतो, असे सांगत असतानाच दुग्ध म्हणजे मिल्क व शर्करा म्हणजे शुगर हेपण मी पद्मजाला समजाविले. ‘साखरेचे खाणार त्याला देव देणार’ हे समजावून देताना मी म्हटले की, ‘‘जर आपण सर्वाशी गोड बोललो व प्रेमाने राहिलो तर देवही आपल्याला सुखच देणार किंवा कोणत्याही शुभकार्याआधी तोंड गोड केल्याने त्या कार्यात यशप्राप्ती होते. देवाचा आशीर्वाद प्राप्त होऊन कार्य सफल होते.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2014 1:14 am

Web Title: marathi language 4
Next Stories
1 असतील शिते…
2 हत्तीच्या पावलांनी…
3 म्हशीने रांधले…
Just Now!
X