04 July 2020

News Flash

प्रीती राठी ईर्षां आणि मत्सराची बळी

<span style="color: #ff0000;">गुन्हा</span><br />नोकरीसाठी मुबईत, नौदलात दाखल होण्यासाठी आलेल्या प्रीती राठीवर वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरातच अ‍ॅसिड हल्ला झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. अत्यंत अवघड

| January 24, 2014 01:01 am

गुन्हा
नोकरीसाठी मुबईत, नौदलात दाखल होण्यासाठी आलेल्या प्रीती राठीवर वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरातच अ‍ॅसिड हल्ला झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. अत्यंत अवघड अशा या प्रकरणात सहा-सात महिन्यांनंतर आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
‘पापा, मेरी क्या गलती थी? मैंने किसका क्या बिगाडम था़..?’ रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या प्रीती राठीने एका चिठ्ठीवर लिहिलेले हे शब्द ऐकून तिच्या वडिलांच्या डोळ्यांतून पाणी तरळलं. खरंच, तिची काय चूक होती? नौदलातील नोकरीसाठी रुजू होण्यासाठी दिल्लीची २३ वर्षीय प्रीती मुंबईत आली होती. वांद्रे स्थानकात उतरताच एका तरुणाने तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. त्यात चेहरा भाजला आणि अ‍ॅसिड शरीरात गेल्याने तिचा मृत्यू झाला. सारा देश या घटनेने सुन्न झाला होता. २ मे २०१३ ची ही घटना. कुणी तिच्यावर हल्ला केला, काय कारण होतं, सारेच प्रश्न अनुत्तरित होते. रेल्वेने जंग जंग पछाडलं. आरोपी सापडत नव्हता. संपूर्ण देशात या घटनेचे पडसाद उमटले. एका तरुणाला अटकही केली गेली, पण तोसुद्धा खरा हल्लेखोर नव्हता.
डिसेंबर २०१३. या घटनेला सात महिने उलटून गेले होते. तपासात प्रगती नव्हती. हल्लेखोर मोकाट होता. देशभर आंदोलने होत होती. हताश झालेल्या प्रीती राठीच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास मग अवघडात अवघड गुन्ह्यंची उकल करण्यात प्रसिद्ध असलेल्या मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवला. सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांच्यापुढे मोठे आव्हान होते. त्यांनी मग विशेष पथक तयार केले. या सगळ्यात अवघड प्रकरणाची जबाबदारी सोपवली ती साहाय्यक पोलीस आयुक्त प्रफुल्ल भोसले यांच्यावर. या घटनेला सात महिने उलटून गेले होते. कसलाच दुवा नव्हता. प्रीतीचाही मृत्यू झाला होता. नातेवाईकांचा पोलिसांवरील विश्वास उडाला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत हे अवघड आव्हान स्वीकारून हे विशेष पथक कामाला लागले.
प्रीती राठी. दिल्लीच्या नरेला भागात बाक्रा बियास डेव्हलमेंट बोर्ड (बीबीडीबी) वसाहतीत राहणारी. सरळमार्गी २३ वर्षीय तरुणी. मध्यमवर्गीय कुटुंब. त्यातही नाकासमोर चालणारी. दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार. वडील नरेलाच्या बोर्डात फोरमन या अधिकारी पदावर. चार ते पाच चाळींची छोटी वसाहत. एकूण २५ खोल्या. त्यात १५ कुटुंबं राहात होती. उर्वरित खोल्या रिकाम्या होत्या. वसाहतीमधील सगळे बोर्डात काम करणारे. प्रीतीने बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर दिल्लीच्या बात्रा नर्सिग महाविद्यालयातून चार वर्षांचा नर्सिगचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. या संपूर्ण कालावधीत तिने फक्त घर आणि अभ्यास यावर लक्ष दिलं होतं. तारुण्याच्या त्या उमलत्या वयात तिचं पाऊल कधी वाकडं पडलं नाही. शाळा मुलींचीच. मैत्रिणी भरपूर. तशी ती मोकळ्या स्वभावाची. मित्रही होते. पण चुलत भावांशी जास्त जवळीक. आई तिला म्हणायची, बाहेर फिरत जा. पण ती फक्त घरात आणि नातेवाईकांकडेच जायची. नर्सिगची पदवी संपादन केल्यानंतर तिने दिल्लीच्या सुशीला नर्सिग होममध्ये काही महिने व्याख्याती म्हणूनही काम केले. स्वप्नं मोठी होती. नौदलात जायचे होते. आर्मी मेडिकल सव्‍‌र्हिसेसची कठीण अशी स्पर्धा परीक्षा दिली. तिचे स्वप्न साकार झाले. ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. नौदलात तिला लेफ्टनंट (नर्सिग) पदावर नोकरी मिळाली. संपूर्ण राठी कुटुंबीयांसाठी आनंदाचा क्षण. माझी मुलगी नौदलात लेफ्टनंट म्हणून काम करणार. तिचा पहिलाच पगार ५० हजार आहे. तिचे वडील अमरजितसिंग राठी आनंदाने कॉलनीत सांगत होते. पण प्रीतीची ही प्रगती कुणाला तरी खुपत होती.

प्रीतीच्या मोबाइलमधले गेल्या दोन वर्षांचे एसएमएस पुन्हा मिळवले, पण सगळे साधारण होते. संशयाला काहीच जागा नव्हती. प्रीतीचा कुणीच प्रियकर नव्हता. तिचे प्रेमप्रकरण नव्हते.

१ मे २०१३. प्रीतीच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू होणार होता. ती नौदलात रुजू होण्यासाठी मुंबईला निघाली. सोबत वडील अमरजितसिंग राठी, मावशी सुनीता आणि सुनीताचे पती विनोदकुमार होते. प्रीतीची नीट रवानगी करावी, व्यवस्थित कामाच्या ठिकाणी सोडून, राहण्याची व्यवस्था करून परत यावे, असे त्यांनी ठरवले होते. निजामुद्दीन स्थानकातून त्यांनी गरीब रथ एक्स्प्रेस पकडली. २ मे २०१३ रोजी सकाळी साडेसात वाजता वांद्रे टर्मिनस स्थानकात उतरले. स्थानकातून टॅक्सी पकडण्यासाठी ते बाहेर पडले. त्या वेळी एकाने प्रीतीच्या खांद्यावर हात ठेवला. प्रीतीने मागे वळून पाहिले एवढय़ात त्याने बरणीतील अ‍ॅसिड तिच्या चेहऱ्यावर फेकले. ती किंचाळू लागली. हे अ‍ॅसिड प्रीतीची मावशी सुनीता दाहिया आणि शेजारून जाणारी महिला प्रवासी सुदेशाकुमारी यांच्यावरही पडले. तो हल्लेखोर गर्दीतून पसार झाला. त्याने चेहऱ्यावर रुमाल बांधला होता आणि डोक्यावर टोपी घातली होती. पंचविशीच्या घरातील तो तरुण होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची अस्पष्ट आकृती दिसत होती. जखमी प्रीतीला सुरुवातीला खेरवाडी येथील गुरुनानक रुग्णालयात आणि नंतर भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर प्रकृती बिघडल्यानंतर बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रेल्वेच्या हद्दीत घटना घडल्याने रेल्वे पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. त्यांच्यावर दबाव वाढला. पोलीस पथके दिल्लीत रवाना झाली. प्रीतीचे नातेवाईक, मैत्रिणी, सहकारी सर्वाची कसून चौकशी केली. गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या साडेतीन हजार प्रवाशांचीही चौकशी करण्यात आली. काहीच दुवा सापडत नव्हता. प्रीती रुग्णालयात असताना बोलू शकत नव्हती. अ‍ॅसिडमुळे तिची अन्ननलिका आणि घसा जळाला होता. सुरुवातीला ती कागदावर लिहून संवाद साधत होती. तिने दोघा-तिघांची संशयित म्हणून नावे लिहून दिली होती. एक होता पवन कुमार गेहलोत. दुसरा सत्यम वर्गीस आणि तिसरा अंकुर पनवार. पवन गेहलोत त्या दिवशी निजामुद्दीन स्थानकात होता, असेही प्रीतीने सांगितले होते. अंकुर पनवार हा त्या दिवशी हरिद्वारमध्ये होता. सत्यम वर्गीस या तरुणाचे प्रीतीच्या मैत्रिणीशी प्रेमसंबंध होते. ते तुटले होते. प्रीतीमुळे ते तुटले असा त्याचा समज होता. त्यामुळे प्रीतीने त्याचे नाव घेतले. पोलिसांनी सत्यमला ताब्यात घेतले, पण त्या दिवशी तो ज्या ठिकाणी होता, तेथील सीसीटीव्ही फुटेज त्याने पुरावा म्हणून सादर केले आणि पोलिसांना त्याला सोडावे लागले. मग पोलिसांनी पवन गेहलोत या तरुणाला ताब्यात घेतले. गुन्हा उघडकीस आला असे वाटले, पण पवनचा सहभाग दिसून येत नव्हता. दिल्ली स्थानकात ज्या तरुणाला प्रीतीने पाहिले तो पवनसारखा दिसणारा होता. प्रीतीच्या वडिलांनीही पवनला अटक केल्याचा तीव्र विरोध केला होता. रेल्वे पोलिसांची नाचक्की झाली. अखेर पवन गेहलोतला सोडावे लागले होते. दरम्यान, उपचारादरम्यान एक महिन्यानंतर १ जून २०१३ रोजी प्रीतीचा मृत्यू झाला. एका निरपराध तरुणीचा अ‍ॅसिड हल्ल्यात बळी गेल्याने देशभरात खळबळ उडाली होती. प्रीतीवर अ‍ॅसिड फेकणारा कोण, हे गूढ उकलत नव्हते.
अवघड गुन्ह्यची उकल
 दरम्यान, प्रीतीच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागितल्यानंतर डिसेंबर २०१३ रोजी गुन्हे शाखेकडे हा तपास आला होता. घटनेनंतर सात महिन्यांनंतर हा तपास आला होता. साहाय्यक पोलीस आयुक्त प्रफुल्ल भोसले या विशेष पथकाचे प्रमुख होते. त्यांनी कागदपत्रांचा अभ्यास सुरू केला. संपूर्ण तपास नव्याने करायचे ठरवले. सगळे कामाला लागले. प्रीतीवर चुकून हल्ला झाला का (मिस्टेकन आयडेंटिटी) ही शक्यता सुरुवातीला पडताळायला सुरुवात केली. म्हणजे प्रीतीऐवजी अन्य कुणावर हल्ला करायचा होता, पण तो चुकून प्रीतीवर झाला असेल. त्या दृष्टीने सुरुवातीला तपास केला गेला, पण आठवडय़ाभरात ही शक्यता निकाली निघाली. पोलिसांनी सगळ्यांची चौकशी सुरू केली. प्रीतीच्या सर्व नातेवाईकांचे जबाब घेतले. प्रीतीच्या पूर्वाश्रमीच्या आयुष्यात कुणी प्रियकर होता का ते तपासले. तिच्यावर कुणी एकतर्फी प्रेम करत होतं का, ते शोधलं. तिच्या शाळेत, महाविद्यालयात कुणी होतं का, ते पाहिलं. प्रीतीच्या मोबाइलमधले गेल्या दोन वर्षांचे एसएमएस पुन्हा मिळवले, पण सगळे साधारण होते. संशयाला काहीच जागा नव्हती. प्रीतीचा कुणीच प्रियकर नव्हता. तिचे प्रेमप्रकरण नव्हते. विशेष पथकाचे सदस्य दिल्ली, हरयाणा, पंजाब, नरेला, उत्तराखंड, गुजरात आदी राज्ये पालथी घालत होते. प्रीतीच्या वडिलांचे कुणाशी वैमनस्य आहे का, नातेवाईकांमध्ये काही वाद आहेत का, ते तपासले गेले. त्यांची थोडी शेती होती. मालमत्तेचा काही वाद नव्हता.

ती बघ कुठच्या कुठे गेली, मुंबईला लेफ्टनंट म्हणून नोकरी करणार आणि तू असाच राहा, त्याच्या वडिलांचा टोमणा त्याच्या जिव्हारी लागला. ही नोकरी प्रीतीला मिळू नये म्हणून त्याने एक विकृत योजना आखली.

या कठीण तपासाबाबत माहिती देताना प्रफुल्ल भोसले म्हणाले की, तिचा प्रियकर नसल्याने कुणी एकतर्फी प्रेम करणारा कोण असेल किंवा तिने कळत नकळत कुणाला दुखावलं असेल ही शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला. दिल्लीच्या सुशीला नर्सिगमध्ये ती काही महिने शिकवायची. तेथे एका विद्यार्थ्यांला काही कारणावरून ती रागावली होती. त्याचाही शोध घेतला, परंतु काहीच धागा हाती लागत नव्हता. प्रीतीचे दोन चुलत भाऊ होते. ते विवाहित होते. त्यांच्याशी प्रीतीची घनिष्ठ मैत्री होती. त्यातून काही घडले का तेसुद्धा पोलिसांनी तपासून पाहिले होते. सुमारे तीनशे जणांची कसून चौकशी आणि जबाब नोंदवले गेले. तिच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आलेल्या लोकांची चौकशी झाली. हल्ला घडला म्हणजे काहीतरी उद्देश असेल, ते पोलिसांना शोधायचे होते.
तपासाला अंकुर फुटला
ज्यांची नावे सुरुवातीला प्रीतीने घेतली होती. त्यांच्याकडे पुन्हा गुन्हे शाखेने मोर्चा वळवला. पवन गेहलोत, सत्यम वर्गीस यांची चौकशी केली. काही निष्पन्न झाले नाही. तिसरा होता अंकुर पनवार. वय २३. प्रीतीच्याच कॉलनीत राहणारा. पोलीस पथक त्याच्या घरी गेले, पण तो कामानिमित्त गुजरातला होता. तो ३ मे २०१३ रोजीच नोकरीसाठी हरिद्वारला गेला असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. तो मोबाइल वापरत नसल्याचेही त्याच्या वडिलांनी सांगितले. पण पोलिसांना कसलाच दुवा सोडायचा नव्हता. त्यांनी अंकुरची कसून चौकशी करायचे ठरवले. त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की, प्रीतीवर २ मे रोजी हल्ला झाला. तेव्हापासून अंकुर नोकरीचे कारण देत आपल्या घरी परतला नव्हता. एखादा गुन्हेगार गुन्हा घडला की तो सतत घटनास्थळापासून लपत असतो. ही मानसिकता पोलिसांचा संशय बळावत गेली. पोलिसांनी अंकुरवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. अंकुर अहमदाबाद येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. तेथे चोरी झाली होती. त्यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांना आपापल्या कागदपत्रांची पडताळणी करून यायला सांगितले होते. अंकुर त्यासाठी दिल्लीत आला होता. त्याच्या मागावर असणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडले. ज्या दिवशी प्रीतीवर हल्ला झाला, तेव्हा मी हरिद्वारला एका हॉटेलमध्ये मुलाखतीसाठी गेलो होतो, असे त्याने सांगितले. दिल्लीसारखे मोठे शहर सोडून हरिद्वारला का नोकरीसाठी गेला. त्याच्याकडे उत्तर नव्हते. पोलीस त्याला घेऊन हरिद्वारला गेले. २ मेला अशा प्रकारची कुठलीही मुलाखत झाली नव्हती, असे त्या हॉटेलने सांगितले. पोलिसांना बरोबर धागा मिळाला होता. प्रीतीवर अ‍ॅसिड फेकताना त्याच्या हातावरही अ‍ॅसिड पडले होते. त्याचे व्रण हातावर दिसत होते. पण मी झाडावरून पडलो, हाताला तार लागली, असे त्याने सांगितले होते. अर्थात चाणाक्ष पोलिसांपुढे त्याची ही खोटी थाप टिकली नाही. मग पोलिसांनी त्याला बोलते केले आणि धक्कादायक माहिती समोर आली.
अंकुर पनवार (२३) हा तरुण तसा चांगल्या घरातला. ओरिसा येथील एका महाविद्यालयातून त्याने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली होती. प्रीती त्याच्याच वयाची. दोघांच्याही घरचे चांगले संबंध. अंकुरची आई आणि प्रीतीची आई चांगल्या मैत्रिणी. नेहमी एकमेकांच्या घरी ये-जा असायची, पण अंकुर आणि प्रीती कधी तसे बोलत नव्हते. प्रीतीची प्रगती होत होती, मात्र अंकुरच्या पदरी यश नव्हते. त्यावरून त्याचे आई-वडील सतत त्याला बोलायचे. प्रीतीला नौदलात नोकरी मिळाली तेव्हा तर त्याचा जळफळाट झाला. ही कशी पुढे गेली, असा विचार त्याच्या मनात घोळू लागला. ती बघ कुठच्या कुठे गेली, मुंबईला लेफ्टनंट म्हणून नोकरी करणार आणि तू असाच राहा, त्याच्या वडिलांचा टोमणा त्याच्या जिव्हारी लागला. ही नोकरी प्रीतीला मिळू नये म्हणून त्याने एक विकृत योजना आखली. प्रीतीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले तर तिचा चेहरा विद्रूप होईल आणि तिला कधीच नोकरी मिळणार नाही, असे त्याला वाटले. प्रीतीच्या आईने त्याच्या घरी येऊन सगळी माहिती दिली होती. ज्या बाक्रा बियास बोर्ड वसाहतीत तो राहात होता, तेथे बॅटरीचे वर्कशॉप होते. तेथे अ‍ॅसिड असते हे त्याला माहीत होते. तेथील सुरक्षारक्षक फार सक्रिय नसतो, हेसुद्धा त्याने पाहिले होते. ३० एप्रिल २०१३ रोजी त्याने या वर्कशॉपमधून अ‍ॅसिड चोरले. बाटलीत अ‍ॅसिड घेतले तर फेकताना पूर्ण अ‍ॅसिड पडणार नाही म्हणून त्याने कचऱ्यात पडलेला च्यवनप्राशचा डबा अ‍ॅसिड भरण्यासाठी घेतला होता.
दुसऱ्या दिवशी मी हरिद्वारला नोकरीसाठी जातोय, असे सांगून तो निघाला. निजामुद्दीन स्थानकात तो अ‍ॅसिडची बरणी घेऊन आला. प्रीतीच्या कुटुंबीयांची वाट बघत तो एक तास स्थानकात थांबला होता. त्याने डोक्यावर टोपी, गॉगल आणि चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. तासभर तो स्थानकात होता, पण कुणी त्याला हटकले नाही. तोसुद्धा गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये चढला. तिकीट त्याने काढले नव्हते. तो संधीची वाट बघत होता. कुणी ओळखू नये म्हणून त्याने चेहरा रुमालाने झाकून ठेवला होता. गाडीतच त्याला अ‍ॅसिड फेकायचे होते, पण संधी मिळत नव्हती. अखेर ती संधी त्याला वांद्रे स्थानकात मिळाली. अ‍ॅसिड फेकल्यावर तो गर्दीतून पसार झाला. दुसऱ्या फलाटावरून तो सारा तमाशा बघत होता. अडीच तास तो स्थानकातच घुटमळत राहिला. दिल्लीकडे जाणाऱ्या गाडीने रवाना झाला. त्यानंतर तो घरी न जाता  गुरगावला मित्राकडे गेला. नंतर गोवा, पाँडिचरी, गुजरात आदी हॉटेलात नोकरीनिमित्त राहू लागला. पुन्हा नरेलाला गेलो तर पकडले जाऊ, अशी त्याला भीती होती. या काळात त्याने अनेक मोबाइल बदलले होते. मुंबईत आला तेव्हासुद्धा त्याच्याकडे जो मोबाइल होता, तो कुणालाच माहीत नव्हता. अ‍ॅसिड घेऊन, चेहऱ्यावर रुमाल बांधून त्याने रेल्वेतून विनातिकीट प्रवास केला, पण तिकीट तपासनीस किंवा अन्य कुणी त्याला कसे हटकले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी हा मोबाइलही जप्त केला आहे. प्रीतीने संशयित म्हणून अंकुरचे नाव घेतले होते, पण आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो नव्हतो, असे रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. डी. वडमारे यांनी सांगितले. या प्रकरणातला एक संशयित पवनकुमार गेहलोतला अटक केल्यावर त्याच्या वडिलांनी तो निर्दोष आहे, असे सांगत आमच्यावर दबाव टाकला होता. त्यांनी तर तसे प्रतिज्ञापत्रच न्यायालयात सादर केले होते. अंकुर हा चांगला मुलगा आहे, आमचे कौटुंबिक संबंध आहेत, आमच्या गल्लीत आरोपीला शोधू नका, असा हेका त्याच्या वडिलांनी धरला होता. त्यामुळे आमची अंकुरवरील तपासाची दिशा सैल झाली, अशी कबुली वडमारे यांनी दिली.
आम्ही आजवर अनेक कठीण गुन्ह्यची उकल केली, पण प्रीतीची केस ही सगळ्यात कठीण होती, असे सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी सांगितले. अनेकदा निराशा यायची, पण हिंमत हरलो नव्हतो, असे पथकाचे प्रमुख प्रफुल्ल भोसले म्हणाले.
८ अधिकारी, १४ निष्णात पोलीस कर्मचारी असे हे विशेष पथक प्रीतीच्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी तब्बल ४० दिवस अहोरात्र झटत होते. पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण १), साहाय्यक पोलीस आयुक्त प्रफुल्ल भोसले, पोलीस निरीक्षक अशोक खोत, मोहन जाधव, साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल ढोले, विजय ढमाळ, विनोद तावडे, राजू चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ घुगे, विजय आंबेकर यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी हे अवघड शिवधनुष्य पेललं आणि प्रीतीचा मारेकरी गजाआड झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2014 1:01 am

Web Title: priti rathi acid attack
टॅग Ladies
Next Stories
1 आता तरी जागे व्हा!
2 आयएनएस विक्रमादित्य युद्धनीतीची गेम चेंजर!
3 संमेलनच नाही, संवर्धनदेखील
Just Now!
X